Thursday, April 30, 2015

भुवन श्योम (Bhuvan Shome) 1969

नुकताच दूरदर्शनवर 'सेलिब्रेटींग म्रिणाल सेन' नामक दीर्घ माहितीपट पाहण्याचा योग आला, आणि सिनेधनाचा आणखी एक हंडा मिळाला.

कोण हा भुवन श्योम?  प्रामाणिक, तडफदार बाण्याचे, कडक शिस्तीचे रेल्वेतील उच्चाधिकारी. हाताखालच्या माणसांच्या पाठमोऱ्या कुचेष्टेचा, नाकं मुरडण्याचा विषय. चाकरीसाठी बंगाल सुटल्याला कित्येक वर्षं उलटली तरी आपल्या बंगालीपणाचा अभिमान जपणारे एक विधुर गृहस्थ . . .की 'सद्गृहस्थ'? A man or a gentleman? ह्या प्रश्नाचं थेट उत्तर म्रिणाल सेनही देत नाही अन् मीही देणार नाही. असो.
तर एक दिवस श्योमबाबूंना आपल्या (उत्पल दत्त) नीरस दिनक्रमाचा वीट येतो, शिकारीला निघण्याची लहर येते आणि बंदूक, काडतुसं, हंटर सूट-बूट वगैरे टिपटॉप तयारी करून साहेब गुजरातमधील समुद्रकिनारी खगपारध करायला निघतात. किनाऱ्यालगतच्या खेड्यातून स्वारी मजलदरमजल करीत असते. आणि खरंतर येथूनच त्यांच्या स्वभावातील बदलांना सुरुवात होते. अर्थातच सूक्ष्मपणे. श्योमबाबूंची बडदास्त ठेवण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्याची धीट, चुणचुणीत, हसतमुख, परखड मुलगी गौरी (सुहासिनी मुळ्ये) ह्या बदलांना लयबद्ध वेग आणते. कथेचा बटवा छोटुसाच आहे. तो इथेच उपडा केला तर नंतर प्रत्यक्ष पाहताना तुमचा रसभंग होणार. तेव्हा चित्रपटाच्या मला भावलेल्या पैलूंकडे वळते. 

पार्श्वसंगीत काही ठिकाणी अस्ताव्यस्त तर काही ठिकाणी अनावश्यक वाटलं. पण ती मामुली बाब ठरते. एकंदरित 'मनोव्यापारांकडे स्वतंत्र, कल्पनाप्रचुर दृष्टीने पाहणाऱ्या दिग्दर्शकाच्या कथाप्रवाहावर आपल्याला संगीत बांधायचं आहे' याचं संगीतकाराला पूर्ण भान असल्याचा प्रत्यय येतो. प्रारंभीच खडखड-धडधड करत धावणारी रेल्वे / उलटे धावत आहेतसे वाटणारे रूळ आणि रागदारीचं मिश्रण छान जमून आलंय. ..विरळ वनात एकीकडून डौलदर पावालं टाकत येणारा सारस पक्षी, त्याचा कानोसा घेत बंदूक सरसावून बसलेले श्योमबाबू , दुसरीकडून पक्ष्याला वाचवण्यासाठी, श्योमबाबूंचं लक्ष विचलित करण्यासाठी दबकत येणारी गौरीची पावलं आणि मागे वाजणारा घुंगरांचा ठेका (गौरीच्या पायातील घुंगरांचा नव्हे) - हा मला सगळ्यात जास्त आवडलेला सांगीतिक क्षण. 

चित्रीकरणातसुद्धा बरीच गंमतजंमत आहे. मनात काढलेले उद्गार चित्रित करताना फ्रेम अरुंद करून, आयताकृती पट्टीतून क्लोज अप घेतले आहेत. ओठ न हलता व्यक्तिरेखा बोलतेय म्हणजे ती स्वतःशीच बोलतेय हे साऱ्यांनाच समजतं. मग हा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न पडतो. ठीकाय. त्यानं बिघडत काहीच नाही. अॅनिमेशनचे तुकडे भुरभुरवलेत सुरुवातीला. नवीन काहीतरी वापरायचं म्हणून असेल. पण अतिरेक कशाचाच नाही. भूतबंगल्यात तल्लीन होऊन राजाराणीची गोष्ट सांगणाऱ्या गौरीचा सीन मस्त टिपला  आहे. 

सिनेमात प्रेमप्रकरण नाही. श्योमची बायकांकडे पाहण्याची नजर भांबावलेली वाटते. बऱ्याच वर्षांनी किंवा कदाचित प्रथमच होणारं ठुमकत ठुमकत पाणी भरायला चाललेल्या ग्रामीण स्त्रियांचं दर्शन घेताना तो काहीसा थबकलेला, बावचळलेला वाटतो. ग्राम्यगीतांचं मधुर गुंजन कानी पडल्यावर भारावलेला वाटतो. 

'भुवन श्योम' ही कुठल्याच अंगाने अलौकिक हृदयपरिवर्तनाची गोष्ट नाही असं मला वाटतं. कारण सुरुवातीपासून श्योमबाबूंचं व्यक्तिमत्व कुठल्यातरी एका पारड्यात टाकता यावं असं नसतंच. वर्षानुवर्षं चाकोरीबद्ध जगल्याने त्यांच्या स्वभावातील मोकळेपणावर थोडा गंज चढलेला असतो इतकंच म्हणता येईल. शिकारीच्या बेताच्या निमित्तानं रेल्वेरुळांसारख्या सरळसोट, नियमबद्ध, कर्तव्यदक्ष जीवनातून मान वर काढून भोवताली बघायला त्यांना अल्प उसंत मिळते. 'कडक, खडूस साहेब' यापेक्षा सर्वथा वेगळ्या रीतीने आपल्याकडे पाहणाऱ्या लोकांचा सहवास लाभतो. आणि शेवटी शिकार गावली नाही तरी जगण्यातील काही नवे रंग गवसतात. रंग उडवत धावाधाव करणाऱ्याच्या हातून अनवधानाने थोडे शिंतोडे / एखादी धार दुरून जाणाऱ्या वाटसरूला रंगवून जाते तसा हा प्रकार. मोठमोठ्या, पोकळ वल्गना न करता, अतिशयोक्ती न करता, तात्पर्याचा डोस न पाजता, अतिशय संयतपणे गोष्ट उलगडते हे म्रिणालदांचं कसब नी चित्रपटाचं यश. 


दिग्दर्शक: म्रिणाल सेन 
अवधी: 96 मिनिटे 
भाषा: हिंदी 

No comments:

Post a Comment