Sunday, March 15, 2015

एक होता न्हावी.. (स्वीनी टोड: द डीमन बार्बर ऑफ फ्लीट स्ट्रीट) 2007

वस्तुतः ह्या सिनेमावर लिहावं असा विचार नव्हता. अगदी अचानकच ठरलं. ठरलं कसलं, थेट लिहायलाच बसले.  ..impulse की कद्र करना कोई सीखे तो हमसे सीखे :)

"The history of the world, my pet,
is learn forgiveness and try to forget…"

 - या संगीतिकेच्या शेवटच्या सीनमधे स्वीनीच्या तोंडी असलेल्या ओळी. पण ते खरंच शक्य होतं का हो  प्रत्येकवेळी? 'सद्गुण' म्हणून ज्यांचा उदोउदो करण्यात येतो ती नीतिमूल्यं आपण किती गृहीत धरून चालतो! - पण ज्या व्यक्तीवर झालेले आघात तिला प्रेम-दया-क्षमेपलीकडे घेऊन गेलेत ती व्यक्ती कदाचित क्षमेलाही क्षमा करू शकणार नाही. तथाकथित दुर्गुणांना 'अमानुष'तेचं लक्षण म्हणताना आपण मानव असण्याची कित्येक धक्कादायक अंगं धडावेगळी करू पाहतो, आपल्यातील नैसर्गिक पशुत्वापासून पळ काढू पाहतो, हो ना? ..पण स्वीनीला हा नीतिपरायण पळपुटेपणा कधी जमलाच नाही. त्याला मानव म्हणायचं की दानव, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. 

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक असतो न्हावी. त्याचं नाव बेंजामिन बार्कर. लंडनमधील टुमदार घरात बायको-पोरीसह सुखाने नांदत असतो. एके दिवशी शहरातील लंपट न्यायाधीशाची बेंजामिनच्या बायकोवर नजर जाते, तो तिच्या सौंदर्यावर भाळतो. तिला मिळवण्याच्या त्याच्या क्रूर, एकतर्फी हट्टाने सारंकाही बदलतं. 
सिनेमाच्या सुरुवातीला आपल्याला भेटतो तब्बल पंधरा वर्षं खोट्या आरोपांखाली शिक्षा भोगल्यानंतर 'स्वीनी टोड' बनून लंडनला परतलेला न्हावी (जॉनी डेप), पूर्वीचा बेंजामिन बार्कर नव्हे. साचलेल्या राखेखाली धगधगणाऱ्या निखाऱ्यासारखं व्यक्तिमत्व झालंय त्याचं. स्वभाव अबोल, उदास. मनात ज्यांनी सर्वस्व हिरावून घेतलं त्यांना संपवून टाकण्याचा निर्धार. 
फ्लीट स्ट्रीटवरील आपल्या मोडकळीला आलेल्या  घरी पोहचल्यावर स्वीनीची गाठ पडते घराखाली गचाळ पाय शॉप चालवणाऱ्या मिसेस लवेटशी (हेलेना बोन्हम कार्टर). ती 'स्वीनी'नामक मुखवट्यामागच्या 'बेंजामिन'ला पाहताक्षणीच ओळखते (- तिचं बेंजामिनवर फार पूर्वीपासून एकतर्फी प्रेम आहे), त्याला कैदेत टाकलं गेल्यानंतरची हकीकत सांगते. सूड घेण्यात यथाशक्ती मदत करण्याचं आश्वासन देते. लवेट स्वीनीला धीर देते, पूर्वाश्रमीच्या घरात सलून उघडण्यास प्रोत्साहन देते. मात्र हे सर्व करत असताना ती स्वीनीपासून काही सत्यं मुद्दाम दडवून ठेवते. 

स्वीनी स्वतःचं सलून उघडतो. एका जाहीर स्पर्धेत सर्वश्रेष्ठ न्हावी म्हणून तोरा मिरवणाऱ्या आदोल्फो पिरेल्लीला हरवतो. ह्या पिरेल्लीचं खरं नाव डेव्ही कॉलिन्स असून तो पोरवयात स्वीनी ऊर्फ बेंजामिनच्या दुकानात हरकाम्या म्हणून नोकरीस असतो. आता तो स्वीनीची खरी ओळख उघड करण्याची धमकी देऊन मोबदला मागतो. स्वीनीचं डोकं फिरतं आणि तो वस्तऱ्याने पिरेल्लीचा खून करतो. ..मृतदेहाचं करायचं काय? - पण खऱ्या गरजवंताला असले प्रश्न पडत नाहीत; सुपीक डोक्याच्या गरजवंताला तर नक्कीच नाहीत. अठराविश्व दारिद्र्याने हैराण झालेली मिसेस लवेट मीट पायसाठी लागणारं मांस खरेदी करू शकत नाही.. पण मांसच आपल्याकडे चालत येतंय म्हणाल्यावर चिंता कशाला? स्वीनीने त्याच्या गिऱ्हाईकांचे गळे चिरायचे आणि लवेटने त्या मानवी मांसाचे पाय बनवून तिच्या गिऱ्हाईकांची पोटं तृप्त करायची असा त्या दोघांचा गुप्त दिनक्रम होऊन जातो. 
..आख्खी कथा सांगत बसत नाही. तीत बरीच वळणं, खाचखळगे आहेत. आणखी कितीतरी पात्रं आहेत, त्यांच्या व्यथा आहेत, संघर्ष आहेत. नेहेमीप्रमाणे तुम्ही सिनेमा पाहिलंय असं समजून चालेन.

मीट पाईजचं शिसारी आणणारं रहस्य किंवा बेछूट रक्तपाताहूनही अंगावर येतो तो स्वीनीच्या स्वभावातला थंडपणा. ज्यानं पंधरा वर्षांपूर्वी त्याचं कुटुंबच उध्वस्त केलं त्या न्यायाधीशाला (अॅलन रिकमन) ठार करण्यावाचून कुठल्याही गोष्टीत तो रस घेत नाही. तो पिरेल्लीला संतापापोटी नव्हे, तर आपल्या योजनेत हा अडथळा ठरणार हे लक्षात आल्यावर उफाळलेल्या वैतागापोटी मारतो. मिसेस लवेटने सुचवलेल्या गिऱ्हाईकांचे खून पाडण्याच्या युक्तीची तो बिनविरोध अंमलबजावणी करतो व त्या रक्ताळलेल्या, निर्घृण दिनक्रमात स्वतःला अगदी सहज सामावून घेतो. आपण निरपराध लोकांची हत्या करतोय हे चांगलंच ठाऊक आहे, पण त्याचं मन इतकं थकलंय, थिजलंय की त्याबद्दल अपराधी वाटण्याचे किंवा त्यातून विकृत आनंद उपभोगण्याचेदेखील भावनिक त्राण त्याच्यापाशी नाहीत. दुसरीकडे लवेट एकूणातच घाणेरडेपणाला विटलीये. स्वीनीच्या सूडयोजनेबद्दल तिला फारशी आस्था नाही. गाठीस आलेली मिळकत घेऊन कुठेतरी दूर निघून जाण्याची, स्वीनीसह नव्याने आयुष्य सुरु करण्याची स्वप्नं पाहतेय ती. पण त्यासाठी तिनं कपटी डाव खेळलाय.

पात्रांची एकमेकांतील भावनिक गुंतागुंत, जणू दृश्य पातळीवर आपल्याला त्या क्लिष्टतेत घेऊन जाणारे काल्पनिक लंडनमधील निसरडे दगडी रस्ते, अरुंद गल्लीबोळ; वर्तमानातील अहोरात्र अंधारं, कुबट वातावरण आणि स्वीनी ऊर्फ बेंजामिनच्या गतकालीन स्मृतींतलं स्वच्छ-सोनेरी प्रकाशात चमकणारं लंडन यांतला विरोधाभास..
..स्वीनीचं दुर्मुखलेपण, मिसेस लवेटच्या कोमल आकांक्षा व त्यांना असलेली खोट्याची किनार, ते दोघं  भोगत असलेलं आत्ममग्न एकाकीपण; न्यायाधीशाच्या ताब्यात असलेली बेंजामिनची किशोरवयीन मुलगी व स्वीनीला लंडनपर्यंत घेऊन येणारा तरुण खलाशी यांचं प्रेमप्रकरण,  न्यायाधीशाचा लैंगिक हव्यास; पाय शॉपमधे पोऱ्या म्हणून काम करणाऱ्या टोबीला (एड सॅंडर्स) लवेटचा लागलेला लळा आणि या दीर्घ, हिंसक सूडनाट्याचा थरारक शेवट..

वरकरणी दर्शकामधे तशी भावना निर्माण होत असली तरी 'सूडवृत्तीने कधीच, कुणाचंच भलं होत नाही' हे तात्पर्य सांगणं ह्या सिनेमाचा उद्देश नाही असं मला तीव्रतेने वाटतं. अनिश्चितता व मानवी मनात धुमसणाऱ्या कित्येक भावनांनी घडवलेली ही आर्त शोकांतिका आहे.

सुरक्षित वातावरणात, अक्षत जीवन जगताना 'कायदाहातातघेऊनये'वादी सूर लावणं फार सोपं असतं हो. पण जिच्याकडे दाद मागायची ती व्यवस्था ढिम्म बसून तमाशा बघत राहते किंवा तिचेच हात पापाने बरबटलेले असतात तेव्हा दाटणाऱ्या आगतिकतेतून असंख्य विदारक शक्यता जन्मास येतात. मग त्यात गोवलेल्या साऱ्याच आयुष्यांना अटळपणे बरीवाईट कलाटणी मिळते. 'व्ही फॉर व्हेंडेटा', किंवा नव्याकोऱ्या 'एनएच टेन' सारख्या कलाकृतींद्वारे ही वेदनामूलक बारीक नक्षी सुबकपणे रेखली जाते.

एक रसिक म्हणून अनुभवत असलेल्या सर्व कला माझ्या जीवनविषयक दृष्टिकोनात खोलवर बदल घडवत चालल्यात. भावभावनांचे असंख्य पैलू सावकाश दाखवून देत त्या मला उत्तरोत्तर संपन्न करत चालल्यात; अधिकाधिक समंजसही करत चालल्यात बहुतेक.

"स्वीनी टोड.." सारख्या कथा प्रतिशोध, न्याय, द्वेष, त्वेष, हिंसेकडे पाहण्याची माझी नजर बदलतात. नकारात्मक समजून दूर सारण्यात / झाकून ठेवण्यात आलेल्या भावनांना अधिक प्रगल्भपणे विचारात घ्यायला शिकवतात.
सिनेमात एके ठिकाणी मिसेस लवेट स्वीनीला म्हणते:

'..Life is for the alive my dear. We could have a life, us two. 
Maybe not like I dreamed, maybe not like you remember, but we could get by.'

..एखाद्याला ते नाही शक्य होत, काय करणार!


दिग्दर्शक: टिम बर्टन 
भाषा: इंग्रजी
अवधी: 116 मिनिटे 

No comments:

Post a Comment