Sunday, July 19, 2015

एफटीआयआय - आपल्याला काय पडलंय?

आजचं सरकार सत्तेवर आल्यावर सांस्कृतिक-धार्मिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रांमधे काय-काय घडू शकेल, हे लोक आपल्या कट्टरतावादी विचारसरणीचा रंग देशात जिकडे-तिकडे कसा फासू लागतील याची पूर्वकल्पना आपल्यापैकी बहुतेक विचारी माणसांना होती. त्या सर्व कु-कल्पना, कयास आता सत्यात उतरत आहेत हे तर स्पष्टच आहे. अशावेळी आपण काय करतोय? लोक काय करताहेत?
कट्टरतावादी, मूलतत्ववादी, हुकूमशाहीवादी विचारांचे समर्थक सुखावलेत. संधीसाधू सोकावलेत. पण कुठल्याच मुद्द्यावर ठाम मतं नसणारे, तार्किक वादविवादाची, सखोल चर्चेची अॅलर्जी असणारे, फेसबुक-व्हॉट्सअॅपवर तासन्तास रेंगाळणारे - थोडक्यात तळ्यात-मळ्यात पैकी कुठेच नसणारे लोक काय करत आहेत?

गेल्या एक महिन्याहून अधिक काळ एफटीआयआय (Film and Television Institute of India) च्या विद्यार्थ्यांच्या संप सुरु आहे. आणि त्याबद्दलचे सडाफटिंग, बिनडोक मेसेजेस व जोक्स सर्वत्र भिरभिरत आहेत. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या आदेशाचं (व संचालक मंडळातील अन्य विवादास्पद नियुक्त्यांचं) समर्थन करणाऱ्यांबरोबरच मी मघाशी म्हणलं ती सहसा तळ्यात-मळ्यात नसणारी माणसंसुद्धा ते निरर्थक जोक्स, शिवाय एफटीआयआयमधील विद्यार्थीजीवन, संपातील विद्यार्थ्यांच्या मागण्या, संस्थेचा भूतकाळ वगैरेबद्दलच्या अफवा पसरवण्यास 'उघडलं व्हॉट्सअॅप की कर फॉरवर्ड' असा जोरदार हातभार लावत आहेत.
संबंधित विद्यार्थी, त्यांना परराज्यातून, परदेशातून पाठिंबा दर्शवणारे विद्यार्थी व सिनेक्षेत्रातील मान्यवर, बुजुर्ग निषेध नोंदवत आहेत, संस्थेत येऊन मुलांशी चर्चा करत आहेत. पण लार्जर पब्लिकला, पुण्याच्या तथाकथित अभिरुचीसंपन्न लोकांना ह्या संपाचं, अहिंसक अ-सहकाराचं महत्त्व आणि गांभीर्य उमगलं आहे का? आपल्याला त्याचं काही पडलंय का? एक रसिक म्हणून 'उत्तम' सिनेमे, साहित्य, कलाविष्कार निर्माण व्हावेत ही तळमळ आपल्याला वाटते? ..हो, 'उत्तम' कशाला म्हणायचं यावर मतभेद असू शकतात, परंतु कलाकृती व कलानिर्मितीमागील प्रयोजनं-प्रक्रिया कोणत्याही विशिष्ट प्रचारकी, मूलतत्ववादी विचारधारेच्या प्रभावापासून मुक्त असावीत, 'कला' ही सरकारच्या हातातील बोलकी बाहुली होऊ नये असं तरी आपल्याला वाटतं का? मुळात समाजात कलाविषयक गांभीर्याची पातळी किती आहे?
'चुकार फुरंगटलेल्या पोरांनी चालवलेली मनमानी' समजल्या जात असलेल्या या संघर्षाबद्दल आपल्याला काडीची आत्मीयता वाटते का? - वाटती तर आपण तसले भिकार, दिशाभूल करणारे मेसेजेस न पसरवता या मुलांना व त्यांच्या आंदोलनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यात सक्रिय सहभाग घेण्याची सवड वा आवड नसेल तर किमान बिनबुडाची निंदा तरी केली नसती!
आपल्या न्याय्य हक्कांकरता उभं राहिलेल्या, सरकारला जाब विचारणाऱ्या या मुलांना सर्वप्रथम भवतालच्या समाजाशीच लढावं लागतंय, आपल्याबद्दल पसरलेले गैरसमज दूर करावे लागत आहेत हे मोठं दुर्दैव आहे.
व्हॉट्सअॅपवर फिरणारा तो बंड्याचा 'लॉ कॉलेज रोड'वाला जोक पहा - -
बंड्या म्हणतो मी शाळेत जाणार नाही कारण मला मुख्याध्यापक आवडत नाहीत. बंड्याची आई वडिलांना म्हणते "आतातरी हे  'लॉ कॉलेज रोड'वरचं घर बदला."
ह्यातून चित्र असं निर्माण केलं जातंय की "आमचा आवडता माणूस त्या पदावर बसवा" म्हणून एफटीआयआयची पोरं रुसून बसली आहेत.
पण प्रत्यक्षात बंड्याच्या उदाहरणातून आपली हेकट, शोषणमूलक, वर्चस्ववादी मानसिकता समोर येते: 
- विद्यार्थ्यानं 'भलते' (शिक्षकांची / वरिष्ठांची कोंडी करणारे, त्यांच्या चुकांवर बोट ठेवणारे) प्रश्न विचारू नयेत.
- विद्यार्थ्याला शिक्षकाची पात्रता जाणून घेण्याचा अधिकार नसतो, नव्हे विद्यार्थ्याला अधिकार नसतातच. त्यानं केवळ 'विद्यार्थीधर्म' पाळायचा असतो (= अन्याय होत असल्यास मुकाट्यानं सहन करायचा असतो).
- तेव्हा जो कोणी खाली मान घालून अभ्यास करायचं सोडून वरीलपैकी 'नसते धंदे' करतो तो विद्यार्थी / विद्यार्थिनी आगाऊ, उद्धट. संबंधित संस्थेतून शिक्षण घेण्याची त्याची / तिची लायकी नाही.

विद्यार्थी व शिक्षक, पाल्य व पालक, सरकार व नागरिक ही इथे केवळ नाती नाहीयेत. वर्चस्ववादी धारणेनुसार सर्वच सामाजिक नात्यांत 'एक पक्ष सर्वकाल शोषक व दुसरा पक्ष शोषित राहावा, त्यात समानता येऊ नये' हे कारस्थान असतं. म्हणूनच वरील उदाहरणात आपल्या शाळेचा कारभार पाहणाऱ्या मुख्याध्यापकाने पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत का, त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याची नियुक्ती राजकीय हितसंबंधातून झाली आहे का वगैरे सवाल उठवण्याचा अधिकार बंड्याला नाही! 

एफटीआयआयमधील काही अंतर्गत प्रश्न व समस्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत हे मान्य. पण तसं असल्यास संस्थेच्या खुर्चीवर बसणाऱ्याची शैक्षणिक, व्यवस्थापकीय पात्रता आणखी जास्त हवी! त्याची व्यक्तिगत कारकीर्द आणखी उजळ, उत्तुंग  हवी! परंतु संस्था चांगली चालवण्यात रस आहे कुणाला? किंवा 'चांगलं' म्हणजे काय याबाबत आजच्या सरकारच्या काही प्रतिगामी, कर्मठ कल्पना आहेत व त्या त्यांना येनकेनप्रकारे, लोकशाहीच्या तत्वांना पायदळी तुडवत सर्वांवर लादायच्या आहेत असं म्हणता येईल.

"प्रत्येक सरकार विरोध दडपू बघतं, त्यामुळे तुमचा लढा ठराविक सत्तेविरोधात आहे असं समजू नका" हे संपाला पाठिंबा देणाऱ्या अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेलं मत अगदी योग्य आहे. पण आत्ता, या घडीला एका विशिष्ट विचारसरणीशी त्यांना लढा द्यावा लागत आहे, लढयाचं स्वरूप त्यानुसार आकार घेणार आहे हेही खरं आहे.
'म्रिणाल सेन मार्क्सवादी आहेत, कर्नाड हिंदू-विरोधी तर श्याम बेनेगल भाजपविरोधी आहेत' अशी आगपखड केली जातेय. एक गोष्ट पूर्णसत्य आहे - वरील सर्वजण कट्टरता, मूलतत्ववाद, संकुचितता-विरोधी आहेत. स्वतंत्र विचारांची मंडळी आहेत. आपल्या भूमिका दुसऱ्यावर जुलमाने लादणारे नाहीत. 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ व मोल ते जाणतात. अशा लोकांचा 'बंदोबस्त' करणं, अथवा किमान त्यांची प्रतिमा मलीन करणं ही कायमच हुकूमशहांच्या चेकलिस्टवरची नंबर एकची गोष्ट असते.

जगाच्या कुठल्याही भागातील, कुठल्याही कालखंडातील हुकूमशाहीवादी, मूलतत्ववादी, कट्टरतावादी सत्तेची काही समान लक्षणं असतात हे थोडाबहुत विचार केल्यास आपल्या सहज दिसून येईल:
१. आपल्या सामाजिक, आर्थिक, पारंपारिक अपयशांसाठी विशिष्ट परकीय वा अल्पसंख्यांक वा गैरसोयीच्या समाजघटकांना जबाबदार धरणं
२. "आपला धर्म धोक्यात आहे, आपली संस्कृती धोक्यात आहे, आपल्याला विरोध करणारे लोक आपली जमात नष्ट करायला टपलेले आहेत" अशी अनाठायी भीती जनतेत पसरवणं. जनतेला पॅरानॉइड बनवणं.
३. "संस्कृती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, चांगलं-वाईट वगैरेबद्दलच्या आमच्याच कल्पना योग्य आहेत, त्यावर कोणी टीका करायची नाही" या मानसिकतेला खतपाणी घालणं. समाजातील सहिष्णुता, निकोप चर्चा, निकोप टीका संपवणं, विचारशीलता संपवणं, सर्व तऱ्हेच्या विरोधकांना देशद्रोही ठरवणं.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाही सत्ता समाजमनात एक उदासीनता, एक पिचलेपणाची भावना निर्माण करतात. "तुम्ही धडपड करू नका, आम्ही तुमचं भलं करू, फक्त आम्हाला साथ द्या" म्हणताना - "तुम्ही काहीच करू शकत नाही, सत्तेपुढे तुम्ही क्षुद्र आहात आणि विरोध कराल तर खबरदार!" हा इशारा दिला जात असतो.

कृपया आपल्या बुद्धीवर, तर्कावर, भावनांवर ह्या उदासीनता, वैचारिक हताशपणाची बुरशी चढू देऊ नको या. अनाठायी भीतीला बळी पडू नको या. तात्कालिक आश्वासनांनी भुलून जाऊ नको या. कृपया 'स्वातंत्र्य' (freedom) व 'सहिष्णुता' (tolerance) या शब्दांचे अर्थ विसरून जाऊ नको या, संविधान विसरू नको या.
भारतीय संस्कृतीबद्दलच्या थोतांड, संकुचित कल्पना, विविध प्रकारच्या वैचारिक 'गुंगीच्या गोळ्या' स्वीकारू नको या.
कृपया जागे राहू या. जमल्यास आजूबाजूच्यांनही जागे ठेऊ या.

No comments:

Post a Comment