Friday, October 9, 2015

आता लिहायलाच हवं असं वाटतंय खरं, पण काय? कुठून करायची सुरुवात, कुठून आणायची?
माझ्या आतून काय बाहेर पडू बघतंय ते कळतंय तरी का मला?? मी एक टेस्ट-ट्यूब आहे फक्त. कुठलंसं भयंकर रसायन तिच्यात थयथयाट करतंय. माझ्यात जे आहे ते माझं नाही. जे होतं ते कुठे गेलं पत्ता नाही. मग का मोजते मी अधून मधून शरीरावरचे साकळलेले व्रण? का तुझे डोळे काढून खिशात बाळगावेसे वाटतात; आणि तरीही 'या भावी आंधळ्याला चालताना ठेच नाही लागली, त्याचं जगणं अगदीच भंगारात नाही गेलं तर बरं', असं का वाटतं?
सुऱ्याखाली घेतलेल्या प्राण्याबद्दल दयामाया वाटून कसं चालेल! तू कसा हाताळतोस हा प्रकार कुणास ठाऊक!

…जर सगळंच मी आहे तर मी करायचं काय? जायचं कुठे? की पडून राहायचं आहे तिथेच? माझं वेगळं अस्तित्व तरी कशाला हवं मग? आपण तेच करणार आहोत हे एकदा कळल्यावर मागची पानं उलटून बघण्यात काय अर्थ?? आपला डोंगराएवढा पसारा वेचायचा सोडून दुसऱ्यांच्या वागण्याचे हिशेब काहून लावत बसतो आपण?

स्वप्नं बंद करायचं एखादं बटण असेल का कुठे? शरीरात असेल एखादी कळ? कारण जिवंत असल्याची जाणीव नकोशी वाटते. सरळ रस्त्यावर आडवं व्हावं आणि त्यांचे ट्रक, रथ, गाड्या निमूट आपल्यावरून जाऊ द्याव्यात. आपण आटवत असलेलं रक्त मिटक्या मारत पिणारे हे लोक! त्यांनी वाहवलेल्या नद्यांमध्ये संथ डुंबत असलेले आपण! कोण कुणाला भोसकतोय, कुणाची तहान मोठी, कुणाची हौस अफाट.. कळायला मार्ग नाही. 

नेमकं कुठल्या 'मी'च्या वतीने जगायचं रे? जंगलात सैतान माजल्यावर गाणारा पक्षी कुठे जातो? त्यांचं कायमच वाकडं होतं का? की माझ्या पाठीमागे चांगलं जमतं त्यांचं?

एक दिवस सगळ्यांनी सगळे अत्याचार गुमान सहन करायचे ठरवले तर सोय नाही का होणार सगळ्यांची..थोडी-थोडी? एक दिवस लढलो नाही आपण तर? एका दिवसासाठी आपण कोण आहोत-कोण नाहीओत हे स्वतःला पुन्हापुन्हा बजावणं बंद ठेवलं तर? एकदा दारावरच्या भडक स्टिकरकडे लक्ष न देता सहज त्यांची बेल वाजवली तर? - कदाचित आत आपणच बसलेले असू!!

सुंदर गोष्टी निर्माण करण्याआधी विचार तरी करायला हवा होता वेड्या लोकांनी. कुठल्या विश्वासाने खुळावून आपल्या हातात ठेऊन गेले ते ह्या गोष्टी? आपण हे असे दळभद्री, हातात सापडेल त्या व्यक्तीचा, वस्तूचा, पानाफुलांचा चोळामोळा करणारे.. की जाणूनबुजून खेळला त्यांनी हा डाव?

टोकं जाम जुळत नाहीत बुवा. पहाट झाली. स्वप्नांपासून आजच्यापुरती सुटका झाली आणि झोप अंथरुणातच तडफडत राहिली.

Sunday, July 19, 2015

एफटीआयआय - आपल्याला काय पडलंय?

आजचं सरकार सत्तेवर आल्यावर सांस्कृतिक-धार्मिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रांमधे काय-काय घडू शकेल, हे लोक आपल्या कट्टरतावादी विचारसरणीचा रंग देशात जिकडे-तिकडे कसा फासू लागतील याची पूर्वकल्पना आपल्यापैकी बहुतेक विचारी माणसांना होती. त्या सर्व कु-कल्पना, कयास आता सत्यात उतरत आहेत हे तर स्पष्टच आहे. अशावेळी आपण काय करतोय? लोक काय करताहेत?
कट्टरतावादी, मूलतत्ववादी, हुकूमशाहीवादी विचारांचे समर्थक सुखावलेत. संधीसाधू सोकावलेत. पण कुठल्याच मुद्द्यावर ठाम मतं नसणारे, तार्किक वादविवादाची, सखोल चर्चेची अॅलर्जी असणारे, फेसबुक-व्हॉट्सअॅपवर तासन्तास रेंगाळणारे - थोडक्यात तळ्यात-मळ्यात पैकी कुठेच नसणारे लोक काय करत आहेत?

गेल्या एक महिन्याहून अधिक काळ एफटीआयआय (Film and Television Institute of India) च्या विद्यार्थ्यांच्या संप सुरु आहे. आणि त्याबद्दलचे सडाफटिंग, बिनडोक मेसेजेस व जोक्स सर्वत्र भिरभिरत आहेत. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या आदेशाचं (व संचालक मंडळातील अन्य विवादास्पद नियुक्त्यांचं) समर्थन करणाऱ्यांबरोबरच मी मघाशी म्हणलं ती सहसा तळ्यात-मळ्यात नसणारी माणसंसुद्धा ते निरर्थक जोक्स, शिवाय एफटीआयआयमधील विद्यार्थीजीवन, संपातील विद्यार्थ्यांच्या मागण्या, संस्थेचा भूतकाळ वगैरेबद्दलच्या अफवा पसरवण्यास 'उघडलं व्हॉट्सअॅप की कर फॉरवर्ड' असा जोरदार हातभार लावत आहेत.
संबंधित विद्यार्थी, त्यांना परराज्यातून, परदेशातून पाठिंबा दर्शवणारे विद्यार्थी व सिनेक्षेत्रातील मान्यवर, बुजुर्ग निषेध नोंदवत आहेत, संस्थेत येऊन मुलांशी चर्चा करत आहेत. पण लार्जर पब्लिकला, पुण्याच्या तथाकथित अभिरुचीसंपन्न लोकांना ह्या संपाचं, अहिंसक अ-सहकाराचं महत्त्व आणि गांभीर्य उमगलं आहे का? आपल्याला त्याचं काही पडलंय का? एक रसिक म्हणून 'उत्तम' सिनेमे, साहित्य, कलाविष्कार निर्माण व्हावेत ही तळमळ आपल्याला वाटते? ..हो, 'उत्तम' कशाला म्हणायचं यावर मतभेद असू शकतात, परंतु कलाकृती व कलानिर्मितीमागील प्रयोजनं-प्रक्रिया कोणत्याही विशिष्ट प्रचारकी, मूलतत्ववादी विचारधारेच्या प्रभावापासून मुक्त असावीत, 'कला' ही सरकारच्या हातातील बोलकी बाहुली होऊ नये असं तरी आपल्याला वाटतं का? मुळात समाजात कलाविषयक गांभीर्याची पातळी किती आहे?
'चुकार फुरंगटलेल्या पोरांनी चालवलेली मनमानी' समजल्या जात असलेल्या या संघर्षाबद्दल आपल्याला काडीची आत्मीयता वाटते का? - वाटती तर आपण तसले भिकार, दिशाभूल करणारे मेसेजेस न पसरवता या मुलांना व त्यांच्या आंदोलनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यात सक्रिय सहभाग घेण्याची सवड वा आवड नसेल तर किमान बिनबुडाची निंदा तरी केली नसती!
आपल्या न्याय्य हक्कांकरता उभं राहिलेल्या, सरकारला जाब विचारणाऱ्या या मुलांना सर्वप्रथम भवतालच्या समाजाशीच लढावं लागतंय, आपल्याबद्दल पसरलेले गैरसमज दूर करावे लागत आहेत हे मोठं दुर्दैव आहे.
व्हॉट्सअॅपवर फिरणारा तो बंड्याचा 'लॉ कॉलेज रोड'वाला जोक पहा - -
बंड्या म्हणतो मी शाळेत जाणार नाही कारण मला मुख्याध्यापक आवडत नाहीत. बंड्याची आई वडिलांना म्हणते "आतातरी हे  'लॉ कॉलेज रोड'वरचं घर बदला."
ह्यातून चित्र असं निर्माण केलं जातंय की "आमचा आवडता माणूस त्या पदावर बसवा" म्हणून एफटीआयआयची पोरं रुसून बसली आहेत.
पण प्रत्यक्षात बंड्याच्या उदाहरणातून आपली हेकट, शोषणमूलक, वर्चस्ववादी मानसिकता समोर येते: 
- विद्यार्थ्यानं 'भलते' (शिक्षकांची / वरिष्ठांची कोंडी करणारे, त्यांच्या चुकांवर बोट ठेवणारे) प्रश्न विचारू नयेत.
- विद्यार्थ्याला शिक्षकाची पात्रता जाणून घेण्याचा अधिकार नसतो, नव्हे विद्यार्थ्याला अधिकार नसतातच. त्यानं केवळ 'विद्यार्थीधर्म' पाळायचा असतो (= अन्याय होत असल्यास मुकाट्यानं सहन करायचा असतो).
- तेव्हा जो कोणी खाली मान घालून अभ्यास करायचं सोडून वरीलपैकी 'नसते धंदे' करतो तो विद्यार्थी / विद्यार्थिनी आगाऊ, उद्धट. संबंधित संस्थेतून शिक्षण घेण्याची त्याची / तिची लायकी नाही.

विद्यार्थी व शिक्षक, पाल्य व पालक, सरकार व नागरिक ही इथे केवळ नाती नाहीयेत. वर्चस्ववादी धारणेनुसार सर्वच सामाजिक नात्यांत 'एक पक्ष सर्वकाल शोषक व दुसरा पक्ष शोषित राहावा, त्यात समानता येऊ नये' हे कारस्थान असतं. म्हणूनच वरील उदाहरणात आपल्या शाळेचा कारभार पाहणाऱ्या मुख्याध्यापकाने पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत का, त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याची नियुक्ती राजकीय हितसंबंधातून झाली आहे का वगैरे सवाल उठवण्याचा अधिकार बंड्याला नाही! 

एफटीआयआयमधील काही अंतर्गत प्रश्न व समस्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत हे मान्य. पण तसं असल्यास संस्थेच्या खुर्चीवर बसणाऱ्याची शैक्षणिक, व्यवस्थापकीय पात्रता आणखी जास्त हवी! त्याची व्यक्तिगत कारकीर्द आणखी उजळ, उत्तुंग  हवी! परंतु संस्था चांगली चालवण्यात रस आहे कुणाला? किंवा 'चांगलं' म्हणजे काय याबाबत आजच्या सरकारच्या काही प्रतिगामी, कर्मठ कल्पना आहेत व त्या त्यांना येनकेनप्रकारे, लोकशाहीच्या तत्वांना पायदळी तुडवत सर्वांवर लादायच्या आहेत असं म्हणता येईल.

"प्रत्येक सरकार विरोध दडपू बघतं, त्यामुळे तुमचा लढा ठराविक सत्तेविरोधात आहे असं समजू नका" हे संपाला पाठिंबा देणाऱ्या अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेलं मत अगदी योग्य आहे. पण आत्ता, या घडीला एका विशिष्ट विचारसरणीशी त्यांना लढा द्यावा लागत आहे, लढयाचं स्वरूप त्यानुसार आकार घेणार आहे हेही खरं आहे.
'म्रिणाल सेन मार्क्सवादी आहेत, कर्नाड हिंदू-विरोधी तर श्याम बेनेगल भाजपविरोधी आहेत' अशी आगपखड केली जातेय. एक गोष्ट पूर्णसत्य आहे - वरील सर्वजण कट्टरता, मूलतत्ववाद, संकुचितता-विरोधी आहेत. स्वतंत्र विचारांची मंडळी आहेत. आपल्या भूमिका दुसऱ्यावर जुलमाने लादणारे नाहीत. 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ व मोल ते जाणतात. अशा लोकांचा 'बंदोबस्त' करणं, अथवा किमान त्यांची प्रतिमा मलीन करणं ही कायमच हुकूमशहांच्या चेकलिस्टवरची नंबर एकची गोष्ट असते.

जगाच्या कुठल्याही भागातील, कुठल्याही कालखंडातील हुकूमशाहीवादी, मूलतत्ववादी, कट्टरतावादी सत्तेची काही समान लक्षणं असतात हे थोडाबहुत विचार केल्यास आपल्या सहज दिसून येईल:
१. आपल्या सामाजिक, आर्थिक, पारंपारिक अपयशांसाठी विशिष्ट परकीय वा अल्पसंख्यांक वा गैरसोयीच्या समाजघटकांना जबाबदार धरणं
२. "आपला धर्म धोक्यात आहे, आपली संस्कृती धोक्यात आहे, आपल्याला विरोध करणारे लोक आपली जमात नष्ट करायला टपलेले आहेत" अशी अनाठायी भीती जनतेत पसरवणं. जनतेला पॅरानॉइड बनवणं.
३. "संस्कृती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, चांगलं-वाईट वगैरेबद्दलच्या आमच्याच कल्पना योग्य आहेत, त्यावर कोणी टीका करायची नाही" या मानसिकतेला खतपाणी घालणं. समाजातील सहिष्णुता, निकोप चर्चा, निकोप टीका संपवणं, विचारशीलता संपवणं, सर्व तऱ्हेच्या विरोधकांना देशद्रोही ठरवणं.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाही सत्ता समाजमनात एक उदासीनता, एक पिचलेपणाची भावना निर्माण करतात. "तुम्ही धडपड करू नका, आम्ही तुमचं भलं करू, फक्त आम्हाला साथ द्या" म्हणताना - "तुम्ही काहीच करू शकत नाही, सत्तेपुढे तुम्ही क्षुद्र आहात आणि विरोध कराल तर खबरदार!" हा इशारा दिला जात असतो.

कृपया आपल्या बुद्धीवर, तर्कावर, भावनांवर ह्या उदासीनता, वैचारिक हताशपणाची बुरशी चढू देऊ नको या. अनाठायी भीतीला बळी पडू नको या. तात्कालिक आश्वासनांनी भुलून जाऊ नको या. कृपया 'स्वातंत्र्य' (freedom) व 'सहिष्णुता' (tolerance) या शब्दांचे अर्थ विसरून जाऊ नको या, संविधान विसरू नको या.
भारतीय संस्कृतीबद्दलच्या थोतांड, संकुचित कल्पना, विविध प्रकारच्या वैचारिक 'गुंगीच्या गोळ्या' स्वीकारू नको या.
कृपया जागे राहू या. जमल्यास आजूबाजूच्यांनही जागे ठेऊ या.

Sunday, July 12, 2015

दिल धडकने दो (Dil Dhadakne Do) 2015

Published on letstalksexuality.com

"एकपेक्षा जास्त व्यक्ती असलेलं कुठलंही कुटुंब हे अ-स्वस्थ (डिसफंक्शनल), विस्कटलेलं असतंच." - अमेरिकन लेखिका मेरी कार
- "भिन्न व्यक्तिमत्वांची माणसं एका छताखाली राहणार म्हणाल्यावर मतभेद, ताणेबाणे, संघर्ष ओघानं आलेच" असं ही लेखिका सांगू पाहतेय. पण हे जर इतकं सरळ आहे तर कुटुंबातील तंटे इतरांपासून सतत लपवण्यासाठी का धडपडतो आपण? सदासुखी कुटुंबाचा देखावा का निर्माण करू बघतो? शिवाय लोकांसमोर येऊ नयेत म्हणून समस्या सोडवायच्याच नाहीत हे कुठलं लॉजिक आहे? 'आनंदी, समाधानी कुटुंब' म्हणजे तरी काय? कोणी करायची त्याची व्याख्या? 'इभ्रत / प्रतिष्ठा' म्हणजे काय? परिवाराची इभ्रत त्यातील सदस्यांच्या प्रतिष्ठेहून, समाधानाहून मोठी असते?

झोया अख्तर द्वारे दिग्दर्शित 'दिल धडकने दो' कुठलाही उपदेशमूलक आव न आणता वरील सर्व प्रश्नांना हात घालतो.
 सिनेमाची कथा दिल्लीतील धनाढ्य मेहरा कुटुंबाभवती फिरते: उच्चभ्रू, गर्विष्ठ उद्योजक कमल मेहरा (अनिल कपूर), त्याची सदोदित टेचात राहणारी पत्नी नीलम (शेफाली शाह); कर्तृत्ववान, लग्नानंतर दुरावलेली मुलगी आयशा (प्रियांका चोप्रा); वडिलांच्या व्यावसायिक साम्राज्यात अजिबात रस नसलेला, मिश्किल स्वभावाचा कबीर (रणवीर सिंग) आणि बुलमस्टिफ जातीचा (आमिर खानचा आवाज लाभलेला) 'प्लूटो' हा कुत्रा असं पंचकोनी कुटुंब.
कमल मेहराची एकेकाळी यशस्वी असलेली 'आयका' कंपनी सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. दरम्यान आपल्या लग्नाच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त कमल व नीलम यांनी मोजक्या मित्रमंडळींसाठी दहा दिवसांची जंगी भूमध्यसामुद्रिक सागरी सफर आयोजित केलीय. 'दिल धडकने दो' ही त्या सफरीदरम्यान व आगेमागे काय-काय घडतं, जे काही घडतं त्यामुळे मेहरा कुटुंबियांची आयुष्यं कशी बदलतात, नातेसंबंध कसे बदलतात हे सांगणारी नयनरम्य, एंटरटेनिंग आणि तरीही विचारांना गुदगुल्या करणारी, नव्हे चांगलंच डिवचणारी गोष्ट आहे.

कमल व नीलम मेहरा ह्या पात्रांद्द्वारे उतारवयीन जोडप्यातील ताणताणाव अत्यंत प्रभावीपणे रेखाटण्यात आला आहे. त्यांचं लोकांसमोर 'लव्हली कपल' असण्याचं नाटक वठवणं, खाजगीत एकमेकाला मारलेले टोमणे, जळजळीत नजरा, बारीकसारीक गोष्टींत एकमेकाचा पाणउतारा करणं वगैरे दर्शकासमोर येत असतानाच त्या नात्यावर पसरलेलं खिन्न अस्वस्थतेचं सावट सतत जाणवत राहतं.
नीलम मेहराची व्यक्तिरेखा मनातून एकाकी पडलेल्या, लग्नात असूनही 'टाकल्या गेलेल्या' बाईची हतबलता, त्या हतबलतेतून येणारा कडवटपणा, चिडचिड, सतत आनंदी असल्याचं सोंग करून येणारा मानसिक थकवा, नवऱ्याच्या वागण्यातील तुसडेपणामुळे मनात साचणारी (तरीही व्यक्त न करता येणारी) निराशा इत्यादी कितीतरी छटांनी नटलेली आहे. तिच्याबद्दल बोलताना 'तोंडात केक कोंबण्याच्या' सीनची आठवण येणं अपरिहार्य आहे - केकच्या त्या एका तुकड्यासोबत स्वतःच्या परावलंबित्वाची जाणीव, अपमान, संताप अशा कितीतरी भावना ती गिळते!

कमल मेहराला सरळसरळ सिनेमाचा 'पुरुष-वर्चस्ववादी व्हिलन' ठरवून मोकळं होणं प्रत्येकालाच आवडेल, पण ते खरं नाही हे बारकाईने पहिल्यास लक्षात येईल. त्याच्यावरसुद्धा कित्येक प्रेशर्स आहेत. आपल्या 'प्रेम'विवाहातील प्रेम हरवलंय ह्याची त्यालाही अधूनमधून पुसटशी जाणीव होते. त्याचा तो बहुचर्चित 'ड्रेसिंग-गाऊन मधला सीन' आठवा: बायकोने "हातात हात घ्यायचं नाटक कशाला करतोस? इथे लोक नाहीएत बघायला!" म्हणल्यावर तो क्षणभर गोंधळतो, त्याचा चेहरा खर्र्कन उतरतो. एक सेकंदभर त्याच्या डोळ्यांत दुःख तरळून जातं. पण अर्थातच आपल्या टोकाच्या अहंकारी स्वभावामुळे तो सत्य स्वीकारायला तयार नाही. जगापुढे निर्माण केलेल्या स्व-प्रतिमेची त्याला जास्त काळजी आहे.
परस्परांतील या अशक्य झगड्यामुळेच मेहरा पती-पत्नी जवळच्या माणसांचादेखील स्वार्थीपणे वापर करून घेत असावेत. त्यात त्यांचा काही दोष नाही असं मी मुळीच म्हणत नाही, पण ह्या दोन पात्रांना कपटी व निर्दय म्हणताना त्यांच्या मनांततली खोलवरची उद्विग्नता, असहायता नाकारून चालणार नाही.

अर्थात असल्या आई-बापाबरोबर राहताना त्यांच्या मुलांचा जीव गुदमरला नाही तरच नवल. मुलांनी स्वावलंबी व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं अशीच बहुतांश आईबापांची इच्छा असते, पण 'आमच्या नियम व अटींनुसार सारं झालं पाहिजे, आमच्या सुखकल्पनांच्या चौकटीतच मुलांनी आपापलं सुख शोधावं' हा हेकेखोरपणा सोडायला किती पालक तयार असतात/होतात? शिवाय 'पटत नसेल तर घरातून बाहेर हो' अशी धमकीची तलवार मुलांच्या मानेवर सतत रोखलेलीच. आपली मुलं हुशार असावीत पण आपल्यापेक्षा 'स्मार्ट' असू नयेत, त्यांनी आपल्याला शहाणपण शिकवू नये.. थोडक्यात काय, मुलाला स्वतंत्र व्यक्तिमत्व असूच नये! कमल व नीलम मेहरा नेमके ह्याच पठडीतले पालक आहेत हे सिनेमात ठायीठायी स्पष्टपणे जाणवून दिलेलं आहे:

क्रूझ सफरीच्या निमंत्रणपत्रिकेवर आयशाचं नाव नसतं. ती खट्टू होते. कबीर आईवडिलांपाशी तसं बोलून दाखवतो तेव्हा ते म्हणतात, 'ती काही 'मेहरा' नाहीये आता!' - लेकीने कर्तबगारीने उभ्या केलेल्या तिच्या स्वतःच्या कंपनीची भरभराट पाहून बापाचा इगो दुखावला म्हणून तिचं नाव गायब आहे की काय, असा प्रश्न पडायला तिथे खुबीने जागा ठेवलीय.
कबीरला "आम्ही सांगतो त्या मुलीशी लग्न केलंस तर आम्ही तुझं विमान विकणार नाही" अशी ऑफर देणं किंवा आपल्या कार्टीने आपल्या नोकराच्या (मॅनेजरच्या) मुलाशी लग्न करू नये म्हणून आयशा व सनी गिलच्या (फरहान अख्तर) लव्ह अफेअरमधे ढवळाढवळ करून त्यांना विलग करणं - मेहरा पालकांच्या ह्या 'उद्योगां'तून मुलांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याची धडपड उघडी पडते, शिवाय ह्या वर्तनाच्या तळाशी असलेली मानसिक असुरक्षितता दिसते.
बुडीतखाती चाललेल्या 'आयका' कंपनीला नवी उभारी देण्यासाठीची व्यावसायिक बुद्धिमत्ता आपल्या मुलीकडे, आयशाकडे आहे हे माहित असूनही मेहरा पती-पत्नी कंपनीचा उत्तराधिकारी होण्यासाठी  कबीरवर दबाव आणतात ह्यातून ते मुलगा-मुलगी भेदभाव मानतात हेच सूचित होतं, दुसरं काय.

आयशाच्या व्यक्तिरेखेचे कंगोरे अतिशय महत्वपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बायकोला मुठीत ठेऊ पाहणाऱ्या, तिला वेळोवेळी कमी लेखून वर तिच्या अचाट प्रगतीचं श्रेय स्वतःकडे घेऊ पाहणाऱ्या मानव संघा (राहुल बोस) सोबत ती संसार करते. सासूची कटकट सहन करते. आयशा-मानवचा केवळ काही सेकंदांचा अर्धामुर्धा इंटिमेट सीन त्यांच्या वैवाहिक संबंधातील उदासीनता दर्शवतो: मानव जबरदस्ती म्हणावी असं वर्तन तिच्याशी करत नाही, सेक्सची इच्छा नसूनही आयशा त्याला स्पष्ट विरोध करत नाही व दुसरीकडे गुपचूप गर्भनिरोधक गोळ्या घेत राहते!
व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी स्त्री सगळ्याच आघाड्या पोलादीपणे लढवू शकेल असं नाही, 'सासर व माहेरच्या कुटुंबियांचं मन कसं मोडायचं' ही भीती सर्वार्थाने 'मॉडर्न', 'सुपरवुमनला'ही हवं ते मिळवण्यापासून रोखू शकते व त्रासात ढकलू शकते ही वास्तविकता अधोरेखित केली जाणं फार आवश्यक होतं, ते इथे पुरेपूर साधलं आहे.

आपल्याला मानवबरोबरच्या नात्यात रस नाही हे समजावून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना आयशाला तिची सासू, आई-वडील डोळे वटारून पुन्हापुन्हा विचारत असतात, "-पर प्रॉब्लेम क्या है?" - प्रॉब्लेम हा आहे की इतकी वर्षं तुम्हाला स्वतःचे व एकमेकांचे  प्रॉब्लेम्स  समजून घ्यायचेच नव्हते! लोक आपल्याला 'हॅप्पी फॅमिली' समजतात म्हणून त्याच खोट्या धुंदीत जगायचं होतं तुम्हाला!
शेवटी घडायला हवंच असतं त्यानुसार काहीतरी जबरदस्त घडतं. मेहरा कुटुंबीयांना कित्येक वर्षांत न केलेली एक गोष्ट करावी लागते - समोरसमोर येऊन कुठलाही आडपडदा न ठेवता खुलेपणे बोलणं. 'प्रोब्लेम्स आहेत' हे त्यांनी स्वतःशी मान्य केलंच पाहिजे आणि लोकांची बिलकुल पर्वा न करता ते सोडवले पाहिजेत, कारण आपली आयुष्यं आपल्यालाच जगायची आहेत, लोकांना नव्हे.

'दिल धडकने दो'ने सुसूत्र कथानक, चटपटीत संवाद, मुख्य व दुय्यम पात्रांच्या उत्तम सादरीकरणातून--

  • कुटुंबात भांडणं होतात, गैरसमज होतात आणि मग जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आपोआप सारंकाही सुरळीत होतं
  • लग्न करणं, मुला पैदा करणं ह्यातच जीवनाचं सार्थक आहे
  • पालक नेहेमी मुलांच्या भल्यासाठीच झटत असतात 
  • मोठ्यांचं ऐकावं, त्यांचा मान राखावा. त्यांना जास्त कळतं 

-- ह्या बहुसंख्यांच्या मनात आजही रुजलेल्या समजुतींवर जोरदार प्रहार केला आहे. आपण सारी हाडामांसाची माणसं आहोत आणि आपल्या इतकेच आपले सारे नातेसंबंधही मानवी आहेत, त्यांचं उगाच दैवतीकरण करू नये. मानवी स्वभावातील आढेतिढे, मर्यादा मोकळ्या मानाने मान्य कराव्यात ही गोष्ट ठासून सांगितली आहे.
अखेरीस मेहरा कुटुंबीय एकमेकांच्या स्वप्नांचा, इच्छांचा स्वीकार करतात. पण हे 'हृदयपरिवर्तन' तद्दन मेलोड्रॅमॅटिक सिनेमाप्रमाणे 'चुटकी में' घडून आलेलं नसतं. ..समस्या सुटत नाहीत, सोडवाव्या लागतात!


दिग्दर्शक : झोया अख्तर 
लेखक: रीमा कागती आणि झोया-फरहान-जावेद अख्तर 
भाषा: हिंदी 
अवधी: 170 मिनिटे 

Tuesday, June 2, 2015

चार्ली चॅप्लिनच्या लघुचित्रकृती - म्युचुअल्स (Mutuals) 1916-17

(This review was published on ऐसी अक्षरे रसिके मेळवीन on 04.01.2014)

मे 1916 व ऑक्टोबर 1917 दरम्यान चार्लीने 'म्युचुअल फिल्म कॉर्पोरेशन' बरोबर आपल्या सिने-कारकीर्दीतील काही उत्कृष्ट विनोदी मूक-लघुपटांची निर्मिती केली. असे एकूण 12 लघुपट आहेत व तीन मालिकांमधे (एकात चार याप्रमाणे) विभागलेले आहेत.
ह्या मालिका म्हणजे निखळ विनोदाची गम्मतजत्राच.त्या बघताना चार्लीच्या विनोदातील अस्सलपणा सतत जाणवत रहातो. क्वचित काही विनोदी जागांची पुनरावृत्तीही होते पण त्यामुळे आपला एकूण दृष्यअनुभव कंटाळवाणा होत नाही. विनोदी सिनेमावर चार्लीचा जबरदस्त प्रभाव होता, पगडा होता, तो अजूनही आहे; इतका की चार्ली व काही अन्य विनोदवीर, विचारी लेखक-दिग्दर्शक सोडले तर बहुतांश विनोदी चित्रपटांनी नुसती त्यांची नक्कल, कल्पनाचौर्य करण्यात किंवा नसता भंपकपणा करण्यात स्वतःची रिळे, पैसा (आणि दर्शकांचा वेळ, पैसा) वाया घालवली आहेत असं वाटून जातं. पण अर्थातच, हे सगळं मी सांगत बसायला नकोय. आपल्या साऱ्यांना ते ठाऊक आहे. त्याचे सिनेमे न पाहिलेल्या, फक्त एखादी भावमुदद्रा पाहिलेल्या माणसालासुद्धा ते चटकन लक्षात येऊ शकतं. आणि चार्लीबद्दल अपार प्रेम दाटून येतं… हो ना?
तीनही म्युचुअल मालिकांची यादी इथे देत आहे:

'चार्ली चॅप्लिन कार्निवल'
द काउंट
द फायरमन
द वॅगाबाँड
बिहाइंड द स्क्रीन

'द चार्ली चॅप्लिन कॅव्हल्केड'
वन ए. एम. 
द पोन शॉप
द फ्लोरवॉकर
द रिंक

'द चार्ली चॅप्लिन फेस्टिवल'
द अॅडव्हेंचरर
द क्युअर 
ईझी स्ट्रीट
द इमिग्रंट
(हे सर्व लघुपट यूट्यूबवर उपलब्ध आहेत.) 

ह्यापैकी मला भावलेल्या कृतींबद्दल थोडक्यात सांगते.. 

'द वॅगाबाँड' (जुलै 1916)
आपला ट्रँप एका बारमधे शिरतो, व्हायलिन वाजवून पैसे मिळवू पहातो पण प्रतिस्पर्धी वादकांशी झालेलं भांडण चांगलंच अंगाशी आल्याने तिथून धूम ठोकतो. असंच भटकत असताना त्याला दरिद्री जिप्सीजची मोडकळीला आलेली कॅराव्हॅन दिसते. त्यात रहाणाऱ्या आणि इतर जिप्सीजच्या मारहाणीला, छळाला कंटाळलेल्या एका मुलीला चार्ली वाचवतो. कॅराव्हॅनमधे प्रेमळ चार्लीबरोबर थोडया आनंदात दिवस काढत असताना योगायोगाने तिची एका चित्रकाराशी भेट होते आणि 'स्टोरीमें ट्विस्ट' येतो…तुफान गाजलेल्या चार्लीच्या भविष्यातील एका चित्रपटाची बीजं ह्या कथेत सापडतात…अवधी: 24 मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन, एडना परव्हिअन्स, एरिक कँपबेल
लेखन: चार्ली चॅप्लिन, विन्सेंट ब्रायन व मव्हेरिक टेरेल

'बिहाइंड द स्क्रीन' (नोव्हेंबर 1916)
डेव्हिड (चार्ली) फिल्म स्टुडिओतला प्रचंड अजागळ कारभार करणारा मदतनीस आहे. तो आणि त्याचा गॉलिआथ नावाचा मॅनेजर सोडल्यास अन्य मदतनीस शुल्लक कारणावरून संपावर जातात. सिनेमात काम मागायला गेल्यावर डिरेक्टरने हुसकावून लावलेली एक तरुणी मदतनिसाचा पोशाख करते आणि तिला आनंदाने कामावर घेतलं जातं. हा 'नवा मदतनीस' पुरुष नसून स्त्री आहे हे चार्लीच्या लवकरच लक्षात येतं व हे गुपित राखायचं असं ठरतं. आपला चार्ली लगेच तिच्याबरोबर फ्लर्ट करू लागतो आणि तीदेखील त्याच्या प्रेमात पडते. गॉलिआथ त्या दोघांना समलिंगी समजतो व 'कसं पकडलं' म्हणून त्यांची थट्टा उडवतो. परंतु डेव्हिड सेटवर जिकडे-तिकडे भयंकर घोळ घालत रहातो आणि संपावर गेलेले मदतनीस स्फोट करून स्टुडिओ उडवून टाकायचा असं ठरवतात…आता काय करायचं?
…चित्रपटांमधे समलैंगिकतेचे उल्लेख त्या काळात अगदी दुर्मिळ बाब होती - ते सामाजिकदृष्टया निषिद्धच होतं. मात्र ह्या लघुपटात त्याचा विनोदनिर्मितीसाठी थोडा वेळ वापर करून घेतलेला आहे. हे पाहून क्षणभर मला भारतीय सिनेमातील समलैंगिकतेच्या उल्लेखांची आठवण झाली - 'समलैंगिकते'त मुळातच विनोदी वाटण्याजोगं काही आहे असं इथले बहुतांश चित्रपटवाले गृहीत धरतात किंवा सरकारप्रमाणेच तिला गुन्हा समजून या विषयाला स्पर्श करण्यास कचरतात.…पण आता परीस्थिती बदलतीये हे खरं, आणि समलैंगिक नात्यांचा परिपक्वपणे विचार करणारे चित्रपट भारतातही तयार होऊ लागलेत. असो. 'बिहाइंड द स्क्रीन' चा उद्देश समलैंगिकतेवर टीका करणं वगैरे मुळीच नाही, त्यामुळे आपण मूळ विषयाकडे परत यायला हरकत नाही.अवधी: 23 मिनिटे
मुख्य भूमिका: वरील लघुपटाप्रमाणे
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे

'वन ए. एम.' (ऑगस्ट 1916)
एकाच चित्रातले बारकावे आपल्याला हळूहळू उलगडत जावेत तसा अनुभव हा लघुपट देतो. दारूच्या नशेत तर्र झालेला धनाढय माणूस (चार्ली) टॅक्सीने घराशी पोहचतो. गाडीतून नशेत असल्याने गाडीतून बाहेर पडण्यापासून त्याची पंचाईत होऊ लागते. आपल्याच घरातल्या वस्तूंशी 'धाडसाने सामना करून' तो कसाबसा वरच्या माजल्यावरील बेडरूमपर्यंत पोहचतो. अर्धवट नशा उतरलेल्या आणि खूप दमलेल्या चार्लीला शांत झोप मिळेल का?… अवधी:  34 मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे

'द रिंक' (डिसेंबर 1916)
ही आणखी एक गोंडस चित्रकृती. वेटर म्हणून काम करणारा गोंधळ्या-गमत्या चार्ली लंचब्रेक मधे हॉटेलला लागून असलेल्या रिंकमधे स्केटिंग करायला जात असतो. एके दिवशी तिथे त्याची भेट श्रीमंत माणसाच्या अल्लड, तरुण कन्येशी होते. चार्लीपटांतील नेहेमीच्या खोडयांबरोबरच पहाण्याजोगी विशेष गोष्ट म्हणजे चार्लीचं स्केटिंगमधील कसब - लोण्याच्या लादीवर बोट फिरवावं तितक्या सहजतेने तो स्केट करतो!अवधी: 24 मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन, एडना परव्हिअन्स, एरिक कँपबेल व हेन्ऱी बर्गमन(स्त्री-भूमिकेत)
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे

'द क्युअर' (एप्रिल 1917)
चक्राकार प्रवास असलेलं हे एक इटुकलं कथानक. अट्टल दारूडया असलेला चार्ली व्यसनमुक्त होण्यासाठी 'हेल्थ स्पा'मधे दाखल होतो. पण दारूच्या बाटल्यांनी भरलेली एक मोठी ट्रंक त्याने सोबत आणलेली असते. गडबडगुंडया चार्लीची ओळख एका तरुणीशी होते जी त्याला दारू सोडायची प्रेमळ गळ घालते - तो थोडया नाखुशीनेच राजी होतो. स्पा मधील कर्मचारी ट्रंक गुपचूप उघडतात आणि नशेत तर्र होतात. स्पा मालक चिडून सगळी दारू फेकून दयायला लावतो आणि झिंगलेला कर्मचारी (स्वतःच्या नकळत) एक-एक करून सगळ्या बाटल्या औषधी पाण्याच्या तळ्यात फेकतो. त्यानंतर स्पामधील लोकांची काय अवस्था होईल? चार्ली व्यसन सोडायचं आपलं वचन पाळेल का?…अवधी: 31 मिनिटे
मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन, एडना परव्हिअन्स व एरिक कॅँपबेल
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे

'द अॅडव्हेंचरर' (जून 1917)
रोमांचकारी पाठलागानंतर एक कैदी (चार्ली) पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो तो थेट समुद्रातून पोहतच. तो एका किनाऱ्याला लागतो व तिथे अपघाताने समुद्रात पडलेल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींना बुडण्यापासून वाचवतो. त्यातील तरुणी त्याला विश्रांती आणि पाहुणचार देण्यासाठी लागलीच आपल्या घरी नेते. (त्या तरुणीचे वडील कोण असावेत? - एक नामांकित न्यायाधीश!) तिथे चार्ली आपली ओळख सैन्यातील कमांडर म्हणून करून देतो. परंतु दुसऱ्या दिवशी फरारी गुन्हेगाराची बातमी फोटोसकट छापून येते. आणि मग चार्लीचा द्वेष करणाऱ्या एका आमंत्रिताला 'पोल-खोल' करण्याची आयतीच संधी मिळते.… पुढे काय घडतं ते प्रत्यक्षच पहावं!अवधी: 31 मिनिटे
मुख्य भूमिका: वरील लघुपटाप्रमाणे
लेखन: वरील लघुपटाप्रमाणे

ह्या बाराही लघुपटांचा निर्मितीकाळ हा आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक आनंदाचा काळ होता असं चार्ली चॅप्लिननं आत्मचरित्रात म्हणून ठेवलेलं आहे. त्यानं (बहुधा आत्मचरित्रातच) असंही म्हणलेलं आहे: "मुळात मी चित्रपटनिर्मितीच्या धंदयात उतरलो पैसा कमवण्यासाठी. ते करता करता अनाहूतपणे कलानिर्मिती झाली. हे एकून कुणाचा भ्रमनिरास झाला तर त्याला माझा इलाज नाही. सत्य हेच आहे."…हे खुद्द चार्लीनेच स्वतःबद्दल केलेलं वक्तव्य, म्हणून मान्य करायचं. पण इतका अवीट कलाविष्कार केवळ अनाहूतपणे होऊ शकतो ह्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही!!

'मिसिऊ व्हेर्देउ' (Monsieur Verdoux) 1947

(This review was published on ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, on 03.01.2014)

ही आहे एका चलाख आणि तितक्याच प्रांजळ, खरंतर निष्कपट गुन्हेगाराची गोष्ट. कुणी म्हणेल, 'निष्कपट गुन्हेगार' ह्या शब्दांच्या कॉम्बिनेशन मधे भलताच घोळ आहे! - हो, पण मी तरी त्या व्यक्तिमत्वात तेच कॉम्बिनेशन अनुभवलं.

फ्रांसमधील अर्थिक मंदीमुळे बँक कॅशिअर, तसंच एक प्रेमळ पती व पिता म्हणून सामान्य आयुष्य जगत असलेला हेन्ऱी व्हेर्देउ (चार्ली चॅप्लिन) झटक्यात बेरोजगार होतो आणि त्यानंतर स्वतःहूनच आपल्या आयुष्यला एक थरारक वळण देतो. फ्रांसच्या विविध भागांतील श्रीमंत स्त्रियांशी लग्न करणे, त्यांची संपत्ती लुबाडणे आणि वेळ येताच त्यांचा खातमा करणे असे सत्र तो चालू ठेवतो. ह्यात कधीही आपल्या त्रिकोणी कुटुंबाशी तो प्रतारणा करत नाही. फिरतीवर असणारा आपला नवरा किती कष्ट करून मंदीच्या भयावह परिस्थितीतही आपल्याला सुखात ठेवतोय हे पाहून त्याच्या(खऱ्या)बायकोला भरून येत असतं.
परंतु शेवटी हेन्ऱी पकडला जातो व त्याला दोषी ठरवून गिलोटिनवर शिरच्छेदाची शिक्षा सुनावली जाते. कोर्टात व रिपोर्टरने घेतलेल्या मुलाखतीत आपले विचार स्पष्टपणे, मर्मभेदीपणे मांडून कमालीच्या शांतचित्ताने तो शिक्षेला सामोरा जातो...वरवर पहाता इतकीच गोष्ट!

ज्यांनी हा सिनेमा अद्याप पहिला नसेल त्यांनी 'कथा आधीच कळल्यामुळे आपला रसभंग झाला' असं वाटून घेण्याची अजिबात गरज नाही, आणि चार्लीच्या कोणत्याही चित्रपटाला हेच लागू होईल. त्याच्या कथांचा जीव वरकरणी इवलासा वाटतो, त्या ऐकताना अतिसामान्य वाटतात. पण लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनयातून तो ते कथाविश्व ज्या अप्रतिमतेने साकारतो ते पाहून थक्क व्हायला होतं!
ज्या चित्रपटांमध्ये चार्लीने 'भटक्या' (tramp) वठवला नाही, उलट आर्थिक सुस्थितीतील माणसाची भूमिका केली त्यापैकी 'मिसिऊ व्हेर्देउ' हा एक चित्रपट. त्याच्या कलाकृतींमध्ये गरीब-श्रीमंतांमधील सायकॉलॉजिकल, इमोशनल तुलनेला आवर्जून महत्त्व दिलेलं असतं, ते ह्या सिनेमात क्वचितच कधीतरी झर्रकन तरळून जातं. तसंच हास्य-कल्लोळातून पुढे सरकत,(- खेळीमेळीची मारामारी, पाठलाग, चकवे इ.) वेदनेला हळूहळू पाझरू दयायचं असा चार्लीच्या काही चित्रपटांचा रागरंग असतो, मात्र ह्या चित्रपटाला गांभीर्याची किनार थोsडी जास्त आहे. म्हणून तो वेगळा वाटला.

चार्लीच्या स्टाइलनुसार बोलपट असूनही मूकाभिनय, तदानुरुप भावमुद्रा हा चित्रपटाचा गाभा आहे. नशीब, दैव (-त्याला काहीही नाव दया) अनपेक्षितपणे कसे सुखद / उध्वस्त करून टाकणारे धक्के देतं, तरीही जगण्याचा कुठलीही अंतरिम दिशा नसलेला संघर्ष आपण कसा चालू ठेवतो, कसे चाचपडत राहतो त्याचं प्रत्ययकारी चित्रण अन्य चार्लीपटांप्रमाणे ह्या सिनेमात आहेच.
पण 'मिसिऊ व्हेर्देउ' च्या खासियती म्हणायच्या तर, अंशतः थरारपट असूनही ह्या सिनेमात प्रत्यक्ष जीवघेणी झटापट , खुनाचं दृश्य, त्यावेळचं गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरचं ते थंड, क्रूर हास्य, असला प्रकार कुठेही दाखवलेला नाही. असली तद्दन पाचकळ, हिंसक तरीही कथेच्या दृष्टीने बाळबोध दृश्य चार्लीच्या कुठल्याही कृतीत नसतातच. एक सराईत खुनी कसा असू शकतो ह्याबाबतच्या बहुतांश प्रचलित कल्पनांना छेद देणारी अशीच ही हेन्ऱी व्हेर्देउ ची भूमिका आहे. ती प्रत्यक्ष पाहणेच अतिउत्तम.

इथे येनकेनप्रकारे हिरोचा विजय होऊन शेवट गोड होत नाही आणि हीरोला त्याचं शल्यही नाही. कारण आपण लोकांना लुबाडलं, खून केले हे आपलं चुकलं हे त्याला मान्य आहे. हेन्ऱी व्हेर्देउ एके काळी नेकीने पैसे कमावणारा, परंतु ज्यांच्याशी आपला कसलाही थेट संबंध नाही अशा समाजिक उलथा-पालथींमधे भरडला गेलेला माणूस आहे आणि हे असं अनपेक्षितपणे व्यक्तीने आपलं, आपल्या कुटुंबाचं वसवलेलं टुमदार जग उध्वस्त होणं, लोकांचं, कायदा आणि व्यवस्थेचं अत्यंत दुटप्पी, स्वार्थी आणि तत्त्वविसंगत असणं ही त्याची वेदना आहे. म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असताना तो विचारतो, 'मी अनेकांचे खून केले, पण विध्वंसक शस्त्रांची निर्मिती करून तुम्ही काय वेगळं करताय?'
आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा हेन्ऱीचा उद्देश मुळीच नाही, पण आपल्याला शिक्षा ठोठावणारेही ह्या न त्या रीतीने 'अपराधी' आहेत इतकंच म्हणायचं त्याला.

रिवाजाप्रमाणे गिलोटिनवर चढवण्यापूर्वी एक पाद्री हेन्ऱीला भेटायला येतो. तो म्हणतो: "I've come to ask you to make peace with God." 
ह्यावर हेन्ऱीचं उत्तर असतं: "I am at peace with God. My conflict is with Man."दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक (कथा ऑरसन वेल्सच्या कल्पनेवर आधारित आहे) 
व निर्माता: चार्ली चॅप्लिन
भाषा: इंग्रजी 
अवधी: 124 मिनिटे 

Wednesday, May 20, 2015

सिरिंक्स (Syrinx) 1965दिग्दर्शक, अॅनिमेटर: रायन लार्किन
अवधी: 02.56 मिनिटे 
(मूक-लघुपट)

Monday, May 11, 2015

डाउनफॉल / देअऱ् उंटरगांग (Downfall / Der Untergang) 2004

…हिटलरची कीव वाटायला लावणारा चित्रपट. 

नाझिझम आणि हॉलोकॉस्टबद्दलचं साहित्य आणि अन्य कलाकृती अनुभवताना कर्त्याधर्त्या आडोल्फ हिटलरबद्दल विविध टोकाच्या भावना / मनोवैचारिक प्रतिक्रिया उफाळून येत असतात. आतापर्यंत फक्त तीन वेळा, मोजून तीन वेळा मला त्याची कीव (- दया नव्हे) वाटली आहे:  
१. वि. स. वाळिंब्यांचा 'हिटलर' वाचताना. 
२. 'चॅनेल फोर'निर्मित 'सिक्रेट हिस्ट्री' मालिकेतील 'हिटलर्स हिडन ड्रग हॅबिट' हा माहितीपट पाहताना.
३. 'डाउनफॉल' पाहताना. 

दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या दारूण पराभवाला केवळ हिटलरची राक्षसी महत्वाकांक्षा वा वंशवादी अत्याचार कारणीभूत नसून त्याचा आततायी हेकेखोरपणा, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधे प्रारंभीपासून बोकाळलेला भ्रष्टाचार, त्याने टाकलेल्या मूढविश्वासाचा / मूढ अविश्वासाचा निकटवर्तुळातील लोकांनी वेळोवेळी (साहजिकच) उठवलेला गैरफायदा, त्यांच्यातील अखंड सत्तास्पर्धा व हेवेदावे, जिंकून घेतलेल्या प्रदेशांमध्ये जर्मनांनी चालवलेला अंदाधुंद हिंसाचार, आणि नाझी सरकारचा प्रत्येकच निर्णय ज्यांच्या हितासाठी घेतला गेल्याचा दावा करण्यात आला त्या खुद्द जर्मन जनतेला व सैनिकांना, हिटलरच्या 'लाडक्या' पितृभूमीला अखेरीस सोसावे लागलेले अतोनात हाल असे कितीतरी घटक एकत्रितपणे कारणीभूत ठरले. याला 'स्वतःच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगावर पाय पडण्याची' उपमा देणं पसंत करेन मी. 
तेव्हा अशा विविध बाबींचा हिटलरच्या व्यक्तिमत्व व कर्तृत्वाला केंद्रस्थानी ठेऊन उहापोह करणं हे वर उल्लेखलेल्या तीनही कलाकृतींचं आणखी एक समान वैशिष्ट्य म्हणता येईल.
- - -

आजवर युद्धपट पाहणं टाळत आले आहे. कंटाळा येतो, बाकी काही नाही. पण कथा आवडली, विषय जिव्हाळ्याचा असेल तर मी अजिबात कां-कूं करणार नाही हेही तितकंच खरं.

सिनेमच्या सुरुवातीला व शेवटी 1942 ते 1945 दरम्यान फ्युह्ररची खासगी सचिव म्हणून काम केलेल्या ट्राउड्ल युंगच्या (Traudl Junge) युद्धोत्तर काळातील मुलाखतीचा काही भाग दाखवला आहे. कथा अत्यंत गुंतागुंतीची आहे. सिनेमा पाहण्यापूर्वी जर्मनीचे जय-पराजय, खासकरून बॅटल ऑफ बर्लिन आणि फॉल ऑफ बर्लिनसंबंधी थोडं वाचन केल्यास उत्तम (- शिवाय मी सिनेमाची पटकथा आणि हिटलरच्या आत्महत्येपर्यंत 'फ्युह्ररबंकर'मधे राहिलेल्या प्रत्येक बड्या अधिकाऱ्याची व्यक्तिगत माहिती वाचली होती).

जरा विस्कळीतपणेच मला भावलेल्या जागा सांगते:
हिटलरचा मानसिक तोल पुरता ढासळलेला आहे. तो वयाच्या मानाने फारच खंगलेला दिसू लागला आहे. बंकरमधील त्याचा वावर हवेवर सावकाश तरंगत चाललेल्या सडपातळ भूतासारखा भासतो. नकार, माघार, प्रतिप्रश्न, त्याच्या मताविरुद्ध जाणारे हितेषी सल्ले ऐकून घ्यायची त्याची मुळीच तयारी नाही. सैन्याच्या हालचाली जाणून घेण्यासाठी भरवलेली प्रत्येक मीटिंग त्याच्या आक्रस्ताळ्या किंचाळण्यानेच संपते. त्याला स्वतः बर्लिन सोडून पळून जायचं नाहीये, शरणागती पत्करायची नाहीये आणि आपल्या उरल्यासुरल्या तुकड्यांनी व सामान्य नागरिकांनी 'मारिता मारिता मरेतो' झुंजत राहावं असा त्याचा हुकूम आहे - पण कसं? अन्न नाही, पिण्यालायक पाणी नाही, दारुगोळा नावालाच उरलेला, औषधांचा पुरेसा साठा नाही, वीज नाही, दळणवळण, संपर्कसाधनं.. सगळंच ठप्प झालेलं, रोजच्या रोज घरं, इमारती जमीनदोस्त होताहेत… हिटलर मोह्न्क नावाच्या अधिकाऱ्याला मध्यवर्ती शासकीय जिल्ह्याच्या कमांडरपदी नेमतो आणि ऑपरेशन क्लाव्हवित्झ तातडीने अंमलात आणायचं फर्मान सोडतो. मोह्न्क म्हणतो,  "आम्ही प्राणपणाने बर्लिन लढवू, फ्युह्रर. पण तीस लाख बिगरलष्करी, सामान्य नागरिकांचं काय? त्यांना अन्यत्र हलवायला हवं."
हिटलर: "मला कळतंय. पण तथाकथित सामान्यांचा विचार करत बसायची ही वेळ नाही."
मोह्न्क : "पण मग लाखो लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध व आजारी लोकांनी काय करावं?"
हिटलर: "इतक्या अटीतटीच्या लढ्यात कुणीही बिगरलष्करी नसतं."

आपल्या मर्जीतल्या वास्तुविशारद व अधिकारी अल्बर्ट श्पिअरवर नीरो डिक्रीच्या (- शत्रूला आपल्या प्रदेशात आगेकूच करणं महागात पडावं म्हणून आपल्याच अस्थापना व पायाभूत सुविधांचा विनाश करण्याची रणनीति) अंमलबजावणीची जबाबदारी टाकतो. सारासार विचारांती श्पिअर ही जबाबदारी पार न पाडण्याचा व बर्लिन सोडून जाण्याचा निर्णय घेतो, मात्र जाण्याआधी हिटलरची शेवटची भेट घेतो. त्यावेळीसुद्धा फ्युह्ररचा तोच दुष्टाग्रह - "हा अतिकठीण काळ माझ्या नागरिकांची परीक्षा आहे. ते अपयशी ठरले, तर त्यांच्याप्रित्यर्थ माझ्या डोळ्यातून एक टिपूसदेखील गळणार नाही. हीच लायकी आहे त्यांची.  त्यांनीच ओढवून घेतलंय हे, त्यांच्याच नशिबाचे भोग आहेत" !!! 
.. पण दुर्दैवाने हे अगदीच खोटं नाही म्हणता येणार. हिटलरला निवडून कुणी दिला? त्याने दाखवलेल्या सोनेरी स्वप्नांना भुलून राजकीय विरोधकांचा नायनाट करण्यात त्याला सहाय्य कुणी केलं? त्याच्या जहरी ज्यूद्वेषाचा स्वीकार कुणी केला? आपणच ना?

रशियन सैन्य इंच न् इंच लाल बावट्याखाली आणतंय. बर्लिनला वेढा पडलाय. तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु आहे. हिटलर युथची चौदा-सोळा वर्षांची कोवळी पोरं 'बर्लिन राखण्याची शर्थ' करताहेत. त्यातल्या एकाचे वडील तिथे येतात, पोटतिडीकीने म्हणतात "लहान मुलांना घरी सोडा."
एक तरुणी म्हणते, "आम्ही फ्युह्ररच्या नावाने  शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ घेतलीय". 
"पण रक्षण करायला आता उरलंय काय, सांगा ना?"
..त्या माणसाचा मुलगा वडिलांनाच 'भित्रा' म्हणून शिवी घालून निघून जातो. नंतर पराक्रम गाजवलेल्या पोरांना हिटलरतर्फे आयर्न क्रॉसने सन्मानित केलं जातं.
सिनेमाच्या उत्तरार्धात आपलं ठाणं उध्वस्त होऊन सर्वजण मृत्यूमुखी पडलेत हे दिसल्यावर रक्तमांसाचा चिखल तुडवत तो मुलगा घरी येतो - ज्या फ्युह्ररकडून मेडल मिळालं त्याच फ्युह्ररच्या माणसांनी त्याच्याच आदेशावरून लढाईत उतरण्यास नकार दिल्याबद्दल मुलाच्या आईला गोळी घातलेली नी वडिलांना फासावर लटकवलेलं पाहून भडभडून येतं.

बंकरमध्ये प्रत्येकाच्या एकेक तऱ्हा असतात. अधिकारी बरेचदा मद्यधुंद होऊन गप्पा ठोकत बसतात. बर्लिन सोडून जावं म्हणालं तर फ्युह्ररला विचारायची धास्ती. त्याच्या लहरी चक्रमपणाचा वीट आलेला, पण करता काय? त्यात निष्ठेचा भाग किती आणि भीतीचा किती, ते कळायला मार्ग नाही.
इव्हा ब्राउन मजेत असते. बाई तशी धीट. मात्र हिटलरच्या कुठल्याही निर्णयावर आक्षेप घेण्याच्या फंदात पडत नाही. एके दिवशी हिटलर आपल्या विश्वासू सेनानींपुढे  व्यक्तिगत पातळीवर पराभव मान्य करतो (अर्थात, युद्ध थांबवण्याची परवानगी तो देत नाहीच). आत्महत्येच्या तयारीला लागतो. 'मरेंगे तो साथ मरेंगे' हे ठरलेलंच असतं इव्हाचं. विशीतली ट्राउड्ल आणि तिच्या खोलीत राहणाऱ्या दोन कर्मचारी विचित्र भावनिक आंदोलनांतून गुजरत असतात. हिटलरनं तिच्याकडेही 'मोठ्या मनाने' एक सायनाईडची गोळी देऊन ठेवलेली असतेच.
आपले स्वामी आपल्याला कायमचे सोडून जाणार म्हणाल्यावर बंकरमधल्या अनेकांना भावनांचे उमाळे येऊ लागतात. त्यात हिटलरवरची माया किती नी स्वतःच्या आगतिकतेचा विस्फोट किती, त्यांचं तेच जाणोत.

..जर्मनीच्या ह्या हुकुमशहानं शत्रूच्या निरपराध सामान्य नागरिकांची गय केली नाही, ज्यांच्यासाठी राष्ट्र घडवायचा उद्यम केला त्या आर्यन-जर्मन नागरिकांची गय केली नाही, आपल्या सुंदर भूमीची गय केली नाही, आपल्या कुत्र्याची, पत्नीची गय केली नाही.. हिटलरचं प्रेम, त्याची निष्ठा नक्की होती तरी कुणावर? त्याला अभिमान होता तरी कशाचा? त्याचा सगळा आटापिटा स्वतःचे अवास्तव, अतिरेकी मनसुबे पुरे करण्यासाठीच चालू होता शेवटपर्यंत. युद्धानंतर बर्लिनचा चेहरामोहरा बदलून 'वेल्टहाउप्टश्टाट गेर्मानिया' (World Capital Germania) नावाने शहराची पुनर्निर्मिती करण्याचं हिटलरचं स्वप्न होतं,  श्पिअरकडून तसं भव्य, देखणं मॉडेल तयार करवून घेतलं होतं त्याने. अरे बाबा, तू तुझ्या देशाची तरुण पिढी संपवलीस, लाखो कथित 'अनार्यांना' देशोधडीला लावलंस, खलास केलंस.. आता ह्या शोभिवंत राजनगरीत राहणार कोण? - हा प्रश्न पडण्याचा अवसर त्याला मिळालाच नाही म्हणा. किती अदूरदर्शीपणे लोकांवर विश्वास ठेवायचा  हा माणूस! त्यांनी आज्ञाभंग अथवा कुठलीही संतापजनक कृती करेपर्यंत त्यांच्या एकूणएक अपराधांकडे कानाडोळा करत राहायचा आणि मग माथेफोड करत बसायचा. उपयुक्त शंका उपस्थित करणाऱ्यांना, त्याच्या भल्याचे पण विरोधी मताचे सल्ले देणाऱ्यांना हिटलर नालायक समजायचा, त्यांची हकालपट्टी करायचा, परंतु त्याच्यासमक्ष विनम्रतेचा आव आणून पाठीमागे मनमानी करणाऱ्यांना नेहेमीच अभय मिळायचं.

डॉक्टर एर्न्स्ट ग्युंटर शेंकच्या दृष्टीकोनातून काही गोष्टी पाहायला मिळतात. 'होतं-नव्हतं ते सारं गमावलंय तरीही लढण्याचा अट्टहास का', हा प्रश्न बर्लिनच्या भग्नावाशेषांतून फिरताना, छिन्नविच्छिन्न शरीरांवर उपचार करताना त्याच्या चेहऱ्यावर सतत पसरलेला दिसतो. "वेळ आलीच तर रशियनांच्या हाती सापडण्यापेक्षा स्वतःला संपवण्याची शपथ घालून फ्युह्ररनं आपल्या हातांनी माझ्याकडे ही सायनाईडची गोळी देऊन ठेवलीये" असं एक सहकारी जेव्हा काहीश्या गर्वानं सांगतो, तेव्हा आत्महत्यांचं सत्र सर्वत्र चालू आहे हे ठाऊक असूनसुद्धा डॉ. शेंक सुन्न होतो. "..हिटलरनं तुला आत्मघात करण्याची शपथ घातली?" इतकेच उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडतात.

सिनेमाचा शेवट सांगण्याची परवानगी मी देत नाहीये स्वतःला.

डोरोथिआ फॉन श्वानेनफ्लुगेल ह्या बर्लिनमधील प्रत्यक्षदर्शीच्या 'लाफ्टर वॉझन्ट रेशन्ड' पुस्तकातील एका परिच्छेदाचा अनुवाद करून सांगते आणि थांबते:
वीस एप्रिलला, शुक्रवारी हिटलरचा छप्पन्नावा वाढदिवस होता. शहराच्या काळजावर रशियनांनी चालवलेला तोफगोळ्यांचा भडिमार आणि दोस्तराष्ट्रांनी चालवलेले हवाई हल्ले ही त्याला मिळालेली वाढदिवसाची भेट.  आपल्या कडेकोट सुरक्षित बंकरमधून बाहेर पडून चौदा -सोळा वर्षांच्या  'सैनिकां'बरोबर त्यानं थोडा वेळ घालवल्याचं रेडिओवरून सांगण्यात आलं. बर्लिनच्या रक्षणार्थ, फ्युह्ररसाठी प्राणांची आहुती देण्याकरता, एस.एस.मधे भरती होण्याचा  'बहुमान' मिळावा म्हणून ही मुलं स्वतःहून पुढे आली होती म्हणे! किती तो नीच खोटारडेपणा! खरंतर ह्या कोवळ्या पोरांपुढे  दुसरा पर्यायच नव्हता. कारण जी मुलं लपून बसलेली आढळली त्यांना देशद्रोही ठरवून एस.एस. कडून निर्दयपणे फासावर लटकवण्यात येत होतं - 'ज्यांच्या अंगात लढण्याची हिंमत नाही त्यांना जगण्याचा अधिकार नाही', हा धमकीवजा सज्जड इशारा इतरांना देण्याकरता! झाडं नसतील तिथे दिव्याच्या खांबांवर लोकांना फाशी देण्यात येत होतं. पाहावं तिथे सैनिकांना, बिगरलष्करी नागरिकांना, महिला, मुलं, सामान्य माणसांना हिटलरवेड्या टोळीनं 'शासन केलं' होतं. इतःपर लोक जगावेत असं नाझींना वाटत नसावं, कारण त्यांच्या मते युद्ध हरलो यात सगळी चूक आमचीच होती. पुरेसा त्याग न केल्याने, समर्पितवृत्ती न दाखवल्याने आम्ही आमचा जगण्याचा हक्क गमावला होता. सरकार सोडून सारेच दोषी होते. फोल्क्स्टुर्मला (जनसेना) पुन्हा गोळा करण्यात आलं. तेरा वर्षं व त्यावरील सर्व मुलांनी सहभागी होणं बंधनकारक होतं. सैनिक म्हणून जुंपली जाणारी ही लहान पोरं हाच काय तो फौजफाटा उरला होता ना आमच्यापाशी! 


दिग्दर्शक: ऑलिव्हर हिर्शबीगेल (Oliver Hirschbiegel)
भाषा: जर्मन व रशियन 
अवधी: 178 मिनिटे 

Thursday, April 30, 2015

बँबी मीट्स गॉडझिला (Bambi meets Godzilla) 1969
दिग्दर्शक, निर्माता, अॅनिमेटर: मार्व्ह न्यूलंड 
अवधी: 01.31 मिनिटे 
(मूक-लघुपट)

भुवन श्योम (Bhuvan Shome) 1969

नुकताच दूरदर्शनवर 'सेलिब्रेटींग म्रिणाल सेन' नामक दीर्घ माहितीपट पाहण्याचा योग आला, आणि सिनेधनाचा आणखी एक हंडा मिळाला.

कोण हा भुवन श्योम?  प्रामाणिक, तडफदार बाण्याचे, कडक शिस्तीचे रेल्वेतील उच्चाधिकारी. हाताखालच्या माणसांच्या पाठमोऱ्या कुचेष्टेचा, नाकं मुरडण्याचा विषय. चाकरीसाठी बंगाल सुटल्याला कित्येक वर्षं उलटली तरी आपल्या बंगालीपणाचा अभिमान जपणारे एक विधुर गृहस्थ . . .की 'सद्गृहस्थ'? A man or a gentleman? ह्या प्रश्नाचं थेट उत्तर म्रिणाल सेनही देत नाही अन् मीही देणार नाही. असो.
तर एक दिवस श्योमबाबूंना आपल्या (उत्पल दत्त) नीरस दिनक्रमाचा वीट येतो, शिकारीला निघण्याची लहर येते आणि बंदूक, काडतुसं, हंटर सूट-बूट वगैरे टिपटॉप तयारी करून साहेब गुजरातमधील समुद्रकिनारी खगपारध करायला निघतात. किनाऱ्यालगतच्या खेड्यातून स्वारी मजलदरमजल करीत असते. आणि खरंतर येथूनच त्यांच्या स्वभावातील बदलांना सुरुवात होते. अर्थातच सूक्ष्मपणे. श्योमबाबूंची बडदास्त ठेवण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्याची धीट, चुणचुणीत, हसतमुख, परखड मुलगी गौरी (सुहासिनी मुळ्ये) ह्या बदलांना लयबद्ध वेग आणते. कथेचा बटवा छोटुसाच आहे. तो इथेच उपडा केला तर नंतर प्रत्यक्ष पाहताना तुमचा रसभंग होणार. तेव्हा चित्रपटाच्या मला भावलेल्या पैलूंकडे वळते. 

पार्श्वसंगीत काही ठिकाणी अस्ताव्यस्त तर काही ठिकाणी अनावश्यक वाटलं. पण ती मामुली बाब ठरते. एकंदरित 'मनोव्यापारांकडे स्वतंत्र, कल्पनाप्रचुर दृष्टीने पाहणाऱ्या दिग्दर्शकाच्या कथाप्रवाहावर आपल्याला संगीत बांधायचं आहे' याचं संगीतकाराला पूर्ण भान असल्याचा प्रत्यय येतो. प्रारंभीच खडखड-धडधड करत धावणारी रेल्वे / उलटे धावत आहेतसे वाटणारे रूळ आणि रागदारीचं मिश्रण छान जमून आलंय. ..विरळ वनात एकीकडून डौलदर पावालं टाकत येणारा सारस पक्षी, त्याचा कानोसा घेत बंदूक सरसावून बसलेले श्योमबाबू , दुसरीकडून पक्ष्याला वाचवण्यासाठी, श्योमबाबूंचं लक्ष विचलित करण्यासाठी दबकत येणारी गौरीची पावलं आणि मागे वाजणारा घुंगरांचा ठेका (गौरीच्या पायातील घुंगरांचा नव्हे) - हा मला सगळ्यात जास्त आवडलेला सांगीतिक क्षण. 

चित्रीकरणातसुद्धा बरीच गंमतजंमत आहे. मनात काढलेले उद्गार चित्रित करताना फ्रेम अरुंद करून, आयताकृती पट्टीतून क्लोज अप घेतले आहेत. ओठ न हलता व्यक्तिरेखा बोलतेय म्हणजे ती स्वतःशीच बोलतेय हे साऱ्यांनाच समजतं. मग हा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न पडतो. ठीकाय. त्यानं बिघडत काहीच नाही. अॅनिमेशनचे तुकडे भुरभुरवलेत सुरुवातीला. नवीन काहीतरी वापरायचं म्हणून असेल. पण अतिरेक कशाचाच नाही. भूतबंगल्यात तल्लीन होऊन राजाराणीची गोष्ट सांगणाऱ्या गौरीचा सीन मस्त टिपला  आहे. 

सिनेमात प्रेमप्रकरण नाही. श्योमची बायकांकडे पाहण्याची नजर भांबावलेली वाटते. बऱ्याच वर्षांनी किंवा कदाचित प्रथमच होणारं ठुमकत ठुमकत पाणी भरायला चाललेल्या ग्रामीण स्त्रियांचं दर्शन घेताना तो काहीसा थबकलेला, बावचळलेला वाटतो. ग्राम्यगीतांचं मधुर गुंजन कानी पडल्यावर भारावलेला वाटतो. 

'भुवन श्योम' ही कुठल्याच अंगाने अलौकिक हृदयपरिवर्तनाची गोष्ट नाही असं मला वाटतं. कारण सुरुवातीपासून श्योमबाबूंचं व्यक्तिमत्व कुठल्यातरी एका पारड्यात टाकता यावं असं नसतंच. वर्षानुवर्षं चाकोरीबद्ध जगल्याने त्यांच्या स्वभावातील मोकळेपणावर थोडा गंज चढलेला असतो इतकंच म्हणता येईल. शिकारीच्या बेताच्या निमित्तानं रेल्वेरुळांसारख्या सरळसोट, नियमबद्ध, कर्तव्यदक्ष जीवनातून मान वर काढून भोवताली बघायला त्यांना अल्प उसंत मिळते. 'कडक, खडूस साहेब' यापेक्षा सर्वथा वेगळ्या रीतीने आपल्याकडे पाहणाऱ्या लोकांचा सहवास लाभतो. आणि शेवटी शिकार गावली नाही तरी जगण्यातील काही नवे रंग गवसतात. रंग उडवत धावाधाव करणाऱ्याच्या हातून अनवधानाने थोडे शिंतोडे / एखादी धार दुरून जाणाऱ्या वाटसरूला रंगवून जाते तसा हा प्रकार. मोठमोठ्या, पोकळ वल्गना न करता, अतिशयोक्ती न करता, तात्पर्याचा डोस न पाजता, अतिशय संयतपणे गोष्ट उलगडते हे म्रिणालदांचं कसब नी चित्रपटाचं यश. 


दिग्दर्शक: म्रिणाल सेन 
अवधी: 96 मिनिटे 
भाषा: हिंदी 

Sunday, March 15, 2015

एक होता न्हावी.. (स्वीनी टोड: द डीमन बार्बर ऑफ फ्लीट स्ट्रीट) 2007

वस्तुतः ह्या सिनेमावर लिहावं असा विचार नव्हता. अगदी अचानकच ठरलं. ठरलं कसलं, थेट लिहायलाच बसले.  ..impulse की कद्र करना कोई सीखे तो हमसे सीखे :)

"The history of the world, my pet,
is learn forgiveness and try to forget…"

 - या संगीतिकेच्या शेवटच्या सीनमधे स्वीनीच्या तोंडी असलेल्या ओळी. पण ते खरंच शक्य होतं का हो  प्रत्येकवेळी? 'सद्गुण' म्हणून ज्यांचा उदोउदो करण्यात येतो ती नीतिमूल्यं आपण किती गृहीत धरून चालतो! - पण ज्या व्यक्तीवर झालेले आघात तिला प्रेम-दया-क्षमेपलीकडे घेऊन गेलेत ती व्यक्ती कदाचित क्षमेलाही क्षमा करू शकणार नाही. तथाकथित दुर्गुणांना 'अमानुष'तेचं लक्षण म्हणताना आपण मानव असण्याची कित्येक धक्कादायक अंगं धडावेगळी करू पाहतो, आपल्यातील नैसर्गिक पशुत्वापासून पळ काढू पाहतो, हो ना? ..पण स्वीनीला हा नीतिपरायण पळपुटेपणा कधी जमलाच नाही. त्याला मानव म्हणायचं की दानव, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. 

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक असतो न्हावी. त्याचं नाव बेंजामिन बार्कर. लंडनमधील टुमदार घरात बायको-पोरीसह सुखाने नांदत असतो. एके दिवशी शहरातील लंपट न्यायाधीशाची बेंजामिनच्या बायकोवर नजर जाते, तो तिच्या सौंदर्यावर भाळतो. तिला मिळवण्याच्या त्याच्या क्रूर, एकतर्फी हट्टाने सारंकाही बदलतं. 
सिनेमाच्या सुरुवातीला आपल्याला भेटतो तब्बल पंधरा वर्षं खोट्या आरोपांखाली शिक्षा भोगल्यानंतर 'स्वीनी टोड' बनून लंडनला परतलेला न्हावी (जॉनी डेप), पूर्वीचा बेंजामिन बार्कर नव्हे. साचलेल्या राखेखाली धगधगणाऱ्या निखाऱ्यासारखं व्यक्तिमत्व झालंय त्याचं. स्वभाव अबोल, उदास. मनात ज्यांनी सर्वस्व हिरावून घेतलं त्यांना संपवून टाकण्याचा निर्धार. 
फ्लीट स्ट्रीटवरील आपल्या मोडकळीला आलेल्या  घरी पोहचल्यावर स्वीनीची गाठ पडते घराखाली गचाळ पाय शॉप चालवणाऱ्या मिसेस लवेटशी (हेलेना बोन्हम कार्टर). ती 'स्वीनी'नामक मुखवट्यामागच्या 'बेंजामिन'ला पाहताक्षणीच ओळखते (- तिचं बेंजामिनवर फार पूर्वीपासून एकतर्फी प्रेम आहे), त्याला कैदेत टाकलं गेल्यानंतरची हकीकत सांगते. सूड घेण्यात यथाशक्ती मदत करण्याचं आश्वासन देते. लवेट स्वीनीला धीर देते, पूर्वाश्रमीच्या घरात सलून उघडण्यास प्रोत्साहन देते. मात्र हे सर्व करत असताना ती स्वीनीपासून काही सत्यं मुद्दाम दडवून ठेवते. 

स्वीनी स्वतःचं सलून उघडतो. एका जाहीर स्पर्धेत सर्वश्रेष्ठ न्हावी म्हणून तोरा मिरवणाऱ्या आदोल्फो पिरेल्लीला हरवतो. ह्या पिरेल्लीचं खरं नाव डेव्ही कॉलिन्स असून तो पोरवयात स्वीनी ऊर्फ बेंजामिनच्या दुकानात हरकाम्या म्हणून नोकरीस असतो. आता तो स्वीनीची खरी ओळख उघड करण्याची धमकी देऊन मोबदला मागतो. स्वीनीचं डोकं फिरतं आणि तो वस्तऱ्याने पिरेल्लीचा खून करतो. ..मृतदेहाचं करायचं काय? - पण खऱ्या गरजवंताला असले प्रश्न पडत नाहीत; सुपीक डोक्याच्या गरजवंताला तर नक्कीच नाहीत. अठराविश्व दारिद्र्याने हैराण झालेली मिसेस लवेट मीट पायसाठी लागणारं मांस खरेदी करू शकत नाही.. पण मांसच आपल्याकडे चालत येतंय म्हणाल्यावर चिंता कशाला? स्वीनीने त्याच्या गिऱ्हाईकांचे गळे चिरायचे आणि लवेटने त्या मानवी मांसाचे पाय बनवून तिच्या गिऱ्हाईकांची पोटं तृप्त करायची असा त्या दोघांचा गुप्त दिनक्रम होऊन जातो. 
..आख्खी कथा सांगत बसत नाही. तीत बरीच वळणं, खाचखळगे आहेत. आणखी कितीतरी पात्रं आहेत, त्यांच्या व्यथा आहेत, संघर्ष आहेत. नेहेमीप्रमाणे तुम्ही सिनेमा पाहिलंय असं समजून चालेन.

मीट पाईजचं शिसारी आणणारं रहस्य किंवा बेछूट रक्तपाताहूनही अंगावर येतो तो स्वीनीच्या स्वभावातला थंडपणा. ज्यानं पंधरा वर्षांपूर्वी त्याचं कुटुंबच उध्वस्त केलं त्या न्यायाधीशाला (अॅलन रिकमन) ठार करण्यावाचून कुठल्याही गोष्टीत तो रस घेत नाही. तो पिरेल्लीला संतापापोटी नव्हे, तर आपल्या योजनेत हा अडथळा ठरणार हे लक्षात आल्यावर उफाळलेल्या वैतागापोटी मारतो. मिसेस लवेटने सुचवलेल्या गिऱ्हाईकांचे खून पाडण्याच्या युक्तीची तो बिनविरोध अंमलबजावणी करतो व त्या रक्ताळलेल्या, निर्घृण दिनक्रमात स्वतःला अगदी सहज सामावून घेतो. आपण निरपराध लोकांची हत्या करतोय हे चांगलंच ठाऊक आहे, पण त्याचं मन इतकं थकलंय, थिजलंय की त्याबद्दल अपराधी वाटण्याचे किंवा त्यातून विकृत आनंद उपभोगण्याचेदेखील भावनिक त्राण त्याच्यापाशी नाहीत. दुसरीकडे लवेट एकूणातच घाणेरडेपणाला विटलीये. स्वीनीच्या सूडयोजनेबद्दल तिला फारशी आस्था नाही. गाठीस आलेली मिळकत घेऊन कुठेतरी दूर निघून जाण्याची, स्वीनीसह नव्याने आयुष्य सुरु करण्याची स्वप्नं पाहतेय ती. पण त्यासाठी तिनं कपटी डाव खेळलाय.

पात्रांची एकमेकांतील भावनिक गुंतागुंत, जणू दृश्य पातळीवर आपल्याला त्या क्लिष्टतेत घेऊन जाणारे काल्पनिक लंडनमधील निसरडे दगडी रस्ते, अरुंद गल्लीबोळ; वर्तमानातील अहोरात्र अंधारं, कुबट वातावरण आणि स्वीनी ऊर्फ बेंजामिनच्या गतकालीन स्मृतींतलं स्वच्छ-सोनेरी प्रकाशात चमकणारं लंडन यांतला विरोधाभास..
..स्वीनीचं दुर्मुखलेपण, मिसेस लवेटच्या कोमल आकांक्षा व त्यांना असलेली खोट्याची किनार, ते दोघं  भोगत असलेलं आत्ममग्न एकाकीपण; न्यायाधीशाच्या ताब्यात असलेली बेंजामिनची किशोरवयीन मुलगी व स्वीनीला लंडनपर्यंत घेऊन येणारा तरुण खलाशी यांचं प्रेमप्रकरण,  न्यायाधीशाचा लैंगिक हव्यास; पाय शॉपमधे पोऱ्या म्हणून काम करणाऱ्या टोबीला (एड सॅंडर्स) लवेटचा लागलेला लळा आणि या दीर्घ, हिंसक सूडनाट्याचा थरारक शेवट..

वरकरणी दर्शकामधे तशी भावना निर्माण होत असली तरी 'सूडवृत्तीने कधीच, कुणाचंच भलं होत नाही' हे तात्पर्य सांगणं ह्या सिनेमाचा उद्देश नाही असं मला तीव्रतेने वाटतं. अनिश्चितता व मानवी मनात धुमसणाऱ्या कित्येक भावनांनी घडवलेली ही आर्त शोकांतिका आहे.

सुरक्षित वातावरणात, अक्षत जीवन जगताना 'कायदाहातातघेऊनये'वादी सूर लावणं फार सोपं असतं हो. पण जिच्याकडे दाद मागायची ती व्यवस्था ढिम्म बसून तमाशा बघत राहते किंवा तिचेच हात पापाने बरबटलेले असतात तेव्हा दाटणाऱ्या आगतिकतेतून असंख्य विदारक शक्यता जन्मास येतात. मग त्यात गोवलेल्या साऱ्याच आयुष्यांना अटळपणे बरीवाईट कलाटणी मिळते. 'व्ही फॉर व्हेंडेटा', किंवा नव्याकोऱ्या 'एनएच टेन' सारख्या कलाकृतींद्वारे ही वेदनामूलक बारीक नक्षी सुबकपणे रेखली जाते.

एक रसिक म्हणून अनुभवत असलेल्या सर्व कला माझ्या जीवनविषयक दृष्टिकोनात खोलवर बदल घडवत चालल्यात. भावभावनांचे असंख्य पैलू सावकाश दाखवून देत त्या मला उत्तरोत्तर संपन्न करत चालल्यात; अधिकाधिक समंजसही करत चालल्यात बहुतेक.

"स्वीनी टोड.." सारख्या कथा प्रतिशोध, न्याय, द्वेष, त्वेष, हिंसेकडे पाहण्याची माझी नजर बदलतात. नकारात्मक समजून दूर सारण्यात / झाकून ठेवण्यात आलेल्या भावनांना अधिक प्रगल्भपणे विचारात घ्यायला शिकवतात.
सिनेमात एके ठिकाणी मिसेस लवेट स्वीनीला म्हणते:

'..Life is for the alive my dear. We could have a life, us two. 
Maybe not like I dreamed, maybe not like you remember, but we could get by.'

..एखाद्याला ते नाही शक्य होत, काय करणार!


दिग्दर्शक: टिम बर्टन 
भाषा: इंग्रजी
अवधी: 116 मिनिटे 

Tuesday, March 10, 2015

इंडियाज डॉटर (India's Daughter: The Story of Jyoti Singh) 2015

मला अजिबात धक्का बसलेला नाही. रोज पेपरात येणाऱ्या अत्याचाराच्या कित्येक घटनांमधील एका घटनेत शिरून ती अनेक अंगांनी जाणून घेण्याचा अनुभव होता इतकंच. आरोपी आणि त्यांच्या वकिलांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन हा थोड्याफार फरकाने या समाजातील बहुसंख्यांचा दृष्टिकोन  आहे बलात्काराकडे; व्यक्तीने, स्त्रीने कसं जगावं, कसं वावरावं ह्याकडे पाहण्याचा.  त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकताना भवतालच्या कितीतरी लोकांचं, जवळच्या नातेवाईकांचं, समवयस्कांचं, बाबा-बुवांचं, राजकारण्यांचं, 'विचारवंतां'चं वगैरे बोलणं ऐकतेय की काय असंच वाटत राहिलं मला. मी पुन्हापुन्हा स्क्रीनवरचं चलचित्र निरखायाचे, नक्की कोण बोलतंय ते बघायला.. पुढल्या सेकंदाला तिथे एखादा ओळखीचा चेहरा दिसेल असं वाटत रहिलं. धास्ती नव्हे, लाज वाटली - लाज बाळगणाऱ्या, लाजेचा बाऊ करणाऱ्यांची लाज वाटली मला, कायमच वाटते. 
स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत वगैरे म्हणवणाऱ्या समाजाचं नीतिवस्त्र फेडून नग्नसत्याला हात घातलेलं कोणी कसं खपवून घेईल? - "अत्याचार करा, बलात्कार करा, अनिष्ट प्रथा पाळा, पण ते जगाला दाखवू नका, सांगू नका. त्यानं आमची इज्जत जाते, आमच्या संस्कृतीची प्रतिमा डागाळते!" ..त्यामुळे ह्या फिल्मवर घातलेली बंदी अनाकलनीय मुळीच नाही. दुसरीकडे फिल्म पाहायला मिळावी म्हणून आटापिटा करणारे, बंदीला उघड विरोध दर्शवणारे लोकदेखील आहेत.

एनजीओ-चालक, मानसतज्ञ, पोलिस, न्यायालयीन समितीमधील वकील.. सर्वजण आपापल्या परीने त्यांनी गुन्हा कसा हाताळला याची माहिती सादर करतात. लैंगिक अत्याचारामागील मनोवृत्तीला आव्हान देणारं त्यात काहीच नाही. शी. दिक्षित व सो. गांधी यांच्या प्रतिक्रियांमधेसुद्धा काही नवीन नाही...स्वाभाविक आहे म्हणा, दुसरं काय बोलणार? नीतिमूल्यांच्या ज्या मातीतून बलात्कारी घडले त्याच मातीतून आलोत आपण सगळे. आर्थिक सुबत्ता आणि शैक्षणिक डिग्र्या माणसाला केवळ वरवर बदलतात हे मात्र मला कधी नव्हे इतक्या तीव्रतेने जाणवलं. 
आरोपींच्या आप्तांचं ते चिरपरिचित पालुपद - "माझा मुलगा / नवरा हे करूच शकत नाही." 

घटना घडल्यानंतर जनक्षोभ उफाळून येणं साहजिक होतं. तरुणाई रस्त्यावर उतरली. गोळीबार, लाठीचार्ज वगैरे सरकारप्रणित हिंसाचाराला डगमगून न जाता त्यांनी लढा चालू ठेवला. मला त्यांचं कौतुक वाटतं, मनापासून वाटतं. पण कशाविरुद्ध आणि कशासाठी दिला गेला तो लढा? चार लोकांना फाशी जाहीर झाल्याने व कायद्यात सुधारणा झाल्याने ज्या बदलाची नांदी होते त्याचं स्वरूप नेमकं काय असतं? मग नागालँडमधे जेव्हा लोक बलात्काऱ्याला मरेस्तोवर मरतात, किंवा राजस्थानात बलात्कार करू पाहाणाऱ्याचं भररस्त्यात लिंग छाटून टाकतात तेव्हा नेमका काय फरक पडतो? 
व्यवस्थेकडून न्याय मिळणं म्हणजे काय? आणि व्यक्ती/समूहाने न्याय खेचून आणणं म्हणजे काय? दोहोंना कितपत अर्थ आहे? मुळात 'न्याय' ह्या संकल्पनेला कितपत अर्थ आहे? 

ह्या एका घटनेवरून पुढे जाऊया. माध्यमांत होणारं 'अपराधी पुरुष व पीडित स्त्री' हे चित्रण कितपत वास्तवाधारित आहे? 'लैंगिक अत्याचार करणं वाईट्ट' असं आपल्याला का वाटतं, ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे - मुलीचं कौमार्य लुटलं गेलं म्हणून? तिच्याशी कोणी लग्न  करणार नाही म्हणून?कुटुंबाची इभ्रत धुळीस मिळाली म्हणून? मुलावर बलात्कार झाला तर - त्याच्या पौरुषाला सॉलिड मानसिक ठेच लागते म्हणून? की ते प्रकरण फारच विचित्र, छी-छी वाटतं म्हणून? 
वैवाहिक जोडीदाराकडून झालेल्या बलात्काराने त्याच ऊरफुट्या कुटुंबीयांची इभ्रत धुळीस का जात नाही? - तो बलात्कार नसतोच! मेरी वॉलस्टनक्राफ्ट म्हणते 'marriage is legalized prostitution', आणि वेश्येला कुठे असतो स्वतःच्या शरीरावर हक्क? वेश्यांना पाणपोईसारखी 'जनहितार्थ अस्तित्वात असलेली' वस्तू समजतो आपण. 

आपल्या सामाजिक मूल्यांचं बारकाईने निरीक्षण, चिरफाड करण्याची गरज आहे. As a society, have we held up Consent as much as we've held up the Covenant? मुलीवर बलात्कार झाला, ती एका पुरुषाबरोबर हिंडत होती म्हणाल्यावर "त्यांचे परस्परांशी कशाप्रकारचे संबंध होते?" - या प्रश्नाला किंमत देणाऱ्या समाजात राहतोय आपण. समजा तो भाऊ असता तिचा; किंवा ते विवाहित जोडपं असतं तरी त्यानं घडल्या गोष्टीत काय फेरफार झाला असता? 'पतीपरमेश्वर' आहे म्हणून त्या मुलाच्या अंगात दहा हत्तींचं बळबिळ संचारलं असतं की काय? की भावाचं रुपांतर बॅटमॅन वा स्पायडरमॅनमधे झालं असतं?
लैंगिक संबंध ही इथे लग्न होईपर्यंत न उच्चारण्याची आणि लग्नानंतर हक्काने उपभोगण्याची, पोरं पैदा करण्यासाठी कम्पलसरी वापरायची गोष्ट मानली जाते. म्हणूनच म्हणलं, लैंगिक संबंधांबाबत इथे व्यक्तीच्या संमतीपेक्षा (Consent) समाजमान्य कराराला - विवाहबंधनाला (Covenant) अतिरेकी महत्व दिलं जातं. शारीरसंबंध ठेवताना समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या/तिच्या होकार-नकाराचा आदर करणं गौण होऊन बसलंय. अशा परिस्थितीत बदलांना ठोस वळण लागणं फार फार अवघड आहे. 
माझा कायद्यावर विश्वास नाही, शिक्षेद्वारे गुन्हेगारांना नैतिक धडे देण्यावर विश्वास नाही आणि निदर्शनांवरही तितकासा भरवसा नाही. व्यक्ती, तिची विचारप्रक्रिया, तिला पडलेले प्रश्न, त्यांवर घडलेलं सामूहिक मंथन आणि व्यक्तीने घेतलेल्या निर्णयांमधे परिवर्तनाचे संभव दडलेले असतात असं माझं मत आहे.  

सर्वप्रथम 'मी अत्याचाराला बळी पडणं  शक्य आहे, पण मी अत्याचारी असणंदेखील तितकंच शक्य आहे' हे स्वतःशी मान्य करायला हवं. 'बलात्कारी' ही काही विशिष्ट जमात, जात वा पंथ नव्हे. अत्याचार कोणीही करू शकतो, कोणावरही होऊ शकतो. हे कबूल केलं तरच खरंखुरं आत्मपरीक्षण शक्य आहे. दुसऱ्याचं स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजून घेणं व त्याचा आदर बाळगणं महाकठीणकर्म असतं. तरीही त्यादृष्टीने नेटाने प्रयत्न करू लागलो तरच आपण खऱ्या अर्थाने त्या बलात्काऱ्यांपेक्षा किंवा गलिच्छ इंग्लिशमधून अकलेचे तारे तोडणाऱ्या वकिलांपेक्षा वेगळे ठरू. 

..प्रश्नांकडे जाण्यासाठी उद्युक्त करते म्हणून ही फिल्म आवर्जून पहावी. 


दिग्दर्शक: लेझ्ली अडविन 
भाषा: हिंदी-इंग्रजी 
अवधी: 58 मिनिटे 

Tuesday, March 3, 2015

'बर्डमॅन' (Birdman or The Unexpected Virtue of Ignorance) 2014

कलाकाराला आयुष्यात, आयुष्याकडून, 'माणसां'कडून काय हवं असतं? आणि माणसांना कलाकाराकडून कोणत्या अपेक्षा असतात? - अर्थात याचं एकच जनरल उत्तर नसणार. व्यक्तिपरत्वे, कलाकारापरत्वे ते बदलत जाणार. ..की खरंतर आपल्याला नक्की काय हवंय ह्याचाच शोध घेत असतो प्रत्येकजण?

सिनेमा पाहून झाल्यावर 'ब्लॅक स्वान'ची प्रकर्षाने आठवण आली. काही वेळ तुलना होत राहिली आणि वाटून गेलं की 'ब्लॅक स्वान' ही अधिक तरल, सूक्ष्मपणे हाताळलेली कृती होती. पण - नंतर माझ्या या मताचे संभाव्य छुपे पदर लक्षात येऊ लागले - मला तो जास्त सरस वाटला या मागे इतरही अनेक कारणं असू शकतात: माझं बॅले नृत्यप्रकारावरचं प्रेम, कचकडी सुपरहिरो फिल्म्सचा तिटकारा (अपवाद: 'डार्क नाईट' व तत्सम) वगैरे. हा तर 'बर्डमॅन'वर सरळसरळ अन्याय ठरेल! मुळात अशी दर्जाविषयक तुलना सुरु झाली ती दोन्ही चित्रपटांच्या कथावस्त्रातील समान धाग्यामुळे - कलाकाराने आत्मशोधाच्या ओघात /सृजनात्मक सिद्धीच्या हेतूने काही अचाट, टोकाची कृती करणं. आणि त्या तुलनेला तिथेच लगाम बसला. 'ब्लॅक स्वान' मधे आपण नीनाच्या (नेतली पोर्टमन) नजरेतून जगाकडे पहात असतो. प्रत्येक प्रसंग तिच्या मनात घडतो आहे की ज्याला आपण 'वास्तव' म्हणतो त्या अवकाशात घडतोय असा संभ्रम निर्माण होतो. कथा पुढे नेण्यात अन्य पात्रं व अल्टर्ड, रिपीटेड सिक्वेन्सेस महत्वाची भूमिका बजावत असले, त्यांचा नीनाच्या मनावर प्रभाव पडत असला तरी जे काही करायचंय ते तिला करायचंय. तिच्यावरचं हे दडपण तिला-आपल्याला स्पष्ट जाणवतं. शेवटी मनासारखं 'परफेक्शन' गाठण्यात तिचा मानसिक गुंताच तिच्या मदतीला येतो, आणि तिचा जीवही घेतो.
'बर्डमॅन'मधे आपण बर्डमॅनच्या नजरेतून रीगनकडे (मायकल कीटन), रीगनच्या नजरेतून बर्डमॅनकडे, पब्लिकच्या नजरेतून कधीकाळी बर्डमॅन म्हणून गाजलेल्या नी आता तगून राहण्यासाठी धडपडणाऱ्या म्हाताऱ्या अभिनेत्याकडे, मुलीच्या व पत्नीच्या नजरेतून व्यवसायाने अभिनेता असलेल्या माणसाकडे, अभिनेत्याच्या (एडवर्ड नोर्टन) नजरेतून अभिनयाकडे.. अशा कितीतरी उड्या मारतो. तळ्यांत-मळ्यांतचा खेळ इथे न संपणारा आहे. परंतु कथा रीगनच्या डोक्यात घडण्याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व सो कॉल्ड 'वास्तवा'त घडण्याला आहे.

रीगनच्या देहातील 'बर्डमॅन'नामक आत्मा रमणीय चित्रासारख्या वाटणाऱ्या शहरावरून दिवसरात्र घिरट्या घालण्यासाठी, दुष्टांशी दोन हात करण्यासाठी, आपल्या देहधराला करोडो कमावून देण्यासाठी आसुसलाय हे दिसतंच. पण 'रीगन'ला नेमकं काय हवंय? टाईपकास्टिंग होण्याच्या भीतीने 'बर्डमॅन फोर'ला नकार दिल्याचा आता पश्चात्ताप होतोय? मग तो खर्जात भुणभुणणाऱ्या डोक्यातल्या आवाजाचं म्हणणं का ऐकत नाही? पुनरागमनाची तयारी का करत नाही?
"कलेबिलेचं नाव काढू नका. स्वतःचं अस्तित्व जाणवून देण्यासाठी सगळा आटापिटा चाललाय तुमचा. कारण इतर कोणाहीप्रमाणे एक व्यक्ती म्हणून जिवंत असतानाच लुप्त होण्याची भीती वाटते तुम्हाला.." वगैरे कटूसत्यं ऐकवणाऱ्या सॅमला (एमा स्टोन) वडिलांनी ट्वीटर/फेसबुक वर जावं असंतरी का वाटतं? आपलं अस्तित्व इतरांना वारंवार जाणवून देण्याचा हा मार्ग तिला पटतो का? तिच्या हतबलतेला कितीतरी छटा आहेत.

"माझं अभिनयकौशल्य सुपरहिरोपटांपुरतं सीमित नाहीये" किंवा मुळात "मला अभिनय करता येतो" हे सिद्ध करून दाखवायचा अट्टहास चालू ठेवायचा की 'बर्डमॅन'सारख्या महत्वाकांक्षी हितचिंतकाचा सल्ला ऐकायचा यामधून रीगनला रोज निवड करावी लागते. कुठल्या प्रेक्षकांना खूष करण्यासाठी झटायचं, कुणीतरी सर्वोत्तम ते देण्यासाठी आपल्यासमोर रक्ताचं पाणी करतंय याने प्रेक्षकांना फरक पडतो तरी का? ह्या प्रश्नांशी रोज भिडावं लागतं. पण प्रकरण इतकं सरळसोट नाहीये. बर्डमॅन रीगनचा एक आत्मा, एक आवाज होऊन गेलाय. तो रीगनचा आमविश्वास न गमावलेला स्व आहे; वयापुढे, लोकमतापुढे, बऱ्या-वाईट अनुभवांपुढे न झुकलेला स्व आहे; उडताना चेहऱ्याला स्पर्शणाऱ्या वाऱ्यासारखी ती एक अल्हाददायक, जादुई संवेदना आहे. हे रीगनला चांगलंच ठाऊक आहे. तरीही तो बर्डमॅनला डोक्यातून काढून टाकण्याचा खटाटोप का करत असेल? शिवाय सायकोकायनेसिससारख्या मायावी अनुभवांनी सुखावून का जात असेल?
गंमत अशी, की 'मला बाहेर काढ, पुन्हा जगापुढे आण' हा धोशा लावलेला असूनही हाती घेतलेला नाट्यप्रकल्प नेटाने पुढे नेण्याचं मानसिक बळ बर्डमॅनच त्याला अप्रत्यक्षपणे पुरवत राहतो.

सिनेमाला दोन क्लायमॅक्स आहेत असं मी म्हणेन. रीगन स्वतःवर गोळी झाडून घेतो तो पहिला. हॉस्पिटलमधे शेवटच्या काही सेकंदांत जे घडतं तो दुसरा. प्रेक्षकांकडून, समीक्षकांकडून झालेली वाहवा.. अभिनयातील नव्या संधींची उघडलेली दारं.. हा विजय कुणाचा?
कमोडवर बसलेल्या बर्डमॅनशी रीगन जसा वागतो ते पाहून "चला, शेवटी माणसानं भुताला मनातून पुरतं फ्लश करून टाकलं !" म्हणून आपण सुस्कारा सोडतो आणि क्षणार्धात..
सॅमला खिडकीतून काय दिसतं?

..आपल्याला स्वतःकडून नक्की काय हवं असतं?


दिग्दर्शक: आलेहान्द्रो इन्यारितो (Alejandro Iñárritu)
भाषा: इंग्रजी 
अवधी: 119 मिनिटे 

Friday, February 20, 2015

द इमिटेशन गेम (The Imitation Game) 2014

हा माणूस, हा सिनेमा माझ्या डोक्यातून जातच नाहीये. त्याला विसरणं शक्य नाही. त्याची आठवण न येणं शक्य नाही. त्याचा थांग लागणंही शक्य नाही. ..पण तळ गाठून धड परत आलंय कोणी? कोण सोडवणार गुंतेउत्तरं हवीयेत कुणाला? आणि हवी असली तरी ती आभाळातून पडणारेत थोडीच ( - कसे वर्षानुवर्षं डोळे लाऊन बसतात लोक! कधीकधी त्यांची चिकाटी थक्क करून जाते.) ? 
कोडी सोडवणारा जादूगार तो होता. आम्हाला कोडी पडली तरी पुष्कळ. 
आपण फक्त अर्थ लाऊ शकतो, तर्क करू शकतो. आपापले दृष्टिकोन बंद मुठीसारखे टेबलावर आपटत वाद घालू शकतो. सभा संपली की खुर्च्या टुरटुर सरकवून बाहेर सटकू शकतो. एखादं माणूस कळणं म्हणजे तो माणूस जगणं. त्याचा श्वास अन् श्वास, त्याचे ध्यास, त्याच्या वाट्याला आलेले त्रास.. ती परिचर्चा किंवा मैफल नसते - मान दुखायला लागली, पायाला मुंग्या आल्या, डोकं जड झालं की उठून जात येत नाही तिथून. तिथे मध्यंतर नसतं. एखाद्याला जाणणं, समजून घेणं म्हणजे जणू भयंकर पेटलेल्या घरात शिरणं. इंच न इंच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना 'आत/बाहेर' असं काही उरतं तरी का? ..हे दिव्य कुणाला जमायचं? मग सहवेदनेचा अभिनिवेश कशाला? 
कलाकृती अशा कल्पनातीत अनुभवांची कल्पित झलक देऊ करतात, इतकंच. त्यासाठी त्यांचे आभार मानावे तितके थोडे. 

दैव (- असतं की नसतं ते ठाऊक नाही), आजूबाजूची माणसं, एम्प्लॉयर्स, कायदा, शासनव्यवस्था.. एखाद्या व्यक्तीवर चहुबाजूंनी अन्याय का व्हावा? आणि हा अन्याय पचवत, दबून न जाता, विझून न जाता आपल्या वेड्या स्वप्नांच्या वाटेवर एकाकी पावलं टाकत राहणाऱ्या, इतिहासाला कलाटणी देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावं?  ..खरंच दिग्मूढ होतो आपण. "आय कान्ट जज यू" इतकंच म्हणू शकतो, त्या पोलिसासारखं. 
युद्धकाळातील आपल्या बहुमोल योगदानाबद्दल अवाक्षरसुद्धा न काढता जगावं लागलं या माणसाला; त्यादरम्यान ज्यांच्याशी मैत्री जुळली त्या सहकाऱ्यांचं तोंडही बघता आलं नाही आयुष्यभर. नुसतं संहाराच्या गुपितांचं ओझं वागवत राहायचं. आसपास माणसं असतील तर गुपितांना 'गुपित' म्हणून काही अर्थ असतो. पण नाही, प्रश्न फक्त राजकीय/सैनिकी गुपितांचा नाहीये. त्याला स्वतःलाच एक गुपित होऊन जगायला भाग पाडलं आपण. त्याचं मन कसं दिसत असेल - सतत आवळून-आकसून काळंनिळं पडलेलं?

आपण काय दिलं त्याला? - मला डसतो हा प्रश्न, छळतो हा विचार. समलैंगिक असल्याबद्दल कैद किंवा केमिकल कॅस्ट्रेशन? - ही किंमत होती त्याच्या कामाची? त्याच्या असण्याची? - अॅलन ट्युरिंगच नव्हे, कोणाच्याच पदरात पडू नयेत असे भोग, यातना! ..का? का? 
आपण रडू शकतो. आपण रडू या. घसा दुखेपर्यंत, कान लाल होईपर्यंत, नाक-तोंड गळेपर्यंत रडू या.

Alan Turing - Wikipedia

The Imitation Game - Official Trailer दिग्दर्शक: मोअ्तन जेल्दम (Morten Tyldum)
भाषा: इंग्रजी 
अवधी: 114 मिनिटे