Tuesday, March 3, 2015

'बर्डमॅन' (Birdman or The Unexpected Virtue of Ignorance) 2014

कलाकाराला आयुष्यात, आयुष्याकडून, 'माणसां'कडून काय हवं असतं? आणि माणसांना कलाकाराकडून कोणत्या अपेक्षा असतात? - अर्थात याचं एकच जनरल उत्तर नसणार. व्यक्तिपरत्वे, कलाकारापरत्वे ते बदलत जाणार. ..की खरंतर आपल्याला नक्की काय हवंय ह्याचाच शोध घेत असतो प्रत्येकजण?

सिनेमा पाहून झाल्यावर 'ब्लॅक स्वान'ची प्रकर्षाने आठवण आली. काही वेळ तुलना होत राहिली आणि वाटून गेलं की 'ब्लॅक स्वान' ही अधिक तरल, सूक्ष्मपणे हाताळलेली कृती होती. पण - नंतर माझ्या या मताचे संभाव्य छुपे पदर लक्षात येऊ लागले - मला तो जास्त सरस वाटला या मागे इतरही अनेक कारणं असू शकतात: माझं बॅले नृत्यप्रकारावरचं प्रेम, कचकडी सुपरहिरो फिल्म्सचा तिटकारा (अपवाद: 'डार्क नाईट' व तत्सम) वगैरे. हा तर 'बर्डमॅन'वर सरळसरळ अन्याय ठरेल! मुळात अशी दर्जाविषयक तुलना सुरु झाली ती दोन्ही चित्रपटांच्या कथावस्त्रातील समान धाग्यामुळे - कलाकाराने आत्मशोधाच्या ओघात /सृजनात्मक सिद्धीच्या हेतूने काही अचाट, टोकाची कृती करणं. आणि त्या तुलनेला तिथेच लगाम बसला. 'ब्लॅक स्वान' मधे आपण नीनाच्या (नेतली पोर्टमन) नजरेतून जगाकडे पहात असतो. प्रत्येक प्रसंग तिच्या मनात घडतो आहे की ज्याला आपण 'वास्तव' म्हणतो त्या अवकाशात घडतोय असा संभ्रम निर्माण होतो. कथा पुढे नेण्यात अन्य पात्रं व अल्टर्ड, रिपीटेड सिक्वेन्सेस महत्वाची भूमिका बजावत असले, त्यांचा नीनाच्या मनावर प्रभाव पडत असला तरी जे काही करायचंय ते तिला करायचंय. तिच्यावरचं हे दडपण तिला-आपल्याला स्पष्ट जाणवतं. शेवटी मनासारखं 'परफेक्शन' गाठण्यात तिचा मानसिक गुंताच तिच्या मदतीला येतो, आणि तिचा जीवही घेतो.
'बर्डमॅन'मधे आपण बर्डमॅनच्या नजरेतून रीगनकडे (मायकल कीटन), रीगनच्या नजरेतून बर्डमॅनकडे, पब्लिकच्या नजरेतून कधीकाळी बर्डमॅन म्हणून गाजलेल्या नी आता तगून राहण्यासाठी धडपडणाऱ्या म्हाताऱ्या अभिनेत्याकडे, मुलीच्या व पत्नीच्या नजरेतून व्यवसायाने अभिनेता असलेल्या माणसाकडे, अभिनेत्याच्या (एडवर्ड नोर्टन) नजरेतून अभिनयाकडे.. अशा कितीतरी उड्या मारतो. तळ्यांत-मळ्यांतचा खेळ इथे न संपणारा आहे. परंतु कथा रीगनच्या डोक्यात घडण्याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व सो कॉल्ड 'वास्तवा'त घडण्याला आहे.

रीगनच्या देहातील 'बर्डमॅन'नामक आत्मा रमणीय चित्रासारख्या वाटणाऱ्या शहरावरून दिवसरात्र घिरट्या घालण्यासाठी, दुष्टांशी दोन हात करण्यासाठी, आपल्या देहधराला करोडो कमावून देण्यासाठी आसुसलाय हे दिसतंच. पण 'रीगन'ला नेमकं काय हवंय? टाईपकास्टिंग होण्याच्या भीतीने 'बर्डमॅन फोर'ला नकार दिल्याचा आता पश्चात्ताप होतोय? मग तो खर्जात भुणभुणणाऱ्या डोक्यातल्या आवाजाचं म्हणणं का ऐकत नाही? पुनरागमनाची तयारी का करत नाही?
"कलेबिलेचं नाव काढू नका. स्वतःचं अस्तित्व जाणवून देण्यासाठी सगळा आटापिटा चाललाय तुमचा. कारण इतर कोणाहीप्रमाणे एक व्यक्ती म्हणून जिवंत असतानाच लुप्त होण्याची भीती वाटते तुम्हाला.." वगैरे कटूसत्यं ऐकवणाऱ्या सॅमला (एमा स्टोन) वडिलांनी ट्वीटर/फेसबुक वर जावं असंतरी का वाटतं? आपलं अस्तित्व इतरांना वारंवार जाणवून देण्याचा हा मार्ग तिला पटतो का? तिच्या हतबलतेला कितीतरी छटा आहेत.

"माझं अभिनयकौशल्य सुपरहिरोपटांपुरतं सीमित नाहीये" किंवा मुळात "मला अभिनय करता येतो" हे सिद्ध करून दाखवायचा अट्टहास चालू ठेवायचा की 'बर्डमॅन'सारख्या महत्वाकांक्षी हितचिंतकाचा सल्ला ऐकायचा यामधून रीगनला रोज निवड करावी लागते. कुठल्या प्रेक्षकांना खूष करण्यासाठी झटायचं, कुणीतरी सर्वोत्तम ते देण्यासाठी आपल्यासमोर रक्ताचं पाणी करतंय याने प्रेक्षकांना फरक पडतो तरी का? ह्या प्रश्नांशी रोज भिडावं लागतं. पण प्रकरण इतकं सरळसोट नाहीये. बर्डमॅन रीगनचा एक आत्मा, एक आवाज होऊन गेलाय. तो रीगनचा आमविश्वास न गमावलेला स्व आहे; वयापुढे, लोकमतापुढे, बऱ्या-वाईट अनुभवांपुढे न झुकलेला स्व आहे; उडताना चेहऱ्याला स्पर्शणाऱ्या वाऱ्यासारखी ती एक अल्हाददायक, जादुई संवेदना आहे. हे रीगनला चांगलंच ठाऊक आहे. तरीही तो बर्डमॅनला डोक्यातून काढून टाकण्याचा खटाटोप का करत असेल? शिवाय सायकोकायनेसिससारख्या मायावी अनुभवांनी सुखावून का जात असेल?
गंमत अशी, की 'मला बाहेर काढ, पुन्हा जगापुढे आण' हा धोशा लावलेला असूनही हाती घेतलेला नाट्यप्रकल्प नेटाने पुढे नेण्याचं मानसिक बळ बर्डमॅनच त्याला अप्रत्यक्षपणे पुरवत राहतो.

सिनेमाला दोन क्लायमॅक्स आहेत असं मी म्हणेन. रीगन स्वतःवर गोळी झाडून घेतो तो पहिला. हॉस्पिटलमधे शेवटच्या काही सेकंदांत जे घडतं तो दुसरा. प्रेक्षकांकडून, समीक्षकांकडून झालेली वाहवा.. अभिनयातील नव्या संधींची उघडलेली दारं.. हा विजय कुणाचा?
कमोडवर बसलेल्या बर्डमॅनशी रीगन जसा वागतो ते पाहून "चला, शेवटी माणसानं भुताला मनातून पुरतं फ्लश करून टाकलं !" म्हणून आपण सुस्कारा सोडतो आणि क्षणार्धात..
सॅमला खिडकीतून काय दिसतं?

..आपल्याला स्वतःकडून नक्की काय हवं असतं?


दिग्दर्शक: आलेहान्द्रो इन्यारितो (Alejandro Iñárritu)
भाषा: इंग्रजी 
अवधी: 119 मिनिटे 

No comments:

Post a Comment