Saturday, October 8, 2016

कितीतरी गोष्टी लक्ष वेधून घेतात, कसल्याही आग्रहाविना लक्षात राहतात. जाणीवजरीची नवी नक्षी रोज मन भरून टाकत असते. डान्स क्लास चालू असताना हॉलच्या मोठ्ठ्या दारातून आत आलेली मोगऱ्याच्या गंधाची मंद लाट, लालचुटुक फरशांच्या जमिनीवर पसरून पुस्तक वाचत घालवलेल्या माध्यान्हवेळा, हो-नाही करत अखेरीस व्हरांड्यात घरटं बांधून राहिलेली बुलबुलची जोडी, लोकांच्या बोलण्याचे आवाज, त्यातील मजेशीर कंपनं,  शब्दांत न मावल्यावर डोळ्यांत उचंबळून येणाऱ्या भावना, कुठल्याही गावी न बदलणारा मारवाड्याच्या दुकानातला वास.... ओठ, पत्रं, अक्षरांच्या तऱ्हा, एकाच गल्लीत चित्रित केल्यात असं वाटवणाऱ्या आर्ट फिल्म्सची जुळवलेली यादी, खूप सारे प्रश्न, खूप नवलाई, पापण्या न मिटता अखंड जागणारा एकाकीपणा ....

जगाच्या व्यवहारात ह्या साऱ्याला स्थानच नाही? गणगोत माझ्या जिवंत असण्याची आणि मरण्याची दखल घेतील कदाचित पण मी काय जगले, अनंत क्षणांचे माझ्या मनावर पडणारे हे विविधरंगी कवडसे... ह्याबद्दल जाणून घेण्यात कोणालाच रस नाही? अनुभव नटव्या अभव्यक्तीत लपेटून बाजारात मांडले जात नाहीत तोवर अर्थपूर्ण नसतात? प्रत्येक अनुभवाचा एक आकलनीय, प्रेक्षणीय आकार घडवायलाच हवा का? अर्धकच्च्या, शिेळ्या-ताज्या, स्पष्ट-धूसर जाणिवांची देवाण-घेवाण किंवा नुसती नोंद करत राहिलो एका कोपऱ्यात बसून तर 'nobody' ठरतो आपण?

 हरकत नाही. पण म्हणूनच आजवर या माणसांत वावरत असूनही, भोवतालाने घडत-बिघडत असूनही मी काहीशी विलग आहे, वेळोवेळी स्वतःला काचेच्या शंखात आकसून घेते. छोट्या-छोट्या गोष्टी नजरेत कोरून घेणाऱ्या, मनावर गिरवणाऱ्या माणसांशी माझं जमतं. ओसाड घराप्रमाणे आगतस्वागताच्या संकेतांशी नातं विसरलेल्या, सरून गेलेल्या काळाच्या खुणा वागवणाऱ्या पुस्तकांशी जमतं. झाडांशी सगळ्यात जास्त गप्पा होतात.

अनुभूतीची कोडी आणि पांडित्यपूर्ण चर्चा मला दोन वेगळ्या कप्प्यांमध्येच ठेवायला आवडतील. दोन्हीच्या चवी मिसळू पाहणं ही गल्लत आहे.

मी कुठल्याही गोष्टीत जीव गुंतवत नाही असं कसं म्हणतोस? - आपल्या नात्यात गुंतवते ना. कसल्याश्या साधनेत अधिकाधिक लीन होत जावं तशी खोल खोल जात राहते. हा सहजप्रवाह म्हणजे काही रिसर्च नव्हे किंवा अवजड कामगिरी नव्हे. ठराविक अर्था-मापाची वस्तू नव्हे. खरंतर हेच उत्तम. कारण आपला संबंध इतरांना उमगला, फर्स्ट पर्सन म्हणून अनुभवता आला किंवा नुसतेच त्यांच्यावर शब्दांचे शहारे उमटवून गेला तर त्यांच्यासाठी त्यात काही कथा राहणार नाही. आणि दुसऱ्या कशाहीपेक्षा माणसं कथांवर जगतात. ...कथाच असतात साऱ्या. अतिशय इटुकपिटुक, नाजूक, तरीही कुणाचेतरी श्वास सामावलेल्या.