Friday, January 29, 2016

आक्रमक, भ्रमिष्ट आईपासून; मानसिकदृष्ट्या असुरक्षित, कुढ्या बापापासून सुटका हवीये. जिच्याशी खूपसं पटतं त्या बहिणीपासूनसुद्धा सुटका हवीये. खरं म्हणजे या चौकोनाचा चौथा कोन असलेल्या 'स्व'पासून सुटका हवीये.

इतके कसे तुटतो आपण कुटुंबापासून? - की त्यांच्याशी गरजेव्यतिरिक्त आणखी कुठलाही धागा राहत नाही? की त्यांच्या सहवासात, त्यांच्याबरोबर काढलेल्या फोटोतदेखील आपलं उपरेपण लख्ख डोकावू लागतं? की दूरगावी / प्रवासात त्यांची आठवण येईनाशी होते; त्यांना उत्तरं द्यावीशी वाटत नाहीत, आणि चौकश्याही कराव्याश्या वाटत नाहीत? की 'ते आपल्याला असंख्य गोष्टी पुरवतात, आपल्यावर खर्च करतात' याचं कौतुक वाटणं बंद होतं, आणि मन फक्त शुष्क कृतज्ञतेचा बोजा वागवत राहतं?

कोण्या एके काळी इवल्याशा हातांनी बाबांची दाढी लाडाने कुरवाळल्याचं मला पुसटसं आठवतं. दोन्ही हात जमेल तितके पसरून आई-बाबांना मिठी मारायला झेपावल्याचंही दिसतं. ह्या आठवणी आहेत, की केवळ धुरातून निर्माण होणारे चित्रांचे भास आहेत.. ठाऊक नाही. तसंही इतक्या लहान वयात पालकांबद्दल जी चिकट नैसर्गिक ओढ वाटत असते तिला 'प्रेम' म्हणावं का, याबाबत मी बरीच साशंक आहे.

वाटतं फुगे भरून/ होड्या करून सोडून द्यावं तिघांना. नाहीतर मांजा छाटून घेऊन आपणच भरकटावं दूर, अतिदूर.

स्वप्नभंग झालाय माझा, हे सत्य आहे. पलंगावर लोळता लोळता दाण्णकन् जमिनीवर आपटले आणि ती साखरझोप, साखरस्वप्नं कायमची तडकली. प्रत्येक आईबापाचं आपल्या मुलावर प्रेम असतं, मुलांचं भलं व्हावं अशी प्रत्येक आईबापाची तळमळ असते.. झूट आहे. तुमच्या-माझ्यासारखी ती माणसं असतात, पशू असतात आणि पोटच्या पोरांच्या माध्यमातून त्यांना हवंय तेच साध्य करण्याची धडपड करत असतात. प्रेम-बिम, तळमळ नुसता शब्दांचा तवंग. आपल्यापैकी जवळजवळ कुणालाच झाट काही कळत नाही. पशू संपून माणसातला माणूस नेमका कुठे सुरु होतो कळलंय का आपल्याला? प्रेम झेपतं आपल्याला? श्रद्धा झेपते? पेलवते? किती काळ तिचं बोट धरून चालू शकतो?

शेकणारं प्रेम हवं, पोळणारं नको - मग ते प्रेम नव्हेच.

..पालकांबाबत झालेला स्वप्नभंग भयंकर होता कारण त्या नात्याभावती आदर्शांचे, कल्पनांचे ढग अगदी गच्च दाटले होते. आईबाबांनी आपल्यासाठी खूप काही केलंय हे पूर्णतः खरं आहे, परंतु त्यांचं आपल्यावर बिनशर्त, निर्व्याज प्रेम नाही. आपण कितीतरी अर्थांनी एकटे आहोत, वेगळे आहोत. पुष्कळ जाणीवा, विचार आपल्याला त्यांच्यापाशी कधीच व्यक्त करता येणार नाहीत. ते सुरक्षित, काठाकाठाने जगलेत आणि त्याहून खोल कशातच शिरण्याची त्यांना इच्छा नाही. स्वतःहून भिन्न तऱ्हेने बोलणाऱ्यांचा, वागणाऱ्यांचा, जगणाऱ्यांचा तिरस्कार करण्यात ते समाधान मानतात. मला जन्म देणं, खाऊ-पिऊ घालणं, पैसे खर्च करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणं नव्हे. त्यांच्यावर अवलंबून राहणं, त्यांच्या मर्जीनुसार वागणं, घाबरून राहणं किंवा कर्तव्य समजून उपकारांची परतफेड करणं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणं नव्हे - - म्हणजे आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करत नव्हतो तर! अद्यापही करत नाही.

~ ज्याला जे हवंय ते पुरवणं म्हणजे प्रेम नव्हे, हे तुझ्या सहवासात हळूहळू समजायला लागलं. "जो जे वांछील तो ते लाहो" ही सद्भावना झाली, प्रेम म्हणजे केवळ सद्भावना नाही, हे आता उमजतंय.  ~

..माझं आणि माझ्या पालकांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं. अद्यापही नाही. सगळे ढग झटक्यात दूर झाले. मात्र खुल्या आभाळाची झळ सोसवेना. 

का खोटं बोलावं लागतं त्यांच्याशी? नाही आवडत मला. शप्पथ नाही आवडत. काय करावं, खरं पचवायची, मला माझ्या लयीत जगू तयारी नाहीए ना त्यांची. सत्यं ढिगाने आहेत जगात, पण ती प्रत्येकाचा हात धरत नाहीत. माणसांची थट्टा उडवत, त्यांच्या अंगावर अक्राळविक्राळ सावल्या फेकत फिरणारी नागडी पोरं असतात सत्यं म्हणजे. सावल्यांना घाबरून बिळात लपून बसण्यातच जिंदगी वाया घालवतो आपण. बुफेतल्या ताटागत आयुष्य हावरटपणे भरून घेतो आणि शेवटी काहीच धड न चाखता सगळा उकिरडा करून ठेवतो.

 ~ तू आणि मी एकमेकांपाशी सर्वार्थाने नागडे असताना जिगसॉचे तुकडे भेटत असल्यासारखा कम्फर्ट, क्लॅरिटी, लिबरेशन असतं ..such thrill of discovery! ~


नागडेपणाला भिणारे लोक जन्मात खरीखुरी अंघोळ, खरंखुरं सेक्स करत असतील का? त्यांनी स्वतःच्या सौंदर्यबुद्धीचे डोळे फोडून टाकले असतील का?

…क्वचित पालकांबद्दल वाईट वाटतं - त्यांनी ज्याप्रकारे आयुष्य काढायचं ठरवलंय ते पाहून. कित्येकदा स्वतःबद्दल वाईट वाटतं - त्यांच्याशी जोडलं जाण्याची पुरेशी इच्छा मनात नाही म्हणून. त्यांची कथा काय असेल याचा नीटसा पत्ता लागत नाही. हाताशपणा येतो. मग मी विषय बदलते.

No comments:

Post a Comment