Friday, October 9, 2015

आता लिहायलाच हवं असं वाटतंय खरं, पण काय? कुठून करायची सुरुवात, कुठून आणायची?
माझ्या आतून काय बाहेर पडू बघतंय ते कळतंय तरी का मला?? मी एक टेस्ट-ट्यूब आहे फक्त. कुठलंसं भयंकर रसायन तिच्यात थयथयाट करतंय. माझ्यात जे आहे ते माझं नाही. जे होतं ते कुठे गेलं पत्ता नाही. मग का मोजते मी अधून मधून शरीरावरचे साकळलेले व्रण? का तुझे डोळे काढून खिशात बाळगावेसे वाटतात; आणि तरीही 'या भावी आंधळ्याला चालताना ठेच नाही लागली, त्याचं जगणं अगदीच भंगारात नाही गेलं तर बरं', असं का वाटतं?
सुऱ्याखाली घेतलेल्या प्राण्याबद्दल दयामाया वाटून कसं चालेल! तू कसा हाताळतोस हा प्रकार कुणास ठाऊक!

…जर सगळंच मी आहे तर मी करायचं काय? जायचं कुठे? की पडून राहायचं आहे तिथेच? माझं वेगळं अस्तित्व तरी कशाला हवं मग? आपण तेच करणार आहोत हे एकदा कळल्यावर मागची पानं उलटून बघण्यात काय अर्थ?? आपला डोंगराएवढा पसारा वेचायचा सोडून दुसऱ्यांच्या वागण्याचे हिशेब काहून लावत बसतो आपण?

स्वप्नं बंद करायचं एखादं बटण असेल का कुठे? शरीरात असेल एखादी कळ? कारण जिवंत असल्याची जाणीव नकोशी वाटते. सरळ रस्त्यावर आडवं व्हावं आणि त्यांचे ट्रक, रथ, गाड्या निमूट आपल्यावरून जाऊ द्याव्यात. आपण आटवत असलेलं रक्त मिटक्या मारत पिणारे हे लोक! त्यांनी वाहवलेल्या नद्यांमध्ये संथ डुंबत असलेले आपण! कोण कुणाला भोसकतोय, कुणाची तहान मोठी, कुणाची हौस अफाट.. कळायला मार्ग नाही. 

नेमकं कुठल्या 'मी'च्या वतीने जगायचं रे? जंगलात सैतान माजल्यावर गाणारा पक्षी कुठे जातो? त्यांचं कायमच वाकडं होतं का? की माझ्या पाठीमागे चांगलं जमतं त्यांचं?

एक दिवस सगळ्यांनी सगळे अत्याचार गुमान सहन करायचे ठरवले तर सोय नाही का होणार सगळ्यांची..थोडी-थोडी? एक दिवस लढलो नाही आपण तर? एका दिवसासाठी आपण कोण आहोत-कोण नाहीओत हे स्वतःला पुन्हापुन्हा बजावणं बंद ठेवलं तर? एकदा दारावरच्या भडक स्टिकरकडे लक्ष न देता सहज त्यांची बेल वाजवली तर? - कदाचित आत आपणच बसलेले असू!!

सुंदर गोष्टी निर्माण करण्याआधी विचार तरी करायला हवा होता वेड्या लोकांनी. कुठल्या विश्वासाने खुळावून आपल्या हातात ठेऊन गेले ते ह्या गोष्टी? आपण हे असे दळभद्री, हातात सापडेल त्या व्यक्तीचा, वस्तूचा, पानाफुलांचा चोळामोळा करणारे.. की जाणूनबुजून खेळला त्यांनी हा डाव?

टोकं जाम जुळत नाहीत बुवा. पहाट झाली. स्वप्नांपासून आजच्यापुरती सुटका झाली आणि झोप अंथरुणातच तडफडत राहिली.

No comments:

Post a Comment