Monday, October 16, 2017

जी योगासनं येत नाहीत ती सरावाच्या वेळी करून बघेपर्यंत वाटतं 'नकोच ना हे करायला. जे जमतंय तेच करू. घाम तर त्यानेही गळेल.' पण कितीही म्हणलं तरी एका टप्प्यानंतर व्यायाम हा केवळ व्यायाम राहत नाही. स्वतःला जाणून घेण्यासाठीची धडपड बनते ती. मग मात्र न जमणाऱ्या, न ठरणाऱ्या आसनांबद्दल नेहेमी टाळाटाळ करता येत नाही. भोपळा/ट्यूब बांधूनही उडी मारण्यास कचरणाऱ्या, बिथरलेल्या पोराला धक्का देऊन कुणातरी विहिरीत ढकलून द्यावं तसा आपलाच एक 'स्व' दुसऱ्या 'स्व' ला आव्हानाच्या दिशेने रेटतो.

काहीच येत नसतं तर कदाचित काहीच वाटलं नसतं. पण थोडी आसनं जमू लागलीत आणि इतर थोडी अजिबातच येतच नाहीत म्हणून उगा चुटपुट लागते. "इतके महिने झाले, इतकं शिकूनही साधं पद्मासन जमत नाही तुला!?" असं टोचून विचारणारे आईवडील, योगशिक्षक, सहाध्यायी आजूबाजूला नसतात हो. आपल्याच आत असतात ते. बाहेर कोणी विचारत नसतं, आणि विचारलं तरी आपल्या उत्तरांशी त्यांना फारसं सोयरसुतक नसतं. आपल्या आतला आवाज ह्या प्रतिमा निर्माण करून आपल्याच कुत्सितपणाचा, न्यूनगंडाचा प्रसाद आपल्यालाच देत असतो. 

आसन ठरणं, स्थिरावणं म्हणजे त्या कलकलाटावर स्वाभाविकपणे मात करणं. सहजतेने. कशाशीही झटापट न करता. फक्त श्वासा-उच्छ्वासाच्या लाटांची गाज ऐकू येत राहते. अन्य आवाजांचे बुडबुडे तिच्या तळाशी जात नाहीसे होतात.

रोजचा ॐकार वेगळा लागतो.  स्थितीची मजबूती रोज वेगळी. ध्यान लावलं जाऊ शकत नाही. ते लागतं, कध्धीतरी.

Monday, October 9, 2017

मिली (1975)

मी हायस्कूलच्या वयात हॉस्टेलवर असताना बाबांनी 'आनन्द' सिनेमाच्या पटकथेचं (- संपूर्ण संवाद, वगळलेले सीन्स, गीते व क्षणचित्रांसह) पुस्तक दिलं होतं. त्यावेळी तो सिनेमा कोण आवडला होता! आज काही गाणी, गुलज़ारांची 'मौत तू एक कविता है' सोडल्यास त्याकडे ढुंकून पहावसं वाटत नाही.
वाढत्या वयात हरतऱ्हेच्या हिरोगिरी, हुतात्मागिरीचं आकर्षण असतं. 'त्याग' ह्या शब्दाचा थेंब मनाच्या उकळत्या द्रावणात नुकताच टिपकलेला असतो व त्याचे सोयीस्कर, क्षुद्र अर्थ पुढे करून मोठी माणसं लहानांकडून नाना कार्यभाग साधून घेत असतात. तरीही - भावनांचे, नात्यांचे अगणित पापुद्रे उलगडणाऱ्या; अशक्य गुंत्यांबद्दल बोलणाऱ्या; 'मला माणूस कळलाय, सारंकाही समजलंय. या, मी तुम्हाला समजावतो' असा आव न आणणाऱ्या; अंतर्बाह्य काहीतरी समजावून घेताना होणारी स्वतःची तडफड, पोळभाज प्रामाणिकपणे दाखवणाऱ्या काही कलाकृती असतात. त्या पाहिल्या, वाचल्या, अनुभवल्यावर लक्षात येतं, की बाहुलीप्रमाणे एखाद्या hyperactive पात्राला पडद्यावर दोन-अडीच तास नाचवून 'मरते मरते वो हमे जीना सिखा गया' असले उ्गार काढणं फारच सोपं आहे. 'आनन्द मरते नहीं' म्हणून त्याच्याच मृतदेहाच्या छातीवर डोकं ठेऊन रडण्यात कुणाचंच काही जात नाही. ह्या चित्रपटातून जे 'हसरं दुःख' उगाच पैदा करण्यात आलं आहे त्याची भंगुरता, पोचटपणा जाणवल्यावर माझ्या मनातल्या 'आनन्दी' फुग्यातली हवाच गेली.

पुढे ह्रिशिकेश मुखर्जींचे आणखी काही सिनेमे पाहिले. मानवी स्वभावाच्या नर्मविनोदी, तरल, गंभीर, अस्फुट.. कितीतरी पैलूंना हात घालण्यास सक्षम असलेला; वेषभूषा व रंगभूषेचं चांगलं भान असलेला हा दिग्दर्शक पुन्हापुन्हा असले 'जीना सिखानेवाले' बुळबुळीत सिनेमे बनवण्याच्या फंदात का पडला ते कळत नाही. 'मिली' हा त्याच categoryतला चित्रपट. तरीही आगळा.


'एफटीआयआय'ने मुखर्जींच्या जयंती निमित्त आठवडाभर कार्यक्रम व screenings आयोजित केली होती. तिथे सहज म्हणून 'मिली' पहायला गेले. येथील अनेक विद्यार्थी व शिक्षकांच्या कामात चित्रपटकलेबद्दलची जी जाण, जी तहान, कळकळ दिसते त्याच्या तुलनेत तेथील प्रशासनाची आडमुठी नटवेगिरी, बिनडोक भपका बघून कीव येते. सिनेमा दाखवण्यापूर्वी मुखर्जींच्या कामाबद्दल माहिती देणारी एक यथातथा चित्रफीत दाखवण्यात आली. सध्या सरकारी माहितीपट व जाहिरातींतून घुमणारा तो आवाज फुसक्या इंग्लिश accent मधे आम्हाला सांगत होता की "ह्रिशिकेश मुखर्जी वॉज दि ग्रेटेस्ट, दि बेस्ट..." ...काय!??  'स्वतंत्र बाण्याची कलात्मक मांडणी व लोकप्रिय कथाकथनाचा मेळ' या मध्यममार्गी फॉर्म्युल्यातून कधीमधीच बाहेर पडलेला हा दिग्दर्शक 'दि ग्रेटेस्ट, दि बेस्ट ऑफ आवर् इन्डस्ट्री'? जयंती, पुण्यतिथी आहे म्हणून प्रत्येकालाच 'ग्रेटेस्ट' ठरवायचं? ...मला हसू आवरेच ना.

माझ्या नजरेत ह्रिशिदांना टॉपचं स्थान नक्कीच नाही पण त्यांच्या वेगळेपणाची चमक, त्यांनी पेरलेले बारकावे त्यांच्या सिनेमांत सतत जाणवत राहतात हे अगदी खरं. ह्रिशिदा दृश्य सौंदर्याचे लाड छान पुरवतात. पात्रांना समजून घेण्याच्या शक्यता विविध पद्धतींनी आपल्या हातावर ठेवतात.

'मिली'मधे मिलीच्या (जया) घरातील गृहसजावट व शेखरच्या (अमिताभ) गृहसजावटीतील तफावत डोळ्यात भरण्याजोगी आहे. शेखरचं घर मनापासून सजवलेलं / सजवून घेतलेलं वाटतं. शेखरचे कुर्ते मिलीच्या साड्या व ड्रेसेसहून अधिक देखणे आहेत. त्याला तसं वावरताना पाहून त्याचा एकाकीपणा, कशाततरी गुंतून राहून दुःख हलकं करू पाहण्याचा स्वभाव माझ्या नजरेत अधिक ठळक होत गेला.

या सिनेमातला अतिशय आवडलेला क्षण म्हणजे मिली शेखरला टेलिस्कोपमधून रात्रीचं आकाश न्याहाळताना पहिल्यांदा पाहते तो - शेखर टेरेसच्या तोंडाशी टेलिस्कोप मांडून तारे पाहत आहे. ती त्याच्या घरात शिरते. त्याला शोधत टेरेसजवळ येते. तो पाठमोरा बसलेला दिसतो. टेरेसच्या दरवाज्याच्या काचेत त्याच्याकडे पाहत भिंतीजवळ उभ्या असलेल्या तिचं प्रतिबिंब उमटतं. चंद्रप्रकाशाने टेेरेसची जमीन काहीशी उजळून निघालेली आहे. काचेतून दिसणारं मिलीचं प्रतिबिंब व टेरेसची धूसर, करडी जमीन यातून ती जणू ढगावर तरंगते आहे असा भास निर्माण होतो. हा इवलासा क्षण निःशब्द जातो व मग संवाद सुरू होतात.

सिनेमाचा शेवटदेखील आवडला. मिलीवर यशस्वी उपचार होतात व दोघं सुखाने संसार करतात असं दाखवलेलं नाही, किंवा तिला हसते हसते हौतात्म्यही पत्करायला लावलेलं नाही.

'रूना सिंग' (अरुणा इराणी) चं पात्र पाहून 'अभिमान'मधली चित्रा (बिंदू) आठवली. ('अभिमान' आवडतो हं मला.) बिंदूचं ते पात्र निराळंच होतं. ते हाताळण्यात एक साधेपणा होता, संवेदनशीलता होती. मला ते भावलं. अमिताभ व जयाचं नातं सावरू पाहणारी 'पती, पत्नी और वो' मधली 'वो' होती ती. दोघांनाही तिची गरज होती. 'मिली' मधली 'रूना' हा 'अभिमान'मधल्या 'चित्रा'चाच copy-paste अवतार. पण इथे हे पात्र अनावश्यक वाटतं. घटस्फोटानंतर रूना भ्रष्ट झालेली पाहून मिलीच्या भावाने तिला दूर करणं, शेखरचं ऱ्हदयपरिवर्तन होताना पाहून की काय, रूनाच्या ड्रेसिंग स्टाईलमधे परिवर्तन होणं ह्या त्यातल्या त्यात दखलपात्र (परंतु हास्यास्पद) बाबी.

 


दिग्दर्शक: ह्रिशिकेश मुखर्जी
लेखक: बिमल दत्त, राही मसूम रज़ा, मोहिनी सिप्पी
भाषा: हिंदी
अवधी: 124 मिनिटे 

ह्रिशिकेश मुखर्जी यांचे आजवर पाहिलेले चित्रपट - 
मुखर्जींद्वारा संकलित -
दो बिघा ज़मीन (1951)
मुखर्जींद्वारा दिग्दर्शित  -
आनन्द (1970)
बावर्ची (1972)
अभिमान (1973)
मिली (1975)
गोलमाल (1979)
खूबसूरत (1980)
नरम गरम (1981)
रंगबिरंगी (1983)

Saturday, August 5, 2017

त्याच्यातलं 'काहीतरी'

शुक्रवारची सकाळ.

गिरणीत गेले, गहू दळून आणायला. नुकतीच उघडलेली असावी, कारण यंत्र सुरू नव्हतं. गिरणीवाला मुलगा पेपर वाचत होता. 'दहा-पंधरा मिनिटांत काम सुरू करेन' म्हणाला. मी पुस्तक नेलं होतं ते वाचत बसले. लोक दळणं ठेवून जाऊ लागले. कुणी आगाऊ पैसै दैत होते, कुणी "किती वेळात तयार होईल?" असं विचारत भुर्रकन दुचाकी वळवून जात होते. रस्त्यावरची वर्दळ हळूहळू वाढत होती. गिरणीवाल्या मुलाला फोन आला. "...राहण्याची खोली आतून लॉक झाली आहे त्यामुळे काल आत जाता आलं नाही.." वगैरे हिंदीच्या कुठल्याशा उत्तर भारतीय लहेजातून कुणालातरी सांगत होता तो.
एक आजीबाई आल्या. दळणाचं पोतं काउंटरवर आपटलं. तोऱ्यात सवाल फेकू लागल्या. त्यांच्या अनपेक्षित करड्या आवाजामुळे माझं लक्ष पुस्तकातून बाहेर पडून होऊ घातलेल्या सं'वादा'कडे पूर्णतः खेचलं गेलं -  "काय रे, किती वेळात मिळेल? ..आँ! अजून सुरू नाही केलंस का? ..का!? (काउंटरवरचा पेपर पाहून-) अजून पेपर वाचत बसलास?! काल सुटी झाली ना, मग लागा की आता कामाला...!"
मुलाने कॉल कट केला. काउंटरपलीकडून येऊन अंगावर आदळत असलेल्या त्या खेकसण्याला काय उत्तर द्यावं ते न कळून काही क्षण तो वेंधळला.
त्या दोघांव्यतिरिक्त फक्त मीच होते तिथे. एव्हाना आजी " 'हे लोक' सगळे मेले शिरजोर आणि कामचुकार" ह्या त्यांच्या मताला 'फेलो कश्टमर' या नात्याने मी दुजोरा द्यावा या आशेने माझ्याकडे पाहत होत्या. ते लक्षात येताच मी काही न बोलता "तुम्ही जे वागताय ते बरोबर नाही" या आशयाची अत्यंत बोचरी नजर त्यांच्या नजरेला भिडवली. आजीबाई काहीशा चपापल्या. पण पुन्हा मान फिरवून "दळण अगदी बारीक हवंय, समजलं का...?" इ. गुरगुरतच निघून गेल्या.

दरवेळी थांबून दळण करून घेताना कुणातरी बाईला मी ह्या मुलाशी अरेरावीने बोलताना पाहिलं आहे. तेही मराठीतूनच. एखादी गोष्ट त्याला समजली नाही तरी हिंदीत सांगण्याचा प्रयत्न न करता मराठीतून कलकलत राहतात सगळ्या.
एखाद्या कामाचे पैसे दिले म्हणजे ते काम करणाऱ्याला वाट्टेल तसं वागवण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो आणि कुणी आपल्याकडून पैसे देऊन काम घेत असेल तर आपणही त्यांची नसती अरेरावी, हेकट वागणं सहन करायचं असतं ह्याला कित्येक माणसं 'व्यवहाराचा भाग' समजतात. आपल्यापेक्षा 'वरच्या वर्गातल्यां'कडून जखमा घ्यायच्या, त्यांची ** चाटायची आणि 'खालच्या दर्जा'च्या माणसांना जखमा द्यायच्या, लाथ घालायची असा ठोक हिशेब असतो सगळा.

घडल्या प्रसंगातील दुखरी गंमत अशी की 'कामकरी माणसाचा विरंगुळ्यावर हक्क नसतो' असं त्या गोमट्या आजीबाईचं स्पष्ट मत होतं. अतिवापराने यंत्र खराब होऊ नये म्हणून ते जसं थोडावेळ  बंद ठेवतात तसा तो मुलगा गुरुवारी 'बंद राहिला' होता ना? मग आता यंत्रांमधे यंत्र होऊन रमायलाच हवं त्याने, गिऱ्हाइकाच्या मौल्यवान वेळेतला एकही क्षण 'वाया' न घालवता!

धान्याचं पोतं आणि पैसे काउंटरवर टाकून म्हातारीने 'त्या मुलाला' नाही तरी 'त्याच्यातलं काहीतरी' विकत घेतलं होतं, त्यावर हक्क सांगितला होता. माझ्या केवळ समजूतदार / सहानुभूतीपर वागण्याने त्याला ते परत मिळालं असेल का?

Saturday, October 8, 2016

कितीतरी गोष्टी लक्ष वेधून घेतात, कसल्याही आग्रहाविना लक्षात राहतात. जाणीवजरीची नवी नक्षी रोज मन भरून टाकत असते. डान्स क्लास चालू असताना हॉलच्या मोठ्ठ्या दारातून आत आलेली मोगऱ्याच्या गंधाची मंद लाट, लालचुटुक फरशांच्या जमिनीवर पसरून पुस्तक वाचत घालवलेल्या माध्यान्हवेळा, हो-नाही करत अखेरीस व्हरांड्यात घरटं बांधून राहिलेली बुलबुलची जोडी, लोकांच्या बोलण्याचे आवाज, त्यातील मजेशीर कंपनं,  शब्दांत न मावल्यावर डोळ्यांत उचंबळून येणाऱ्या भावना, कुठल्याही गावी न बदलणारा मारवाड्याच्या दुकानातला वास.... ओठ, पत्रं, अक्षरांच्या तऱ्हा, एकाच गल्लीत चित्रित केल्यात असं वाटवणाऱ्या आर्ट फिल्म्सची जुळवलेली यादी, खूप सारे प्रश्न, खूप नवलाई, पापण्या न मिटता अखंड जागणारा एकाकीपणा ....

जगाच्या व्यवहारात ह्या साऱ्याला स्थानच नाही? गणगोत माझ्या जिवंत असण्याची आणि मरण्याची दखल घेतील कदाचित पण मी काय जगले, अनंत क्षणांचे माझ्या मनावर पडणारे हे विविधरंगी कवडसे... ह्याबद्दल जाणून घेण्यात कोणालाच रस नाही? अनुभव नटव्या अभव्यक्तीत लपेटून बाजारात मांडले जात नाहीत तोवर अर्थपूर्ण नसतात? प्रत्येक अनुभवाचा एक आकलनीय, प्रेक्षणीय आकार घडवायलाच हवा का? अर्धकच्च्या, शिेळ्या-ताज्या, स्पष्ट-धूसर जाणिवांची देवाण-घेवाण किंवा नुसती नोंद करत राहिलो एका कोपऱ्यात बसून तर 'nobody' ठरतो आपण?

 हरकत नाही. पण म्हणूनच आजवर या माणसांत वावरत असूनही, भोवतालाने घडत-बिघडत असूनही मी काहीशी विलग आहे, वेळोवेळी स्वतःला काचेच्या शंखात आकसून घेते. छोट्या-छोट्या गोष्टी नजरेत कोरून घेणाऱ्या, मनावर गिरवणाऱ्या माणसांशी माझं जमतं. ओसाड घराप्रमाणे आगतस्वागताच्या संकेतांशी नातं विसरलेल्या, सरून गेलेल्या काळाच्या खुणा वागवणाऱ्या पुस्तकांशी जमतं. झाडांशी सगळ्यात जास्त गप्पा होतात.

अनुभूतीची कोडी आणि पांडित्यपूर्ण चर्चा मला दोन वेगळ्या कप्प्यांमध्येच ठेवायला आवडतील. दोन्हीच्या चवी मिसळू पाहणं ही गल्लत आहे.

मी कुठल्याही गोष्टीत जीव गुंतवत नाही असं कसं म्हणतोस? - आपल्या नात्यात गुंतवते ना. कसल्याश्या साधनेत अधिकाधिक लीन होत जावं तशी खोल खोल जात राहते. हा सहजप्रवाह म्हणजे काही रिसर्च नव्हे किंवा अवजड कामगिरी नव्हे. ठराविक अर्था-मापाची वस्तू नव्हे. खरंतर हेच उत्तम. कारण आपला संबंध इतरांना उमगला, फर्स्ट पर्सन म्हणून अनुभवता आला किंवा नुसतेच त्यांच्यावर शब्दांचे शहारे उमटवून गेला तर त्यांच्यासाठी त्यात काही कथा राहणार नाही. आणि दुसऱ्या कशाहीपेक्षा माणसं कथांवर जगतात. ...कथाच असतात साऱ्या. अतिशय इटुकपिटुक, नाजूक, तरीही कुणाचेतरी श्वास सामावलेल्या.

Wednesday, August 24, 2016

पिया 'मिलन' की ऋत आई! (जानी दुश्मन) 1979

जुन्या सुपरहिट सिनेमांवर गप्पा मारताना मित्राने सुचवलेला 'जानी दुश्मन' पाहिला. चित्रपटाचा दर्जा अपेक्षेपेक्षा खूपच बरा  निघाला.

वर्तमानकाळातील काही विखुरलेल्या घटना व त्यांचे भूतकाळाशी नाते झटपट दाखवून आपल्याला पुन्हा वर्तमानात आणले जाते. डोंगराळ भागात वसलेलं एक गाव. गावाची वेस शिवमंदिराखालूनच ओलांडावी लागते. लग्न होऊन सासरी चाललेल्या मुलींचे मेणे जेव्हा मंदिराखाली येतात तेव्हा अचानक मेण्यात बसलेली नववधू गायब होते. थांबवता न येणाऱ्या ह्या अभद्र घटनाक्रमामुळे समस्त गावकरी व सहृदयी ठाकूरसाहेब त्रस्त झाले आहेत. अपहरणकर्त्याचा शोध व अनेक नायक-नायिकांच्या छोट्या-मोठ्या प्रेमकथा असा ह्या थरारपटाचा प्रवास आहे.

जे दाखवले आहे त्यापेक्षा अधिक सकस काही देत असल्याचा दावा चित्रपट अजिबात करत नाही. हा प्रामाणिकपणा मला भावला कारण तो पडद्यावर पाहताना निखळ गंमत वाटत होती - शृंगारिक दृश्यांमध्ये अर्धनग्न स्तन दाखवणे, 'कॉश्च्युम' म्हणावे असल्या कपड्यांत काऊबॉय बूट्स घालून वावरणारे तरुण हिरो (सुनील दत्त गिरणीत काम करणातानासुद्धा ह्याच पोषाखात), नायिकांच्या उठावदार चोळ्या,  गावात फॅशनची next level गाठणारा ठाकूरांचा 'बिगड़ा हुआ बेटा' शत्रुघन सिन्हा, अख्ख्या गावात एकच आदिवासी ढंगात राहणारी मुलगी (रेखा) वगैरे.

हा चित्रपट मला काही प्रमाणात नक्की गुंतवू शकला. चित्रपटातील थरार गेल्या काही वर्षांतील कितीतरी बॉलीवूड भयपटांपेक्षा खूप चांगला आहे. प्रत्येक बिदाईच्या वेळी वाजणारे 'चलो रे डोली उठाओ' हे गाणे चित्रपटाची हॉरर थीम बनून जाते. नववधू घरदार मागे टाकून सासरी निघाल्याच्या दुःखापेक्षा वाटेत ज्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे त्याच्या कल्पनेनेच ढसाढसा रडत आहे असे वाटू लागते. कुठल्याही टुकार पॉप्युलर चित्रपटात हमखास आढळणारी आगापिछा सोडून केलेली भरकटगिरी ह्या 'जानी दुश्मन' मधे कटाक्षाने टाळलेली दिसते. शिवाय 'खलनायक कोण' हे रहस्य कायम ठेवण्यात, संशयाची सुई शेवटपर्यंत फिरती ठेवण्यात चित्रपट आपल्या काळाच्या मानाने यशस्वी ठरतो.


 दिग्दर्शक: राजकुमार कोहली
लेखक: इंदर राज आनंद
भाषा: हिंदी
अवधी: 153 मिनिटे

Saturday, July 16, 2016

प्यार जो टूटा, साथ जो छूटा, चाँद न चमकेगा कभी...

परवा रेडिओवर 'प्यार हुआ इकरार हुआ है.. '  लागलं. 

मालूम नहीं है कहाँ मंज़िल 

ह्या परिस्थितीतही

कहो की अपनी प्रीत का गीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी
प्यार जो टूटा, साथ जो छूटा, चाँद न चमकेगा कभी...


अशा आणाभाका एकमेकांना घालणारी ती दोघं - या नात्यातून नक्की काय प्रतिबिंबित होत असे?

एका व्यक्तीला, स्थानाला, कामाला आपलं आयुष्य खुशीने वाहून टाकणं यात काही रोमँटिसिझम उरलाच नाही का आता? मुळात तशी ओढ वाटणं ही नेमकी कशाची उपज म्हणावी - चिवट भावबंध, प्रेम, निष्ठा, की आकांक्षाहीनता, मनाची दुर्बळता, र्‍हस्वदृष्टी?
"हे शहर / गाव आमच्या नशिबाचा भार वाहील. आम्ही आमची मुळं इथे घट्ट रुजवून आहोत आणि असेच राहू. स्थानाचं काही बरंवाईट झालं तर आमचंही होईल, होईना का" - या भावनेला एक जुना, कधीकाळी रोजच्या वापरात असलेल्या वस्तूचा वास आहे, बोटांच्या सततच्या स्पर्शाने झालेली झीज आहे आणि मला वाटतं त्या वासाची संगती ठराविक लोकांनाच लागते. कित्येकांसाठी ती भावना असंबद्ध असल्या कारणाने  रद्दीमोलाची ठरते.

एकीकडच्या संधी आटू लागल्या किंवा दुसरीकडील अधिक चांगल्या संधींच्या हाका भुरळ पाडू लागल्या की तळ हलवायचा. कशाशीच, कुणाशीच जिवाभावाचं नातं निर्माण करायचं नाही, तितका अवसरच द्यायचा नाही स्वतःला आणि दुसऱ्याला. एकही भाषा आपली वाटत नाही. आभाळाचा विशिष्ट तुकडा डोक्यावर घेऊन वावरत असल्याचा भासच होत नाही. टपरीवाला, घरकामवाली ही माणसं न राहता कार्यसंच (functions) बनून जातात. म्हणून 'त्या झाडाखालच्या त्या' टपरीची, 'त्या बोळातील त्या' गिरणीची आठवण होत नाही. नव्या जागीदेखील पन्नास टपऱ्या, किराणामालाची दुकानं, गिरण्या आपल्या सेवेस तत्पर असतात. प्रश्न फक्त function पुरताच उरल्यामुळे पान-सिगारेट देणारा किंवा टेबलावर फडकं मारणारा हात कुणाचा, त्या हाताला जोडलेली व्यक्ती कोण, बदललेली व्यक्ती कोण ह्याच्याशी देणंघेणंच संपतं.
कितीतरी माणसं एक 'समाजघटक' म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण चर्चांचा विषय किंवा त्या अभ्यासातील आकडेवारी बनत जातात - आपण नाती निर्माण करत आहोत, कुठेतरी rooted  आहोत हा भ्रमाचा बुडबुडा निर्माण व्हायला इतकं पुरेसं असतं. बाहेर ठेवलेली दुधाची बाटली आणि वर्तमानपत्र रोज गायब होणं हे बंद दाराआड राहणारी व्यक्ती जिवंत असल्याचं चिन्ह मानावं का?

कशातच श्रद्धा उरली नसल्याचे संकेत आहेत हे. भीतीयुक्त श्रद्धा नव्हे बरं! - काव्य-व्यंगाची, करुणेची किनार असलेली श्रद्धा. टीका-संदेहाच्या पेरणीने खुसखुशीत झालेली श्रद्धा. 'मी कुठेही गेलो तरी जिथं परतून येईन' असं एक ठिकाण. परतून यायला काही / कुणी आहे का आपल्याजवळ? ...तळाव्यात राहून गेलेल्या काट्याचा सल? कुणाच्यातरी अनुपस्थितीमुळे काही अडून राहणं बंदच झालंय का आता? की "कुणामुळे माझं काही अडत नाही" हीच आजच्या जगण्यातून साध्य झालेल्या आत्मगौरवी स्वातंत्र्याची पताका?

नोमॅड्स, लमाण्यांची मुळं ही त्यांच्या स्थलांतरात असतात. 'नया ठिकाना' हीच त्यांची 'परतण्याची जागा' असते. आपल्यासारख्या धेडगुजरी जिणं जगणाऱ्यांचं काय?

Monday, July 11, 2016

NO 1. 11 July 2016, Monday

The black trousers

They effectively absorb / hide dirt and stains without giving off a foul smell.
It is equally comfortable to have them on for long hours.
They do not let me down if I am wearing them during periods.
Pets enjoy rubbing themselves against their texture.
They are unfussy simple to wash and easy to dry. 

I recently lost some weight, so they look somewhat baggy when I wear them now.
We share a very good rapport anyway. I simply wonder how they would feel if I didn't use them anymore for whatsoever whatever reason.
We grow weary of things too fast for no reason - I don't know if this itself is a well good enough reason in itself.

*CORRECTIONS:
color lavender - additions
color red - removals

Thursday, June 23, 2016

जाने भी दो यारों (1983)

'मर्डर मिस्ट्री' या अंगाचा विचार करता फिल्म वेळोवेळी बारीकसारीक गोष्टींत अपेक्षाभंग करते. काही व्यंगजनक सीन्स तितकेसे परिणामकारक नाहीत. काय दाखवायचा प्रयत्न चालू आहे ते दिसतं, पण केवळ 'प्रयत्न' म्हणूनच - बंद प्रेक्षागृहात नाटकाची रंगीत तालीम चालू असताना चुकून / मुद्दामहून रेंगाळलेले बघे असल्यागत वाटतं.

पण महाभारताच्या प्रयोगातील नाट्याचा सीन संपूर्ण सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. स्क्रिप्टप्रमाणे द्रौपदीच्या पात्राचं वस्त्रहरण करण्यासाठी इरेला पेटलेली नटमंडळी आणि आपली 'द्रौपदी' झाकलेलीच राहावी म्हणून धडपडणारी ही मंडळी!

आपण निवड करतो किंवा भूमिका घेतो म्हणजे नक्की काय करतो - कुठला पर्याय निवडणं अशक्य आहे ह्याचा पूर्वविचार करून निवड करतो, की शुद्ध जे हवं आहे त्या आधारावर?
 नासिरुद्दीन (विनोद चोप्रा) आणि रवी (सुधीर मिश्रा) यांची पापभिरूता वरील कसोटीवर घासून पहिली की रंजक निष्कर्ष हाती लागतील. मला आत्ता ते पूर्णतः स्पष्ट होत नाहीएत.दिग्दर्शक: कुंदन शहा
पटकथा: सुधीर मिश्रा, कुंदन शहा
संवाद: रणजित कपूर, सातीश कौशिक
 भाषा:  हिंदी  
अवधी: 132 मिनिटे

Tuesday, March 15, 2016

एक कार्यक्रम

त्या चित्रकाराच्या सर्वच चित्रांना एक सुखद, स्वप्नील झाक असते.  हलाखीचं ग्राम्य जीवन, दारिद्र्य, कष्टाने चिंबलेली शरीरं किंवा रणरणत्या उन्हातील नुसतेच भकास क्षण… साऱ्याला रमणीयतेचा वर्ख लावण्याची गरज काय? की असल्या प्रतिमांची दाहकता कमी करून चित्रकार खरंतर आमच्यावर दया दाखवत होता? कितीतरी दैनंदिन दृष्यांतून संक्रमित होणारी खिन्नता, एकसुरीपण, सैरभैरपण त्या प्रशस्त दालनात घटकाभर विसरायला लावल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानायला हवे होते का? उचित प्रकाश, उचित आरामदायक बैठक, उचित रंगरेषा, अगदी चित्रकाराचंच एक अर्धशिल्प होतं त्याच्या टकलामागचे वळलेले केससुद्धा एकदम बिनचूक! ..मला त्याला हे प्रश्न विचारायचे होते, पण नाही विचारले. त्यानं जे देऊ केलं आहे ते स्वीकारावं की नाकारावं याचा निर्णय अजून कुठे झाला होता? सारंकाही बिनचूक असलं तरी चुकल्याचुकल्यासारखं का वाटतं? हे सुघड, कमानदार अचूकपणाचं रोपटं घरी नेऊन आयुष्यात रोवता येणार नाही म्हणून आपली धुसफूस होते?

समोर कुशनवाल्या खुर्च्यांवर बसलेल्या तिघाचौघांचं बोलणं म्हणजे 'विचार' आणि आपले विचार म्हणजे नुसतीच अक्षतांसारखी, फारसं महत्त्व नसणारी, केवळ प्रथा म्हणून डिवचली जाणारी मतं, असं का? 

नंतर फिल्म, कथा-वाचन आणि मग चहा.
रीतसर योजून व नीटस पार पडूनही कार्यक्रमाला न आलेली फक्कड चव मग तिथे पुढेमागे वाटल्या जाण्याऱ्या चहात पडत असावी - चुकीनेच. असल्या गोष्टी बिनचूकपणाने साधत नसतात. 

Friday, January 29, 2016

'स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर' - चोखेर बाली (Chokher Bali) 2015

Published on letstalksexuality.com

'एपिक' ह्या नव्या दमाच्या, दर्जेदार मालिका प्रस्तुत करण्यासाठी ख्याती पावत असलेल्या वाहिनीवर काही आठवड्यांपासून रवींद्रनाथांच्या कथा-कादंबऱ्यांवर आधारित मालिका सुरु झाली आहे. 'चोखेर बाली' हे त्या मालिकेतील पहिलं पुष्प (पहिली कथा). 

'चोखेर बाली' (अर्थ: eyesore, डोळ्यात खुपणारी, टोचणारी गोष्ट) ही टागोरांची लघुकादंबरी आपल्याला ब्रिटीशकालीन भारतातील बंगाली जीवनाचे, तत्कालीन विधवा परित्यक्तांच्या जीवनाचे, माणसा-माणसांतील भावनिक, प्रणयिक (romance-related) संघर्षाचे कितीतरी कंगोरे दाखवते. कादंबरीचा पसारा प्रचंड नसला तरी कथा फार वळणावळणाची आहे. दिग्दर्शक अनुराग बसूने ती टीव्हीकरता नव्याने साकारताना मूळ कथासूत्रात कित्येक फेरफार, काटछाट केले आहेत आणि व्यतींच्या भावनिक, आंतरिक, प्रणयिक व परस्परसंबंधांतील गुंतागुंतीवर आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं आहे. बसूची ही 'चोखेर बाली', जणू पुरातन शिल्पातून नव्या तंत्राने, नव्या माध्यमात साकारलेलं हे कोरीव शिल्प स्वयंपूर्ण, स्वंतंत्ररित्या सुंदर आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण व्यर्थ तुलना न करता टागोरांची मूळ कृती बाजूला ठेवलेलं चांगलं. 

कथेचा काही भाग इथे समजावून द्यायला हवा: 
श्रीमंती थाटात वाढलेला महेंद्र विनासायास चालून आलेलं सुशिक्षित, कलाकौशल्यनिपुण 'विनोदिनी'चं स्थळ (मुलगी न बघता) "मला लग्न करायचंच नाही" म्हणून नाकारतो. त्याचा घनिष्ट मित्र बिहारीसुद्धा "महेंद्र जे जे नाकारेल ते माझ्या ताटात वाढायचं हा कुठला न्याय!" या भावनेतून विनोदिनीचं स्थळ (न बघताच) नाकारतो. मात्र नंतर बिहारीसाठी सांगून आलेलं स्थळ 'आशालता' महेंद्रला आवडते, बिहारीच्या भावनांचा विचार न करता तो लगोलग तिच्याशी लग्न करण्याचा इरादा पक्का करून मोकळा होतो.  
महेंद्र-आशालता वैवाहिक गोडीगुलाबी, कामसुखात आकंठ बुडून जातात. इतक्यात मुलावर रुसून आपल्या जन्मगावी गेलेली महेंद्रची आई परत येते. सोबत विनोदिनी असते. आतापावेतो लग्न होऊन नवरा अकाली मरण पावल्याने ती तारुण्यातच विधवा झालेली असते. घरात पाऊल टाकताच साऱ्यांच्या डोळ्यात भरलेली - महेंद्रच्या आईला सुनेहून लाडकी वाटणारी; आशालताशी मस्त गट्टी जमवणारी; महेंद्र आणि बिहारीला मोहून टाकणारी - ही विनोदिनी शेवटी साऱ्यांच्याच आयुष्यातलं बोचरं कुसळ, 'चोखेर बाली' का ठरते? 

'चोखेर बाली'तील भावकल्लोळ हृदयस्पर्शी असले तरी गमतीशीर वाटतात. 
…'हा न भेटताच आपल्या नावावर काट मारून गेलेला माणूस आहे तरी कसा?' हे फणकारामिश्रित कुतूहल मनात घेऊन आलेली विनोदिनी. महेंद्रसारख्या उच्चशिक्षित, कलंदर माणसाने आपल्याला झिडकारून साधी गृहकर्तव्यंसुद्धा न जमणाऱ्या भोळ्या पोरीशी सुखाचा संसार थाटावा हे पाहून ईर्ष्येने पोळलेली, परंतु त्याचवेळी आशालताचा भोळेपणा आवडल्याने तिच्याशी मैत्री करणारी विनोदिनी.
महेंद्रच्या मनाचा दुबळेपणा, दुसऱ्यांची पर्वा न करता आपलंच घोडं दामटण्याची वृत्ती, त्याचं अशालताला वाऱ्यावर सोडून अचानक आपल्याभोवती मांजरासारखं  घुटमळू लागणं बघून धुसफुसणारी विनोदिनी.
सद्गुणी बिहारीबाबूच्या नजरेतून आपण उतरू नये म्हणून मनोमन तळमळणारी विनोदिनी. 
पुढे बऱ्याच वर्षांच्या निःशब्दतेनंतर बिहारीला भेटल्यावर, समज-गैरसमजांची जळमटं दूर झाल्यावर 'आपल्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमीच प्रेम होतं' या जाणीवेने सुखावलेली विनोदिनी. पण तरीही 'माझ्या नादी लागून ह्या भल्या माणसाचं आयुष्य फिसकटू नये' म्हणून तडकाफडकी निघून जाणारी विनोदिनी. आपल्या अशा निघून जाण्याने बिहारीच्या मनाला मूक यातना देणारी विनोदिनी. 

यात गमतीचा भाग असा की एक विचित्र गुंतागुंत साऱ्यांनाच वेढत चाललीय हे समजूनही "..पण मग या व्यक्तींनी, या पात्रांनी प्राप्त परिस्थितीत याहून वेगळं करावं तरी काय?" हे कोडं सुटत नाही. ते त्या व्यक्ती/पात्रांनाही सुटत नाही. या पातळीवर पात्रांच्या मनोवस्थेशी आपण समरस होतो. काचेच्या चेंडूत पाण्याबरोबर खालीवर होणारी चमचम पाहत राहावं त्याप्रमाणे जे घडतंय ते शांतपणे बघत राहतो. 

टागोरांना ह्या कादंबरीतून समाजाला काही बोधपर संदेश द्यायचा होता का, व असल्यास तो कोणता ते मला माहित नाही. अनुराग बसूने तिचा केलेला दृकश्राव्य 'अनुवाद' बघून मनात घोंगावणारे प्रश्न खालीलप्रमाणे:
विवाह, वैधव्य इत्यादी समाजाकडून लादण्यात आलेल्या रुढींमुळे, भोवती आखल्या गेलेल्या मर्यादांच्या वर्तुळांमुळे, बाह्य बंधनांमुळे व्यक्तीचं मन कुणाकडे आकर्षित व्हायचं थांबतं का? प्रेम आणि आकर्षणात अंतर असतं तरी किती? लग्न करून आपल्यातील संबंध जाहीर करणं चांगलं आणि लग्न न करता संबंध ठेवणं वाईट? आणि कुणी ठरवायचं हे सगळं? आपलं वागणं, आपले हेतू, कामना, वासना, खोलवर सलणारी आपली दुःखं, जसं की विनोदिनीच्या मनातील एकाकीपणाची वेदना - सगळं आपल्याला तरी नक्की किती समजत असतं? मग दुसऱ्याच्या जगण्याचा निवाडा करणारे आपण कोण? काय अधिकार आहे आपल्याला?
…हे आपलंच आपल्याला न समजणं व त्यामुळे अपरिहार्यपणे दुसऱ्यांनाही न उलगडणं म्हणजेच का 'चोखेर बाली'? 


दिग्दर्शक: अनुराग बसू
मूळ लेखक: रवींद्रनाथ टागोर 
भाषा: हिंदी
अवधी: प्रत्येकी एक तासाचे तीन भाग
प्रसारणकर्ता: एपिक चॅनल