Monday, May 11, 2015

डाउनफॉल / देअऱ् उंटरगांग (Downfall / Der Untergang) 2004

…हिटलरची कीव वाटायला लावणारा चित्रपट. 

नाझिझम आणि हॉलोकॉस्टबद्दलचं साहित्य आणि अन्य कलाकृती अनुभवताना कर्त्याधर्त्या आडोल्फ हिटलरबद्दल विविध टोकाच्या भावना / मनोवैचारिक प्रतिक्रिया उफाळून येत असतात. आतापर्यंत फक्त तीन वेळा, मोजून तीन वेळा मला त्याची कीव (- दया नव्हे) वाटली आहे:  
१. वि. स. वाळिंब्यांचा 'हिटलर' वाचताना. 
२. 'चॅनेल फोर'निर्मित 'सिक्रेट हिस्ट्री' मालिकेतील 'हिटलर्स हिडन ड्रग हॅबिट' हा माहितीपट पाहताना.
३. 'डाउनफॉल' पाहताना. 

दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या दारूण पराभवाला केवळ हिटलरची राक्षसी महत्वाकांक्षा वा वंशवादी अत्याचार कारणीभूत नसून त्याचा आततायी हेकेखोरपणा, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधे प्रारंभीपासून बोकाळलेला भ्रष्टाचार, त्याने टाकलेल्या मूढविश्वासाचा / मूढ अविश्वासाचा निकटवर्तुळातील लोकांनी वेळोवेळी (साहजिकच) उठवलेला गैरफायदा, त्यांच्यातील अखंड सत्तास्पर्धा व हेवेदावे, जिंकून घेतलेल्या प्रदेशांमध्ये जर्मनांनी चालवलेला अंदाधुंद हिंसाचार, आणि नाझी सरकारचा प्रत्येकच निर्णय ज्यांच्या हितासाठी घेतला गेल्याचा दावा करण्यात आला त्या खुद्द जर्मन जनतेला व सैनिकांना, हिटलरच्या 'लाडक्या' पितृभूमीला अखेरीस सोसावे लागलेले अतोनात हाल असे कितीतरी घटक एकत्रितपणे कारणीभूत ठरले. याला 'स्वतःच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगावर पाय पडण्याची' उपमा देणं पसंत करेन मी. 
तेव्हा अशा विविध बाबींचा हिटलरच्या व्यक्तिमत्व व कर्तृत्वाला केंद्रस्थानी ठेऊन उहापोह करणं हे वर उल्लेखलेल्या तीनही कलाकृतींचं आणखी एक समान वैशिष्ट्य म्हणता येईल.
- - -

आजवर युद्धपट पाहणं टाळत आले आहे. कंटाळा येतो, बाकी काही नाही. पण कथा आवडली, विषय जिव्हाळ्याचा असेल तर मी अजिबात कां-कूं करणार नाही हेही तितकंच खरं.

सिनेमच्या सुरुवातीला व शेवटी 1942 ते 1945 दरम्यान फ्युह्ररची खासगी सचिव म्हणून काम केलेल्या ट्राउड्ल युंगच्या (Traudl Junge) युद्धोत्तर काळातील मुलाखतीचा काही भाग दाखवला आहे. कथा अत्यंत गुंतागुंतीची आहे. सिनेमा पाहण्यापूर्वी जर्मनीचे जय-पराजय, खासकरून बॅटल ऑफ बर्लिन आणि फॉल ऑफ बर्लिनसंबंधी थोडं वाचन केल्यास उत्तम (- शिवाय मी सिनेमाची पटकथा आणि हिटलरच्या आत्महत्येपर्यंत 'फ्युह्ररबंकर'मधे राहिलेल्या प्रत्येक बड्या अधिकाऱ्याची व्यक्तिगत माहिती वाचली होती).

जरा विस्कळीतपणेच मला भावलेल्या जागा सांगते:
हिटलरचा मानसिक तोल पुरता ढासळलेला आहे. तो वयाच्या मानाने फारच खंगलेला दिसू लागला आहे. बंकरमधील त्याचा वावर हवेवर सावकाश तरंगत चाललेल्या सडपातळ भूतासारखा भासतो. नकार, माघार, प्रतिप्रश्न, त्याच्या मताविरुद्ध जाणारे हितेषी सल्ले ऐकून घ्यायची त्याची मुळीच तयारी नाही. सैन्याच्या हालचाली जाणून घेण्यासाठी भरवलेली प्रत्येक मीटिंग त्याच्या आक्रस्ताळ्या किंचाळण्यानेच संपते. त्याला स्वतः बर्लिन सोडून पळून जायचं नाहीये, शरणागती पत्करायची नाहीये आणि आपल्या उरल्यासुरल्या तुकड्यांनी व सामान्य नागरिकांनी 'मारिता मारिता मरेतो' झुंजत राहावं असा त्याचा हुकूम आहे - पण कसं? अन्न नाही, पिण्यालायक पाणी नाही, दारुगोळा नावालाच उरलेला, औषधांचा पुरेसा साठा नाही, वीज नाही, दळणवळण, संपर्कसाधनं.. सगळंच ठप्प झालेलं, रोजच्या रोज घरं, इमारती जमीनदोस्त होताहेत… हिटलर मोह्न्क नावाच्या अधिकाऱ्याला मध्यवर्ती शासकीय जिल्ह्याच्या कमांडरपदी नेमतो आणि ऑपरेशन क्लाव्हवित्झ तातडीने अंमलात आणायचं फर्मान सोडतो. मोह्न्क म्हणतो,  "आम्ही प्राणपणाने बर्लिन लढवू, फ्युह्रर. पण तीस लाख बिगरलष्करी, सामान्य नागरिकांचं काय? त्यांना अन्यत्र हलवायला हवं."
हिटलर: "मला कळतंय. पण तथाकथित सामान्यांचा विचार करत बसायची ही वेळ नाही."
मोह्न्क : "पण मग लाखो लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध व आजारी लोकांनी काय करावं?"
हिटलर: "इतक्या अटीतटीच्या लढ्यात कुणीही बिगरलष्करी नसतं."

आपल्या मर्जीतल्या वास्तुविशारद व अधिकारी अल्बर्ट श्पिअरवर नीरो डिक्रीच्या (- शत्रूला आपल्या प्रदेशात आगेकूच करणं महागात पडावं म्हणून आपल्याच अस्थापना व पायाभूत सुविधांचा विनाश करण्याची रणनीति) अंमलबजावणीची जबाबदारी टाकतो. सारासार विचारांती श्पिअर ही जबाबदारी पार न पाडण्याचा व बर्लिन सोडून जाण्याचा निर्णय घेतो, मात्र जाण्याआधी हिटलरची शेवटची भेट घेतो. त्यावेळीसुद्धा फ्युह्ररचा तोच दुष्टाग्रह - "हा अतिकठीण काळ माझ्या नागरिकांची परीक्षा आहे. ते अपयशी ठरले, तर त्यांच्याप्रित्यर्थ माझ्या डोळ्यातून एक टिपूसदेखील गळणार नाही. हीच लायकी आहे त्यांची.  त्यांनीच ओढवून घेतलंय हे, त्यांच्याच नशिबाचे भोग आहेत" !!! 
.. पण दुर्दैवाने हे अगदीच खोटं नाही म्हणता येणार. हिटलरला निवडून कुणी दिला? त्याने दाखवलेल्या सोनेरी स्वप्नांना भुलून राजकीय विरोधकांचा नायनाट करण्यात त्याला सहाय्य कुणी केलं? त्याच्या जहरी ज्यूद्वेषाचा स्वीकार कुणी केला? आपणच ना?

रशियन सैन्य इंच न् इंच लाल बावट्याखाली आणतंय. बर्लिनला वेढा पडलाय. तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु आहे. हिटलर युथची चौदा-सोळा वर्षांची कोवळी पोरं 'बर्लिन राखण्याची शर्थ' करताहेत. त्यातल्या एकाचे वडील तिथे येतात, पोटतिडीकीने म्हणतात "लहान मुलांना घरी सोडा."
एक तरुणी म्हणते, "आम्ही फ्युह्ररच्या नावाने  शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ घेतलीय". 
"पण रक्षण करायला आता उरलंय काय, सांगा ना?"
..त्या माणसाचा मुलगा वडिलांनाच 'भित्रा' म्हणून शिवी घालून निघून जातो. नंतर पराक्रम गाजवलेल्या पोरांना हिटलरतर्फे आयर्न क्रॉसने सन्मानित केलं जातं.
सिनेमाच्या उत्तरार्धात आपलं ठाणं उध्वस्त होऊन सर्वजण मृत्यूमुखी पडलेत हे दिसल्यावर रक्तमांसाचा चिखल तुडवत तो मुलगा घरी येतो - ज्या फ्युह्ररकडून मेडल मिळालं त्याच फ्युह्ररच्या माणसांनी त्याच्याच आदेशावरून लढाईत उतरण्यास नकार दिल्याबद्दल मुलाच्या आईला गोळी घातलेली नी वडिलांना फासावर लटकवलेलं पाहून भडभडून येतं.

बंकरमध्ये प्रत्येकाच्या एकेक तऱ्हा असतात. अधिकारी बरेचदा मद्यधुंद होऊन गप्पा ठोकत बसतात. बर्लिन सोडून जावं म्हणालं तर फ्युह्ररला विचारायची धास्ती. त्याच्या लहरी चक्रमपणाचा वीट आलेला, पण करता काय? त्यात निष्ठेचा भाग किती आणि भीतीचा किती, ते कळायला मार्ग नाही.
इव्हा ब्राउन मजेत असते. बाई तशी धीट. मात्र हिटलरच्या कुठल्याही निर्णयावर आक्षेप घेण्याच्या फंदात पडत नाही. एके दिवशी हिटलर आपल्या विश्वासू सेनानींपुढे  व्यक्तिगत पातळीवर पराभव मान्य करतो (अर्थात, युद्ध थांबवण्याची परवानगी तो देत नाहीच). आत्महत्येच्या तयारीला लागतो. 'मरेंगे तो साथ मरेंगे' हे ठरलेलंच असतं इव्हाचं. विशीतली ट्राउड्ल आणि तिच्या खोलीत राहणाऱ्या दोन कर्मचारी विचित्र भावनिक आंदोलनांतून गुजरत असतात. हिटलरनं तिच्याकडेही 'मोठ्या मनाने' एक सायनाईडची गोळी देऊन ठेवलेली असतेच.
आपले स्वामी आपल्याला कायमचे सोडून जाणार म्हणाल्यावर बंकरमधल्या अनेकांना भावनांचे उमाळे येऊ लागतात. त्यात हिटलरवरची माया किती नी स्वतःच्या आगतिकतेचा विस्फोट किती, त्यांचं तेच जाणोत.

..जर्मनीच्या ह्या हुकुमशहानं शत्रूच्या निरपराध सामान्य नागरिकांची गय केली नाही, ज्यांच्यासाठी राष्ट्र घडवायचा उद्यम केला त्या आर्यन-जर्मन नागरिकांची गय केली नाही, आपल्या सुंदर भूमीची गय केली नाही, आपल्या कुत्र्याची, पत्नीची गय केली नाही.. हिटलरचं प्रेम, त्याची निष्ठा नक्की होती तरी कुणावर? त्याला अभिमान होता तरी कशाचा? त्याचा सगळा आटापिटा स्वतःचे अवास्तव, अतिरेकी मनसुबे पुरे करण्यासाठीच चालू होता शेवटपर्यंत. युद्धानंतर बर्लिनचा चेहरामोहरा बदलून 'वेल्टहाउप्टश्टाट गेर्मानिया' (World Capital Germania) नावाने शहराची पुनर्निर्मिती करण्याचं हिटलरचं स्वप्न होतं,  श्पिअरकडून तसं भव्य, देखणं मॉडेल तयार करवून घेतलं होतं त्याने. अरे बाबा, तू तुझ्या देशाची तरुण पिढी संपवलीस, लाखो कथित 'अनार्यांना' देशोधडीला लावलंस, खलास केलंस.. आता ह्या शोभिवंत राजनगरीत राहणार कोण? - हा प्रश्न पडण्याचा अवसर त्याला मिळालाच नाही म्हणा. किती अदूरदर्शीपणे लोकांवर विश्वास ठेवायचा  हा माणूस! त्यांनी आज्ञाभंग अथवा कुठलीही संतापजनक कृती करेपर्यंत त्यांच्या एकूणएक अपराधांकडे कानाडोळा करत राहायचा आणि मग माथेफोड करत बसायचा. उपयुक्त शंका उपस्थित करणाऱ्यांना, त्याच्या भल्याचे पण विरोधी मताचे सल्ले देणाऱ्यांना हिटलर नालायक समजायचा, त्यांची हकालपट्टी करायचा, परंतु त्याच्यासमक्ष विनम्रतेचा आव आणून पाठीमागे मनमानी करणाऱ्यांना नेहेमीच अभय मिळायचं.

डॉक्टर एर्न्स्ट ग्युंटर शेंकच्या दृष्टीकोनातून काही गोष्टी पाहायला मिळतात. 'होतं-नव्हतं ते सारं गमावलंय तरीही लढण्याचा अट्टहास का', हा प्रश्न बर्लिनच्या भग्नावाशेषांतून फिरताना, छिन्नविच्छिन्न शरीरांवर उपचार करताना त्याच्या चेहऱ्यावर सतत पसरलेला दिसतो. "वेळ आलीच तर रशियनांच्या हाती सापडण्यापेक्षा स्वतःला संपवण्याची शपथ घालून फ्युह्ररनं आपल्या हातांनी माझ्याकडे ही सायनाईडची गोळी देऊन ठेवलीये" असं एक सहकारी जेव्हा काहीश्या गर्वानं सांगतो, तेव्हा आत्महत्यांचं सत्र सर्वत्र चालू आहे हे ठाऊक असूनसुद्धा डॉ. शेंक सुन्न होतो. "..हिटलरनं तुला आत्मघात करण्याची शपथ घातली?" इतकेच उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडतात.

सिनेमाचा शेवट सांगण्याची परवानगी मी देत नाहीये स्वतःला.

डोरोथिआ फॉन श्वानेनफ्लुगेल ह्या बर्लिनमधील प्रत्यक्षदर्शीच्या 'लाफ्टर वॉझन्ट रेशन्ड' पुस्तकातील एका परिच्छेदाचा अनुवाद करून सांगते आणि थांबते:
वीस एप्रिलला, शुक्रवारी हिटलरचा छप्पन्नावा वाढदिवस होता. शहराच्या काळजावर रशियनांनी चालवलेला तोफगोळ्यांचा भडिमार आणि दोस्तराष्ट्रांनी चालवलेले हवाई हल्ले ही त्याला मिळालेली वाढदिवसाची भेट.  आपल्या कडेकोट सुरक्षित बंकरमधून बाहेर पडून चौदा -सोळा वर्षांच्या  'सैनिकां'बरोबर त्यानं थोडा वेळ घालवल्याचं रेडिओवरून सांगण्यात आलं. बर्लिनच्या रक्षणार्थ, फ्युह्ररसाठी प्राणांची आहुती देण्याकरता, एस.एस.मधे भरती होण्याचा  'बहुमान' मिळावा म्हणून ही मुलं स्वतःहून पुढे आली होती म्हणे! किती तो नीच खोटारडेपणा! खरंतर ह्या कोवळ्या पोरांपुढे  दुसरा पर्यायच नव्हता. कारण जी मुलं लपून बसलेली आढळली त्यांना देशद्रोही ठरवून एस.एस. कडून निर्दयपणे फासावर लटकवण्यात येत होतं - 'ज्यांच्या अंगात लढण्याची हिंमत नाही त्यांना जगण्याचा अधिकार नाही', हा धमकीवजा सज्जड इशारा इतरांना देण्याकरता! झाडं नसतील तिथे दिव्याच्या खांबांवर लोकांना फाशी देण्यात येत होतं. पाहावं तिथे सैनिकांना, बिगरलष्करी नागरिकांना, महिला, मुलं, सामान्य माणसांना हिटलरवेड्या टोळीनं 'शासन केलं' होतं. इतःपर लोक जगावेत असं नाझींना वाटत नसावं, कारण त्यांच्या मते युद्ध हरलो यात सगळी चूक आमचीच होती. पुरेसा त्याग न केल्याने, समर्पितवृत्ती न दाखवल्याने आम्ही आमचा जगण्याचा हक्क गमावला होता. सरकार सोडून सारेच दोषी होते. फोल्क्स्टुर्मला (जनसेना) पुन्हा गोळा करण्यात आलं. तेरा वर्षं व त्यावरील सर्व मुलांनी सहभागी होणं बंधनकारक होतं. सैनिक म्हणून जुंपली जाणारी ही लहान पोरं हाच काय तो फौजफाटा उरला होता ना आमच्यापाशी! 


दिग्दर्शक: ऑलिव्हर हिर्शबीगेल (Oliver Hirschbiegel)
भाषा: जर्मन व रशियन 
अवधी: 178 मिनिटे 

No comments:

Post a Comment