Tuesday, March 15, 2016

एक कार्यक्रम

त्या चित्रकाराच्या सर्वच चित्रांना एक सुखद, स्वप्नील झाक असते.  हलाखीचं ग्राम्य जीवन, दारिद्र्य, कष्टाने चिंबलेली शरीरं किंवा रणरणत्या उन्हातील नुसतेच भकास क्षण… साऱ्याला रमणीयतेचा वर्ख लावण्याची गरज काय? की असल्या प्रतिमांची दाहकता कमी करून चित्रकार खरंतर आमच्यावर दया दाखवत होता? कितीतरी दैनंदिन दृष्यांतून संक्रमित होणारी खिन्नता, एकसुरीपण, सैरभैरपण त्या प्रशस्त दालनात घटकाभर विसरायला लावल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानायला हवे होते का? उचित प्रकाश, उचित आरामदायक बैठक, उचित रंगरेषा, अगदी चित्रकाराचंच एक अर्धशिल्प होतं त्याच्या टकलामागचे वळलेले केससुद्धा एकदम बिनचूक! ..मला त्याला हे प्रश्न विचारायचे होते, पण नाही विचारले. त्यानं जे देऊ केलं आहे ते स्वीकारावं की नाकारावं याचा निर्णय अजून कुठे झाला होता? सारंकाही बिनचूक असलं तरी चुकल्याचुकल्यासारखं का वाटतं? हे सुघड, कमानदार अचूकपणाचं रोपटं घरी नेऊन आयुष्यात रोवता येणार नाही म्हणून आपली धुसफूस होते?

समोर कुशनवाल्या खुर्च्यांवर बसलेल्या तिघाचौघांचं बोलणं म्हणजे 'विचार' आणि आपले विचार म्हणजे नुसतीच अक्षतांसारखी, फारसं महत्त्व नसणारी, केवळ प्रथा म्हणून डिवचली जाणारी मतं, असं का? 

नंतर फिल्म, कथा-वाचन आणि मग चहा.
रीतसर योजून व नीटस पार पडूनही कार्यक्रमाला न आलेली फक्कड चव मग तिथे पुढेमागे वाटल्या जाण्याऱ्या चहात पडत असावी - चुकीनेच. असल्या गोष्टी बिनचूकपणाने साधत नसतात. 

No comments:

Post a Comment