Tuesday, March 10, 2015

इंडियाज डॉटर (India's Daughter: The Story of Jyoti Singh) 2015

मला अजिबात धक्का बसलेला नाही. रोज पेपरात येणाऱ्या अत्याचाराच्या कित्येक घटनांमधील एका घटनेत शिरून ती अनेक अंगांनी जाणून घेण्याचा अनुभव होता इतकंच. आरोपी आणि त्यांच्या वकिलांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन हा थोड्याफार फरकाने या समाजातील बहुसंख्यांचा दृष्टिकोन  आहे बलात्काराकडे; व्यक्तीने, स्त्रीने कसं जगावं, कसं वावरावं ह्याकडे पाहण्याचा.  त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकताना भवतालच्या कितीतरी लोकांचं, जवळच्या नातेवाईकांचं, समवयस्कांचं, बाबा-बुवांचं, राजकारण्यांचं, 'विचारवंतां'चं वगैरे बोलणं ऐकतेय की काय असंच वाटत राहिलं मला. मी पुन्हापुन्हा स्क्रीनवरचं चलचित्र निरखायाचे, नक्की कोण बोलतंय ते बघायला.. पुढल्या सेकंदाला तिथे एखादा ओळखीचा चेहरा दिसेल असं वाटत रहिलं. धास्ती नव्हे, लाज वाटली - लाज बाळगणाऱ्या, लाजेचा बाऊ करणाऱ्यांची लाज वाटली मला, कायमच वाटते. 
स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत वगैरे म्हणवणाऱ्या समाजाचं नीतिवस्त्र फेडून नग्नसत्याला हात घातलेलं कोणी कसं खपवून घेईल? - "अत्याचार करा, बलात्कार करा, अनिष्ट प्रथा पाळा, पण ते जगाला दाखवू नका, सांगू नका. त्यानं आमची इज्जत जाते, आमच्या संस्कृतीची प्रतिमा डागाळते!" ..त्यामुळे ह्या फिल्मवर घातलेली बंदी अनाकलनीय मुळीच नाही. दुसरीकडे फिल्म पाहायला मिळावी म्हणून आटापिटा करणारे, बंदीला उघड विरोध दर्शवणारे लोकदेखील आहेत.

एनजीओ-चालक, मानसतज्ञ, पोलिस, न्यायालयीन समितीमधील वकील.. सर्वजण आपापल्या परीने त्यांनी गुन्हा कसा हाताळला याची माहिती सादर करतात. लैंगिक अत्याचारामागील मनोवृत्तीला आव्हान देणारं त्यात काहीच नाही. शी. दिक्षित व सो. गांधी यांच्या प्रतिक्रियांमधेसुद्धा काही नवीन नाही...स्वाभाविक आहे म्हणा, दुसरं काय बोलणार? नीतिमूल्यांच्या ज्या मातीतून बलात्कारी घडले त्याच मातीतून आलोत आपण सगळे. आर्थिक सुबत्ता आणि शैक्षणिक डिग्र्या माणसाला केवळ वरवर बदलतात हे मात्र मला कधी नव्हे इतक्या तीव्रतेने जाणवलं. 
आरोपींच्या आप्तांचं ते चिरपरिचित पालुपद - "माझा मुलगा / नवरा हे करूच शकत नाही." 

घटना घडल्यानंतर जनक्षोभ उफाळून येणं साहजिक होतं. तरुणाई रस्त्यावर उतरली. गोळीबार, लाठीचार्ज वगैरे सरकारप्रणित हिंसाचाराला डगमगून न जाता त्यांनी लढा चालू ठेवला. मला त्यांचं कौतुक वाटतं, मनापासून वाटतं. पण कशाविरुद्ध आणि कशासाठी दिला गेला तो लढा? चार लोकांना फाशी जाहीर झाल्याने व कायद्यात सुधारणा झाल्याने ज्या बदलाची नांदी होते त्याचं स्वरूप नेमकं काय असतं? मग नागालँडमधे जेव्हा लोक बलात्काऱ्याला मरेस्तोवर मरतात, किंवा राजस्थानात बलात्कार करू पाहाणाऱ्याचं भररस्त्यात लिंग छाटून टाकतात तेव्हा नेमका काय फरक पडतो? 
व्यवस्थेकडून न्याय मिळणं म्हणजे काय? आणि व्यक्ती/समूहाने न्याय खेचून आणणं म्हणजे काय? दोहोंना कितपत अर्थ आहे? मुळात 'न्याय' ह्या संकल्पनेला कितपत अर्थ आहे? 

ह्या एका घटनेवरून पुढे जाऊया. माध्यमांत होणारं 'अपराधी पुरुष व पीडित स्त्री' हे चित्रण कितपत वास्तवाधारित आहे? 'लैंगिक अत्याचार करणं वाईट्ट' असं आपल्याला का वाटतं, ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे - मुलीचं कौमार्य लुटलं गेलं म्हणून? तिच्याशी कोणी लग्न  करणार नाही म्हणून?कुटुंबाची इभ्रत धुळीस मिळाली म्हणून? मुलावर बलात्कार झाला तर - त्याच्या पौरुषाला सॉलिड मानसिक ठेच लागते म्हणून? की ते प्रकरण फारच विचित्र, छी-छी वाटतं म्हणून? 
वैवाहिक जोडीदाराकडून झालेल्या बलात्काराने त्याच ऊरफुट्या कुटुंबीयांची इभ्रत धुळीस का जात नाही? - तो बलात्कार नसतोच! मेरी वॉलस्टनक्राफ्ट म्हणते 'marriage is legalized prostitution', आणि वेश्येला कुठे असतो स्वतःच्या शरीरावर हक्क? वेश्यांना पाणपोईसारखी 'जनहितार्थ अस्तित्वात असलेली' वस्तू समजतो आपण. 

आपल्या सामाजिक मूल्यांचं बारकाईने निरीक्षण, चिरफाड करण्याची गरज आहे. As a society, have we held up Consent as much as we've held up the Covenant? मुलीवर बलात्कार झाला, ती एका पुरुषाबरोबर हिंडत होती म्हणाल्यावर "त्यांचे परस्परांशी कशाप्रकारचे संबंध होते?" - या प्रश्नाला किंमत देणाऱ्या समाजात राहतोय आपण. समजा तो भाऊ असता तिचा; किंवा ते विवाहित जोडपं असतं तरी त्यानं घडल्या गोष्टीत काय फेरफार झाला असता? 'पतीपरमेश्वर' आहे म्हणून त्या मुलाच्या अंगात दहा हत्तींचं बळबिळ संचारलं असतं की काय? की भावाचं रुपांतर बॅटमॅन वा स्पायडरमॅनमधे झालं असतं?
लैंगिक संबंध ही इथे लग्न होईपर्यंत न उच्चारण्याची आणि लग्नानंतर हक्काने उपभोगण्याची, पोरं पैदा करण्यासाठी कम्पलसरी वापरायची गोष्ट मानली जाते. म्हणूनच म्हणलं, लैंगिक संबंधांबाबत इथे व्यक्तीच्या संमतीपेक्षा (Consent) समाजमान्य कराराला - विवाहबंधनाला (Covenant) अतिरेकी महत्व दिलं जातं. शारीरसंबंध ठेवताना समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या/तिच्या होकार-नकाराचा आदर करणं गौण होऊन बसलंय. अशा परिस्थितीत बदलांना ठोस वळण लागणं फार फार अवघड आहे. 
माझा कायद्यावर विश्वास नाही, शिक्षेद्वारे गुन्हेगारांना नैतिक धडे देण्यावर विश्वास नाही आणि निदर्शनांवरही तितकासा भरवसा नाही. व्यक्ती, तिची विचारप्रक्रिया, तिला पडलेले प्रश्न, त्यांवर घडलेलं सामूहिक मंथन आणि व्यक्तीने घेतलेल्या निर्णयांमधे परिवर्तनाचे संभव दडलेले असतात असं माझं मत आहे.  

सर्वप्रथम 'मी अत्याचाराला बळी पडणं  शक्य आहे, पण मी अत्याचारी असणंदेखील तितकंच शक्य आहे' हे स्वतःशी मान्य करायला हवं. 'बलात्कारी' ही काही विशिष्ट जमात, जात वा पंथ नव्हे. अत्याचार कोणीही करू शकतो, कोणावरही होऊ शकतो. हे कबूल केलं तरच खरंखुरं आत्मपरीक्षण शक्य आहे. दुसऱ्याचं स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजून घेणं व त्याचा आदर बाळगणं महाकठीणकर्म असतं. तरीही त्यादृष्टीने नेटाने प्रयत्न करू लागलो तरच आपण खऱ्या अर्थाने त्या बलात्काऱ्यांपेक्षा किंवा गलिच्छ इंग्लिशमधून अकलेचे तारे तोडणाऱ्या वकिलांपेक्षा वेगळे ठरू. 

..प्रश्नांकडे जाण्यासाठी उद्युक्त करते म्हणून ही फिल्म आवर्जून पहावी. 


दिग्दर्शक: लेझ्ली अडविन 
भाषा: हिंदी-इंग्रजी 
अवधी: 58 मिनिटे 

No comments:

Post a Comment