Tuesday, June 2, 2015

'मिसिऊ व्हेर्देउ' (Monsieur Verdoux) 1947

(This review was published on ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, on 03.01.2014)

ही आहे एका चलाख आणि तितक्याच प्रांजळ, खरंतर निष्कपट गुन्हेगाराची गोष्ट. कुणी म्हणेल, 'निष्कपट गुन्हेगार' ह्या शब्दांच्या कॉम्बिनेशन मधे भलताच घोळ आहे! - हो, पण मी तरी त्या व्यक्तिमत्वात तेच कॉम्बिनेशन अनुभवलं.

फ्रांसमधील अर्थिक मंदीमुळे बँक कॅशिअर, तसंच एक प्रेमळ पती व पिता म्हणून सामान्य आयुष्य जगत असलेला हेन्ऱी व्हेर्देउ (चार्ली चॅप्लिन) झटक्यात बेरोजगार होतो आणि त्यानंतर स्वतःहूनच आपल्या आयुष्यला एक थरारक वळण देतो. फ्रांसच्या विविध भागांतील श्रीमंत स्त्रियांशी लग्न करणे, त्यांची संपत्ती लुबाडणे आणि वेळ येताच त्यांचा खातमा करणे असे सत्र तो चालू ठेवतो. ह्यात कधीही आपल्या त्रिकोणी कुटुंबाशी तो प्रतारणा करत नाही. फिरतीवर असणारा आपला नवरा किती कष्ट करून मंदीच्या भयावह परिस्थितीतही आपल्याला सुखात ठेवतोय हे पाहून त्याच्या(खऱ्या)बायकोला भरून येत असतं.
परंतु शेवटी हेन्ऱी पकडला जातो व त्याला दोषी ठरवून गिलोटिनवर शिरच्छेदाची शिक्षा सुनावली जाते. कोर्टात व रिपोर्टरने घेतलेल्या मुलाखतीत आपले विचार स्पष्टपणे, मर्मभेदीपणे मांडून कमालीच्या शांतचित्ताने तो शिक्षेला सामोरा जातो...वरवर पहाता इतकीच गोष्ट!

ज्यांनी हा सिनेमा अद्याप पहिला नसेल त्यांनी 'कथा आधीच कळल्यामुळे आपला रसभंग झाला' असं वाटून घेण्याची अजिबात गरज नाही, आणि चार्लीच्या कोणत्याही चित्रपटाला हेच लागू होईल. त्याच्या कथांचा जीव वरकरणी इवलासा वाटतो, त्या ऐकताना अतिसामान्य वाटतात. पण लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनयातून तो ते कथाविश्व ज्या अप्रतिमतेने साकारतो ते पाहून थक्क व्हायला होतं!
ज्या चित्रपटांमध्ये चार्लीने 'भटक्या' (tramp) वठवला नाही, उलट आर्थिक सुस्थितीतील माणसाची भूमिका केली त्यापैकी 'मिसिऊ व्हेर्देउ' हा एक चित्रपट. त्याच्या कलाकृतींमध्ये गरीब-श्रीमंतांमधील सायकॉलॉजिकल, इमोशनल तुलनेला आवर्जून महत्त्व दिलेलं असतं, ते ह्या सिनेमात क्वचितच कधीतरी झर्रकन तरळून जातं. तसंच हास्य-कल्लोळातून पुढे सरकत,(- खेळीमेळीची मारामारी, पाठलाग, चकवे इ.) वेदनेला हळूहळू पाझरू दयायचं असा चार्लीच्या काही चित्रपटांचा रागरंग असतो, मात्र ह्या चित्रपटाला गांभीर्याची किनार थोsडी जास्त आहे. म्हणून तो वेगळा वाटला.

चार्लीच्या स्टाइलनुसार बोलपट असूनही मूकाभिनय, तदानुरुप भावमुद्रा हा चित्रपटाचा गाभा आहे. नशीब, दैव (-त्याला काहीही नाव दया) अनपेक्षितपणे कसे सुखद / उध्वस्त करून टाकणारे धक्के देतं, तरीही जगण्याचा कुठलीही अंतरिम दिशा नसलेला संघर्ष आपण कसा चालू ठेवतो, कसे चाचपडत राहतो त्याचं प्रत्ययकारी चित्रण अन्य चार्लीपटांप्रमाणे ह्या सिनेमात आहेच.
पण 'मिसिऊ व्हेर्देउ' च्या खासियती म्हणायच्या तर, अंशतः थरारपट असूनही ह्या सिनेमात प्रत्यक्ष जीवघेणी झटापट , खुनाचं दृश्य, त्यावेळचं गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरचं ते थंड, क्रूर हास्य, असला प्रकार कुठेही दाखवलेला नाही. असली तद्दन पाचकळ, हिंसक तरीही कथेच्या दृष्टीने बाळबोध दृश्य चार्लीच्या कुठल्याही कृतीत नसतातच. एक सराईत खुनी कसा असू शकतो ह्याबाबतच्या बहुतांश प्रचलित कल्पनांना छेद देणारी अशीच ही हेन्ऱी व्हेर्देउ ची भूमिका आहे. ती प्रत्यक्ष पाहणेच अतिउत्तम.

इथे येनकेनप्रकारे हिरोचा विजय होऊन शेवट गोड होत नाही आणि हीरोला त्याचं शल्यही नाही. कारण आपण लोकांना लुबाडलं, खून केले हे आपलं चुकलं हे त्याला मान्य आहे. हेन्ऱी व्हेर्देउ एके काळी नेकीने पैसे कमावणारा, परंतु ज्यांच्याशी आपला कसलाही थेट संबंध नाही अशा समाजिक उलथा-पालथींमधे भरडला गेलेला माणूस आहे आणि हे असं अनपेक्षितपणे व्यक्तीने आपलं, आपल्या कुटुंबाचं वसवलेलं टुमदार जग उध्वस्त होणं, लोकांचं, कायदा आणि व्यवस्थेचं अत्यंत दुटप्पी, स्वार्थी आणि तत्त्वविसंगत असणं ही त्याची वेदना आहे. म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असताना तो विचारतो, 'मी अनेकांचे खून केले, पण विध्वंसक शस्त्रांची निर्मिती करून तुम्ही काय वेगळं करताय?'
आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा हेन्ऱीचा उद्देश मुळीच नाही, पण आपल्याला शिक्षा ठोठावणारेही ह्या न त्या रीतीने 'अपराधी' आहेत इतकंच म्हणायचं त्याला.

रिवाजाप्रमाणे गिलोटिनवर चढवण्यापूर्वी एक पाद्री हेन्ऱीला भेटायला येतो. तो म्हणतो: "I've come to ask you to make peace with God." 
ह्यावर हेन्ऱीचं उत्तर असतं: "I am at peace with God. My conflict is with Man."दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक (कथा ऑरसन वेल्सच्या कल्पनेवर आधारित आहे) 
व निर्माता: चार्ली चॅप्लिन
भाषा: इंग्रजी 
अवधी: 124 मिनिटे 

No comments:

Post a Comment