Friday, February 20, 2015

द इमिटेशन गेम (The Imitation Game) 2014

हा माणूस, हा सिनेमा माझ्या डोक्यातून जातच नाहीये. त्याला विसरणं शक्य नाही. त्याची आठवण न येणं शक्य नाही. त्याचा थांग लागणंही शक्य नाही. ..पण तळ गाठून धड परत आलंय कोणी? कोण सोडवणार गुंतेउत्तरं हवीयेत कुणाला? आणि हवी असली तरी ती आभाळातून पडणारेत थोडीच ( - कसे वर्षानुवर्षं डोळे लाऊन बसतात लोक! कधीकधी त्यांची चिकाटी थक्क करून जाते.) ? 
कोडी सोडवणारा जादूगार तो होता. आम्हाला कोडी पडली तरी पुष्कळ. 
आपण फक्त अर्थ लाऊ शकतो, तर्क करू शकतो. आपापले दृष्टिकोन बंद मुठीसारखे टेबलावर आपटत वाद घालू शकतो. सभा संपली की खुर्च्या टुरटुर सरकवून बाहेर सटकू शकतो. एखादं माणूस कळणं म्हणजे तो माणूस जगणं. त्याचा श्वास अन् श्वास, त्याचे ध्यास, त्याच्या वाट्याला आलेले त्रास.. ती परिचर्चा किंवा मैफल नसते - मान दुखायला लागली, पायाला मुंग्या आल्या, डोकं जड झालं की उठून जात येत नाही तिथून. तिथे मध्यंतर नसतं. एखाद्याला जाणणं, समजून घेणं म्हणजे जणू भयंकर पेटलेल्या घरात शिरणं. इंच न इंच आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना 'आत/बाहेर' असं काही उरतं तरी का? ..हे दिव्य कुणाला जमायचं? मग सहवेदनेचा अभिनिवेश कशाला? 
कलाकृती अशा कल्पनातीत अनुभवांची कल्पित झलक देऊ करतात, इतकंच. त्यासाठी त्यांचे आभार मानावे तितके थोडे. 

दैव (- असतं की नसतं ते ठाऊक नाही), आजूबाजूची माणसं, एम्प्लॉयर्स, कायदा, शासनव्यवस्था.. एखाद्या व्यक्तीवर चहुबाजूंनी अन्याय का व्हावा? आणि हा अन्याय पचवत, दबून न जाता, विझून न जाता आपल्या वेड्या स्वप्नांच्या वाटेवर एकाकी पावलं टाकत राहणाऱ्या, इतिहासाला कलाटणी देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावं?  ..खरंच दिग्मूढ होतो आपण. "आय कान्ट जज यू" इतकंच म्हणू शकतो, त्या पोलिसासारखं. 
युद्धकाळातील आपल्या बहुमोल योगदानाबद्दल अवाक्षरसुद्धा न काढता जगावं लागलं या माणसाला; त्यादरम्यान ज्यांच्याशी मैत्री जुळली त्या सहकाऱ्यांचं तोंडही बघता आलं नाही आयुष्यभर. नुसतं संहाराच्या गुपितांचं ओझं वागवत राहायचं. आसपास माणसं असतील तर गुपितांना 'गुपित' म्हणून काही अर्थ असतो. पण नाही, प्रश्न फक्त राजकीय/सैनिकी गुपितांचा नाहीये. त्याला स्वतःलाच एक गुपित होऊन जगायला भाग पाडलं आपण. त्याचं मन कसं दिसत असेल - सतत आवळून-आकसून काळंनिळं पडलेलं?

आपण काय दिलं त्याला? - मला डसतो हा प्रश्न, छळतो हा विचार. समलैंगिक असल्याबद्दल कैद किंवा केमिकल कॅस्ट्रेशन? - ही किंमत होती त्याच्या कामाची? त्याच्या असण्याची? - अॅलन ट्युरिंगच नव्हे, कोणाच्याच पदरात पडू नयेत असे भोग, यातना! ..का? का? 
आपण रडू शकतो. आपण रडू या. घसा दुखेपर्यंत, कान लाल होईपर्यंत, नाक-तोंड गळेपर्यंत रडू या.

Alan Turing - Wikipedia

The Imitation Game - Official Trailer दिग्दर्शक: मोअ्तन जेल्दम (Morten Tyldum)
भाषा: इंग्रजी 
अवधी: 114 मिनिटे 

No comments:

Post a Comment