Sunday, July 19, 2015

एफटीआयआय - आपल्याला काय पडलंय?

आजचं सरकार सत्तेवर आल्यावर सांस्कृतिक-धार्मिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रांमधे काय-काय घडू शकेल, हे लोक आपल्या कट्टरतावादी विचारसरणीचा रंग देशात जिकडे-तिकडे कसा फासू लागतील याची पूर्वकल्पना आपल्यापैकी बहुतेक विचारी माणसांना होती. त्या सर्व कु-कल्पना, कयास आता सत्यात उतरत आहेत हे तर स्पष्टच आहे. अशावेळी आपण काय करतोय? लोक काय करताहेत?
कट्टरतावादी, मूलतत्ववादी, हुकूमशाहीवादी विचारांचे समर्थक सुखावलेत. संधीसाधू सोकावलेत. पण कुठल्याच मुद्द्यावर ठाम मतं नसणारे, तार्किक वादविवादाची, सखोल चर्चेची अॅलर्जी असणारे, फेसबुक-व्हॉट्सअॅपवर तासन्तास रेंगाळणारे - थोडक्यात तळ्यात-मळ्यात पैकी कुठेच नसणारे लोक काय करत आहेत?

गेल्या एक महिन्याहून अधिक काळ एफटीआयआय (Film and Television Institute of India) च्या विद्यार्थ्यांच्या संप सुरु आहे. आणि त्याबद्दलचे सडाफटिंग, बिनडोक मेसेजेस व जोक्स सर्वत्र भिरभिरत आहेत. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या आदेशाचं (व संचालक मंडळातील अन्य विवादास्पद नियुक्त्यांचं) समर्थन करणाऱ्यांबरोबरच मी मघाशी म्हणलं ती सहसा तळ्यात-मळ्यात नसणारी माणसंसुद्धा ते निरर्थक जोक्स, शिवाय एफटीआयआयमधील विद्यार्थीजीवन, संपातील विद्यार्थ्यांच्या मागण्या, संस्थेचा भूतकाळ वगैरेबद्दलच्या अफवा पसरवण्यास 'उघडलं व्हॉट्सअॅप की कर फॉरवर्ड' असा जोरदार हातभार लावत आहेत.
संबंधित विद्यार्थी, त्यांना परराज्यातून, परदेशातून पाठिंबा दर्शवणारे विद्यार्थी व सिनेक्षेत्रातील मान्यवर, बुजुर्ग निषेध नोंदवत आहेत, संस्थेत येऊन मुलांशी चर्चा करत आहेत. पण लार्जर पब्लिकला, पुण्याच्या तथाकथित अभिरुचीसंपन्न लोकांना ह्या संपाचं, अहिंसक अ-सहकाराचं महत्त्व आणि गांभीर्य उमगलं आहे का? आपल्याला त्याचं काही पडलंय का? एक रसिक म्हणून 'उत्तम' सिनेमे, साहित्य, कलाविष्कार निर्माण व्हावेत ही तळमळ आपल्याला वाटते? ..हो, 'उत्तम' कशाला म्हणायचं यावर मतभेद असू शकतात, परंतु कलाकृती व कलानिर्मितीमागील प्रयोजनं-प्रक्रिया कोणत्याही विशिष्ट प्रचारकी, मूलतत्ववादी विचारधारेच्या प्रभावापासून मुक्त असावीत, 'कला' ही सरकारच्या हातातील बोलकी बाहुली होऊ नये असं तरी आपल्याला वाटतं का? मुळात समाजात कलाविषयक गांभीर्याची पातळी किती आहे?
'चुकार फुरंगटलेल्या पोरांनी चालवलेली मनमानी' समजल्या जात असलेल्या या संघर्षाबद्दल आपल्याला काडीची आत्मीयता वाटते का? - वाटती तर आपण तसले भिकार, दिशाभूल करणारे मेसेजेस न पसरवता या मुलांना व त्यांच्या आंदोलनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यात सक्रिय सहभाग घेण्याची सवड वा आवड नसेल तर किमान बिनबुडाची निंदा तरी केली नसती!
आपल्या न्याय्य हक्कांकरता उभं राहिलेल्या, सरकारला जाब विचारणाऱ्या या मुलांना सर्वप्रथम भवतालच्या समाजाशीच लढावं लागतंय, आपल्याबद्दल पसरलेले गैरसमज दूर करावे लागत आहेत हे मोठं दुर्दैव आहे.
व्हॉट्सअॅपवर फिरणारा तो बंड्याचा 'लॉ कॉलेज रोड'वाला जोक पहा - -
बंड्या म्हणतो मी शाळेत जाणार नाही कारण मला मुख्याध्यापक आवडत नाहीत. बंड्याची आई वडिलांना म्हणते "आतातरी हे  'लॉ कॉलेज रोड'वरचं घर बदला."
ह्यातून चित्र असं निर्माण केलं जातंय की "आमचा आवडता माणूस त्या पदावर बसवा" म्हणून एफटीआयआयची पोरं रुसून बसली आहेत.
पण प्रत्यक्षात बंड्याच्या उदाहरणातून आपली हेकट, शोषणमूलक, वर्चस्ववादी मानसिकता समोर येते: 
- विद्यार्थ्यानं 'भलते' (शिक्षकांची / वरिष्ठांची कोंडी करणारे, त्यांच्या चुकांवर बोट ठेवणारे) प्रश्न विचारू नयेत.
- विद्यार्थ्याला शिक्षकाची पात्रता जाणून घेण्याचा अधिकार नसतो, नव्हे विद्यार्थ्याला अधिकार नसतातच. त्यानं केवळ 'विद्यार्थीधर्म' पाळायचा असतो (= अन्याय होत असल्यास मुकाट्यानं सहन करायचा असतो).
- तेव्हा जो कोणी खाली मान घालून अभ्यास करायचं सोडून वरीलपैकी 'नसते धंदे' करतो तो विद्यार्थी / विद्यार्थिनी आगाऊ, उद्धट. संबंधित संस्थेतून शिक्षण घेण्याची त्याची / तिची लायकी नाही.

विद्यार्थी व शिक्षक, पाल्य व पालक, सरकार व नागरिक ही इथे केवळ नाती नाहीयेत. वर्चस्ववादी धारणेनुसार सर्वच सामाजिक नात्यांत 'एक पक्ष सर्वकाल शोषक व दुसरा पक्ष शोषित राहावा, त्यात समानता येऊ नये' हे कारस्थान असतं. म्हणूनच वरील उदाहरणात आपल्या शाळेचा कारभार पाहणाऱ्या मुख्याध्यापकाने पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत का, त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याची नियुक्ती राजकीय हितसंबंधातून झाली आहे का वगैरे सवाल उठवण्याचा अधिकार बंड्याला नाही! 

एफटीआयआयमधील काही अंतर्गत प्रश्न व समस्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत हे मान्य. पण तसं असल्यास संस्थेच्या खुर्चीवर बसणाऱ्याची शैक्षणिक, व्यवस्थापकीय पात्रता आणखी जास्त हवी! त्याची व्यक्तिगत कारकीर्द आणखी उजळ, उत्तुंग  हवी! परंतु संस्था चांगली चालवण्यात रस आहे कुणाला? किंवा 'चांगलं' म्हणजे काय याबाबत आजच्या सरकारच्या काही प्रतिगामी, कर्मठ कल्पना आहेत व त्या त्यांना येनकेनप्रकारे, लोकशाहीच्या तत्वांना पायदळी तुडवत सर्वांवर लादायच्या आहेत असं म्हणता येईल.

"प्रत्येक सरकार विरोध दडपू बघतं, त्यामुळे तुमचा लढा ठराविक सत्तेविरोधात आहे असं समजू नका" हे संपाला पाठिंबा देणाऱ्या अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेलं मत अगदी योग्य आहे. पण आत्ता, या घडीला एका विशिष्ट विचारसरणीशी त्यांना लढा द्यावा लागत आहे, लढयाचं स्वरूप त्यानुसार आकार घेणार आहे हेही खरं आहे.
'म्रिणाल सेन मार्क्सवादी आहेत, कर्नाड हिंदू-विरोधी तर श्याम बेनेगल भाजपविरोधी आहेत' अशी आगपखड केली जातेय. एक गोष्ट पूर्णसत्य आहे - वरील सर्वजण कट्टरता, मूलतत्ववाद, संकुचितता-विरोधी आहेत. स्वतंत्र विचारांची मंडळी आहेत. आपल्या भूमिका दुसऱ्यावर जुलमाने लादणारे नाहीत. 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ व मोल ते जाणतात. अशा लोकांचा 'बंदोबस्त' करणं, अथवा किमान त्यांची प्रतिमा मलीन करणं ही कायमच हुकूमशहांच्या चेकलिस्टवरची नंबर एकची गोष्ट असते.

जगाच्या कुठल्याही भागातील, कुठल्याही कालखंडातील हुकूमशाहीवादी, मूलतत्ववादी, कट्टरतावादी सत्तेची काही समान लक्षणं असतात हे थोडाबहुत विचार केल्यास आपल्या सहज दिसून येईल:
१. आपल्या सामाजिक, आर्थिक, पारंपारिक अपयशांसाठी विशिष्ट परकीय वा अल्पसंख्यांक वा गैरसोयीच्या समाजघटकांना जबाबदार धरणं
२. "आपला धर्म धोक्यात आहे, आपली संस्कृती धोक्यात आहे, आपल्याला विरोध करणारे लोक आपली जमात नष्ट करायला टपलेले आहेत" अशी अनाठायी भीती जनतेत पसरवणं. जनतेला पॅरानॉइड बनवणं.
३. "संस्कृती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, चांगलं-वाईट वगैरेबद्दलच्या आमच्याच कल्पना योग्य आहेत, त्यावर कोणी टीका करायची नाही" या मानसिकतेला खतपाणी घालणं. समाजातील सहिष्णुता, निकोप चर्चा, निकोप टीका संपवणं, विचारशीलता संपवणं, सर्व तऱ्हेच्या विरोधकांना देशद्रोही ठरवणं.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाही सत्ता समाजमनात एक उदासीनता, एक पिचलेपणाची भावना निर्माण करतात. "तुम्ही धडपड करू नका, आम्ही तुमचं भलं करू, फक्त आम्हाला साथ द्या" म्हणताना - "तुम्ही काहीच करू शकत नाही, सत्तेपुढे तुम्ही क्षुद्र आहात आणि विरोध कराल तर खबरदार!" हा इशारा दिला जात असतो.

कृपया आपल्या बुद्धीवर, तर्कावर, भावनांवर ह्या उदासीनता, वैचारिक हताशपणाची बुरशी चढू देऊ नको या. अनाठायी भीतीला बळी पडू नको या. तात्कालिक आश्वासनांनी भुलून जाऊ नको या. कृपया 'स्वातंत्र्य' (freedom) व 'सहिष्णुता' (tolerance) या शब्दांचे अर्थ विसरून जाऊ नको या, संविधान विसरू नको या.
भारतीय संस्कृतीबद्दलच्या थोतांड, संकुचित कल्पना, विविध प्रकारच्या वैचारिक 'गुंगीच्या गोळ्या' स्वीकारू नको या.
कृपया जागे राहू या. जमल्यास आजूबाजूच्यांनही जागे ठेऊ या.

Sunday, July 12, 2015

दिल धडकने दो (Dil Dhadakne Do) 2015

Published on letstalksexuality.com

"एकपेक्षा जास्त व्यक्ती असलेलं कुठलंही कुटुंब हे अ-स्वस्थ (डिसफंक्शनल), विस्कटलेलं असतंच." - अमेरिकन लेखिका मेरी कार
- "भिन्न व्यक्तिमत्वांची माणसं एका छताखाली राहणार म्हणाल्यावर मतभेद, ताणेबाणे, संघर्ष ओघानं आलेच" असं ही लेखिका सांगू पाहतेय. पण हे जर इतकं सरळ आहे तर कुटुंबातील तंटे इतरांपासून सतत लपवण्यासाठी का धडपडतो आपण? सदासुखी कुटुंबाचा देखावा का निर्माण करू बघतो? शिवाय लोकांसमोर येऊ नयेत म्हणून समस्या सोडवायच्याच नाहीत हे कुठलं लॉजिक आहे? 'आनंदी, समाधानी कुटुंब' म्हणजे तरी काय? कोणी करायची त्याची व्याख्या? 'इभ्रत / प्रतिष्ठा' म्हणजे काय? परिवाराची इभ्रत त्यातील सदस्यांच्या प्रतिष्ठेहून, समाधानाहून मोठी असते?

झोया अख्तर द्वारे दिग्दर्शित 'दिल धडकने दो' कुठलाही उपदेशमूलक आव न आणता वरील सर्व प्रश्नांना हात घालतो.
 सिनेमाची कथा दिल्लीतील धनाढ्य मेहरा कुटुंबाभवती फिरते: उच्चभ्रू, गर्विष्ठ उद्योजक कमल मेहरा (अनिल कपूर), त्याची सदोदित टेचात राहणारी पत्नी नीलम (शेफाली शाह); कर्तृत्ववान, लग्नानंतर दुरावलेली मुलगी आयशा (प्रियांका चोप्रा); वडिलांच्या व्यावसायिक साम्राज्यात अजिबात रस नसलेला, मिश्किल स्वभावाचा कबीर (रणवीर सिंग) आणि बुलमस्टिफ जातीचा (आमिर खानचा आवाज लाभलेला) 'प्लूटो' हा कुत्रा असं पंचकोनी कुटुंब.
कमल मेहराची एकेकाळी यशस्वी असलेली 'आयका' कंपनी सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. दरम्यान आपल्या लग्नाच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त कमल व नीलम यांनी मोजक्या मित्रमंडळींसाठी दहा दिवसांची जंगी भूमध्यसामुद्रिक सागरी सफर आयोजित केलीय. 'दिल धडकने दो' ही त्या सफरीदरम्यान व आगेमागे काय-काय घडतं, जे काही घडतं त्यामुळे मेहरा कुटुंबियांची आयुष्यं कशी बदलतात, नातेसंबंध कसे बदलतात हे सांगणारी नयनरम्य, एंटरटेनिंग आणि तरीही विचारांना गुदगुल्या करणारी, नव्हे चांगलंच डिवचणारी गोष्ट आहे.

कमल व नीलम मेहरा ह्या पात्रांद्द्वारे उतारवयीन जोडप्यातील ताणताणाव अत्यंत प्रभावीपणे रेखाटण्यात आला आहे. त्यांचं लोकांसमोर 'लव्हली कपल' असण्याचं नाटक वठवणं, खाजगीत एकमेकाला मारलेले टोमणे, जळजळीत नजरा, बारीकसारीक गोष्टींत एकमेकाचा पाणउतारा करणं वगैरे दर्शकासमोर येत असतानाच त्या नात्यावर पसरलेलं खिन्न अस्वस्थतेचं सावट सतत जाणवत राहतं.
नीलम मेहराची व्यक्तिरेखा मनातून एकाकी पडलेल्या, लग्नात असूनही 'टाकल्या गेलेल्या' बाईची हतबलता, त्या हतबलतेतून येणारा कडवटपणा, चिडचिड, सतत आनंदी असल्याचं सोंग करून येणारा मानसिक थकवा, नवऱ्याच्या वागण्यातील तुसडेपणामुळे मनात साचणारी (तरीही व्यक्त न करता येणारी) निराशा इत्यादी कितीतरी छटांनी नटलेली आहे. तिच्याबद्दल बोलताना 'तोंडात केक कोंबण्याच्या' सीनची आठवण येणं अपरिहार्य आहे - केकच्या त्या एका तुकड्यासोबत स्वतःच्या परावलंबित्वाची जाणीव, अपमान, संताप अशा कितीतरी भावना ती गिळते!

कमल मेहराला सरळसरळ सिनेमाचा 'पुरुष-वर्चस्ववादी व्हिलन' ठरवून मोकळं होणं प्रत्येकालाच आवडेल, पण ते खरं नाही हे बारकाईने पहिल्यास लक्षात येईल. त्याच्यावरसुद्धा कित्येक प्रेशर्स आहेत. आपल्या 'प्रेम'विवाहातील प्रेम हरवलंय ह्याची त्यालाही अधूनमधून पुसटशी जाणीव होते. त्याचा तो बहुचर्चित 'ड्रेसिंग-गाऊन मधला सीन' आठवा: बायकोने "हातात हात घ्यायचं नाटक कशाला करतोस? इथे लोक नाहीएत बघायला!" म्हणल्यावर तो क्षणभर गोंधळतो, त्याचा चेहरा खर्र्कन उतरतो. एक सेकंदभर त्याच्या डोळ्यांत दुःख तरळून जातं. पण अर्थातच आपल्या टोकाच्या अहंकारी स्वभावामुळे तो सत्य स्वीकारायला तयार नाही. जगापुढे निर्माण केलेल्या स्व-प्रतिमेची त्याला जास्त काळजी आहे.
परस्परांतील या अशक्य झगड्यामुळेच मेहरा पती-पत्नी जवळच्या माणसांचादेखील स्वार्थीपणे वापर करून घेत असावेत. त्यात त्यांचा काही दोष नाही असं मी मुळीच म्हणत नाही, पण ह्या दोन पात्रांना कपटी व निर्दय म्हणताना त्यांच्या मनांततली खोलवरची उद्विग्नता, असहायता नाकारून चालणार नाही.

अर्थात असल्या आई-बापाबरोबर राहताना त्यांच्या मुलांचा जीव गुदमरला नाही तरच नवल. मुलांनी स्वावलंबी व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं अशीच बहुतांश आईबापांची इच्छा असते, पण 'आमच्या नियम व अटींनुसार सारं झालं पाहिजे, आमच्या सुखकल्पनांच्या चौकटीतच मुलांनी आपापलं सुख शोधावं' हा हेकेखोरपणा सोडायला किती पालक तयार असतात/होतात? शिवाय 'पटत नसेल तर घरातून बाहेर हो' अशी धमकीची तलवार मुलांच्या मानेवर सतत रोखलेलीच. आपली मुलं हुशार असावीत पण आपल्यापेक्षा 'स्मार्ट' असू नयेत, त्यांनी आपल्याला शहाणपण शिकवू नये.. थोडक्यात काय, मुलाला स्वतंत्र व्यक्तिमत्व असूच नये! कमल व नीलम मेहरा नेमके ह्याच पठडीतले पालक आहेत हे सिनेमात ठायीठायी स्पष्टपणे जाणवून दिलेलं आहे:

क्रूझ सफरीच्या निमंत्रणपत्रिकेवर आयशाचं नाव नसतं. ती खट्टू होते. कबीर आईवडिलांपाशी तसं बोलून दाखवतो तेव्हा ते म्हणतात, 'ती काही 'मेहरा' नाहीये आता!' - लेकीने कर्तबगारीने उभ्या केलेल्या तिच्या स्वतःच्या कंपनीची भरभराट पाहून बापाचा इगो दुखावला म्हणून तिचं नाव गायब आहे की काय, असा प्रश्न पडायला तिथे खुबीने जागा ठेवलीय.
कबीरला "आम्ही सांगतो त्या मुलीशी लग्न केलंस तर आम्ही तुझं विमान विकणार नाही" अशी ऑफर देणं किंवा आपल्या कार्टीने आपल्या नोकराच्या (मॅनेजरच्या) मुलाशी लग्न करू नये म्हणून आयशा व सनी गिलच्या (फरहान अख्तर) लव्ह अफेअरमधे ढवळाढवळ करून त्यांना विलग करणं - मेहरा पालकांच्या ह्या 'उद्योगां'तून मुलांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याची धडपड उघडी पडते, शिवाय ह्या वर्तनाच्या तळाशी असलेली मानसिक असुरक्षितता दिसते.
बुडीतखाती चाललेल्या 'आयका' कंपनीला नवी उभारी देण्यासाठीची व्यावसायिक बुद्धिमत्ता आपल्या मुलीकडे, आयशाकडे आहे हे माहित असूनही मेहरा पती-पत्नी कंपनीचा उत्तराधिकारी होण्यासाठी  कबीरवर दबाव आणतात ह्यातून ते मुलगा-मुलगी भेदभाव मानतात हेच सूचित होतं, दुसरं काय.

आयशाच्या व्यक्तिरेखेचे कंगोरे अतिशय महत्वपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बायकोला मुठीत ठेऊ पाहणाऱ्या, तिला वेळोवेळी कमी लेखून वर तिच्या अचाट प्रगतीचं श्रेय स्वतःकडे घेऊ पाहणाऱ्या मानव संघा (राहुल बोस) सोबत ती संसार करते. सासूची कटकट सहन करते. आयशा-मानवचा केवळ काही सेकंदांचा अर्धामुर्धा इंटिमेट सीन त्यांच्या वैवाहिक संबंधातील उदासीनता दर्शवतो: मानव जबरदस्ती म्हणावी असं वर्तन तिच्याशी करत नाही, सेक्सची इच्छा नसूनही आयशा त्याला स्पष्ट विरोध करत नाही व दुसरीकडे गुपचूप गर्भनिरोधक गोळ्या घेत राहते!
व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी स्त्री सगळ्याच आघाड्या पोलादीपणे लढवू शकेल असं नाही, 'सासर व माहेरच्या कुटुंबियांचं मन कसं मोडायचं' ही भीती सर्वार्थाने 'मॉडर्न', 'सुपरवुमनला'ही हवं ते मिळवण्यापासून रोखू शकते व त्रासात ढकलू शकते ही वास्तविकता अधोरेखित केली जाणं फार आवश्यक होतं, ते इथे पुरेपूर साधलं आहे.

आपल्याला मानवबरोबरच्या नात्यात रस नाही हे समजावून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना आयशाला तिची सासू, आई-वडील डोळे वटारून पुन्हापुन्हा विचारत असतात, "-पर प्रॉब्लेम क्या है?" - प्रॉब्लेम हा आहे की इतकी वर्षं तुम्हाला स्वतःचे व एकमेकांचे  प्रॉब्लेम्स  समजून घ्यायचेच नव्हते! लोक आपल्याला 'हॅप्पी फॅमिली' समजतात म्हणून त्याच खोट्या धुंदीत जगायचं होतं तुम्हाला!
शेवटी घडायला हवंच असतं त्यानुसार काहीतरी जबरदस्त घडतं. मेहरा कुटुंबीयांना कित्येक वर्षांत न केलेली एक गोष्ट करावी लागते - समोरसमोर येऊन कुठलाही आडपडदा न ठेवता खुलेपणे बोलणं. 'प्रोब्लेम्स आहेत' हे त्यांनी स्वतःशी मान्य केलंच पाहिजे आणि लोकांची बिलकुल पर्वा न करता ते सोडवले पाहिजेत, कारण आपली आयुष्यं आपल्यालाच जगायची आहेत, लोकांना नव्हे.

'दिल धडकने दो'ने सुसूत्र कथानक, चटपटीत संवाद, मुख्य व दुय्यम पात्रांच्या उत्तम सादरीकरणातून--

  • कुटुंबात भांडणं होतात, गैरसमज होतात आणि मग जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आपोआप सारंकाही सुरळीत होतं
  • लग्न करणं, मुला पैदा करणं ह्यातच जीवनाचं सार्थक आहे
  • पालक नेहेमी मुलांच्या भल्यासाठीच झटत असतात 
  • मोठ्यांचं ऐकावं, त्यांचा मान राखावा. त्यांना जास्त कळतं 

-- ह्या बहुसंख्यांच्या मनात आजही रुजलेल्या समजुतींवर जोरदार प्रहार केला आहे. आपण सारी हाडामांसाची माणसं आहोत आणि आपल्या इतकेच आपले सारे नातेसंबंधही मानवी आहेत, त्यांचं उगाच दैवतीकरण करू नये. मानवी स्वभावातील आढेतिढे, मर्यादा मोकळ्या मानाने मान्य कराव्यात ही गोष्ट ठासून सांगितली आहे.
अखेरीस मेहरा कुटुंबीय एकमेकांच्या स्वप्नांचा, इच्छांचा स्वीकार करतात. पण हे 'हृदयपरिवर्तन' तद्दन मेलोड्रॅमॅटिक सिनेमाप्रमाणे 'चुटकी में' घडून आलेलं नसतं. ..समस्या सुटत नाहीत, सोडवाव्या लागतात!


दिग्दर्शक : झोया अख्तर 
लेखक: रीमा कागती आणि झोया-फरहान-जावेद अख्तर 
भाषा: हिंदी 
अवधी: 170 मिनिटे